जगणं ही एक अविरत प्रवास आहे. हा प्रवास सुखद आणि सुंदर होण्यासाठी संघर्षाची कास धरावी लागते. जीवनात अनेक अडथळे, संकटं आणि आव्हानं येतात. मात्र, या सर्वांना धैर्याने तोंड देणाऱ्यांनाच खऱ्या अर्थाने यश आणि आनंद प्राप्त होतो. कोणतेही मोठे यश सहजासहजी मिळत नाही; त्यासाठी मेहनत, चिकाटी, संयम आणि संघर्ष आवश्यक असतो. संघर्षाशिवाय जीवनातल्या सुखाचं खरं मोल कळत नाही.
संघर्ष म्हणजे काय..?
संघर्ष म्हणजे जीवनातील अडथळ्यांविरुद्ध उभी राहण्याची, त्यांच्यावर मात करण्याची जिद्द. ही एक मानसिक आणि शारीरिक तपश्चर्या असते. प्रत्येक यशस्वी व्यक्तीच्या जीवनात संघर्षाची एक मोठी कहाणी असते. संघर्ष केवळ बाहेरच्या परिस्थितीशी असतोच असे नाही, तर तो अनेकदा आत्मशोधाचा आणि आत्मपरिक्षणाचा ही असतो. स्वतःच्या मर्यादा ओलांडून अधिक सक्षम होण्याची संधी संघर्षामुळे मिळते.
संघर्षाशिवाय जीवन कसे असेल?
संघर्ष नसलेले जीवन संथ आणि बेरंगी असते. कोणतीही मोठी ध्येये गाठण्यासाठी, नवीन गोष्टी शिकण्यासाठी संघर्ष अपरिहार्य असतो. कल्पना करा, एखादा विद्यार्थी परीक्षेच्या तयारीसाठी परिश्रम करत नाही, एखादा खेळाडू सरावाशिवाय मैदानात उतरतो, किंवा एखादा उद्योजक अपयशाची भीती बाळगून कोणताही धोका घेत नाही – अशा वेळी यश मिळण्याची शक्यता फार कमी असते. त्यामुळेच, संघर्षाशिवाय कोणतेही मोठे स्वप्न पूर्ण करता येत नाही.
संघर्ष आणि आत्मविश्वास..
संघर्ष हा आत्मविश्वास आणि आत्मसन्मान वाढवतो. संकटांना सामोरे जाण्याची तयारी असली की, आपल्याला कोणतीही परिस्थिती पराजित करू शकत नाही. थॉमस एडिसन याने हजारो प्रयोग करून विजेच्या बल्बचा शोध लावला. त्याच्या प्रयत्नांत अपयश आले असते तर आपण आजही अंधारात असतो. संघर्ष हा आपल्याला अपयशातून शिकण्याची संधी देतो. जेव्हा आपण धैर्याने आणि संयमाने प्रयत्न करतो, तेव्हा यश निश्चित मिळते.
🔰यशस्वी लोकांच्या जीवनातील संघर्ष.. ✍️
1. डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम – गरीब कुटुंबातून आलेले, पेपर विक्रीपासून सुरुवात करणारे कलाम सर भारताचे राष्ट्रपती आणि ‘मिसाईल मॅन’ झाले. त्यांचा संघर्ष हा सर्वांसाठी प्रेरणादायी आहे.
2. स्वामी विवेकानंद – बालपणापासूनच अनेक अडचणींना तोंड देत त्यांनी संपूर्ण जगात भारताच्या अध्यात्मिक विचारांची पताका फडकवली.
3. नेल्सन मंडेला – त्यांनी २७ वर्षे तुरुंगवास भोगला, पण दक्षिण आफ्रिकेत वर्णद्वेषाविरुद्धची लढाई सोडली नाही.
4. अरुणिमा सिन्हा – अपघातात एक पाय गमावलेल्या अरुणिमा सिन्हाने हिमालयातील एव्हरेस्ट शिखर सर केले. हा संघर्ष एक प्रेरणादायी उदाहरण आहे.
🔰संघर्षाचे फायदे.. ✍️
1. संघर्ष आपल्याला अधिक मजबूत बनवतो. तो आपल्यातील सहनशीलता वाढवतो.
2. समस्या सोडवण्याची कला शिकवतो. संकटांमध्येही मार्ग काढण्याची सवय होते.
3. ध्येयावर स्थिर राहण्याची शक्ती देतो. कोणतेही मोठे स्वप्न पूर्ण करण्यासाठी सातत्याने प्रयत्न करणे आवश्यक असते.
4. जीवनाच्या खऱ्या मूल्यांची जाणीव होते. संघर्षामुळे आपण जगाकडे अधिक समजूतदारपणे पाहतो.
🔰संघर्ष कसा करावा..?
1. ध्येय निश्चित करा. कोणत्याही गोष्टीत यश मिळवायचे असेल, तर स्पष्ट आणि ठाम उद्दिष्ट असणे गरजेचे आहे.
2. सकारात्मक दृष्टिकोन ठेवा. संकटांवर मात करण्यासाठी मनोबल महत्त्वाचे आहे.
3. चुकीतून शिकण्याची वृत्ती ठेवा. अपयश ही पुढच्या यशाची पायरी आहे.
4. शिस्त आणि सातत्य ठेवा. सातत्याने प्रयत्न करणारेच यशस्वी होतात.
5. स्वतःवर विश्वास ठेवा. संघर्षाच्या काळात आत्मविश्वास गमावू नका.
शेवटी मित्रांनो.. ✍️
संघर्ष हा जीवनाचा अविभाज्य भाग आहे. संघर्ष केल्याशिवाय मोठे यश, समाधान आणि आनंद मिळू शकत नाही. खऱ्या अर्थाने सुंदर जीवन जगायचे असेल तर संकटांना सामोरे जाण्याची हिंमत ठेवली पाहिजे. संघर्ष हीच खरी शक्ती आहे, जी आपल्याला अपयशावर मात करून यशाकडे नेते. म्हणूनच, "जगणं सुंदर व्हावं, असं वाटत असेल तर लढायला आणि संघर्ष करायला शिका मित्रांनो..!"
धन्यवाद मित्रांनो..! लेख आवडला असेल, तर आपल्या प्रियजनांसोबत नक्कीच शेअर करा.
सकारात्मक विचार शेअर करणे हीच मानसिक आणि सामाजिक शक्ती वाढवण्याची सर्वात मोठी ताकद आहे. जेव्हा आपण प्रेरणादायक विचार इतरांसोबत वाटतो, तेव्हा ती ऊर्जा द्विगुणित होते आणि आपले जीवन अधिक सकारात्मक आणि समृद्ध बनते. त्यामुळे, चांगल्या गोष्टी शेअर करत राहा आणि एकमेकांना पुढे जाण्यास प्रेरित करा मित्रांनो..!
-विचार संकलन आणि संपादन.. ✍️
-एक पुस्तकप्रेमी आणि समाजमाध्यमकार..
#विद्यार्थीमित्र प्रा.रफीक शेख
The Spirit of Zindagi Foundation
🎓 डॉ. ए.पी.जे.अब्दुल कलाम विद्यार्थी फाउंडेशन, परभणी.
https://www.vidhyarthimitra.com
Post a Comment