"धर्म म्हणजे नजरकैद की प्रकाशाचा मार्ग?"
मस्जिदीच्या ओसरीवर एक चर्चासत्र सुरू होतं. मौलवी इसहाक साहेब म्हणाले,
"मोबाईलमध्ये फोटो काढणं, व्हिडीओ बनवणं – सगळं हराम आहे!"
त्यावर असराफ नावाचा तरुण हसत विचारतो,
"मग तुम्ही स्वतःचा चेहरा आरशात पाहता का?"
मौलवीसाहेब उत्तरतात, "हो, पण आरशात बघणं हराम नाही."
अशरफ शांतपणे म्हणतो,
"पण आरशात दिसणारा चेहरा ही प्रकाशाची प्रतिमा असते. मोबाईल फोटो म्हणजे तोच चेहरा थांबवलेला — स्थिर आरसा. मग तो हराम कसा?"
मौलवी विचारात पडले... अशरफ थोडं खोडकरपणे पुढं विचारतो,
"फेसबुकवर प्रोफाईल फोटो टाकला तर अल्लाह नाराज होतो म्हणता, पण तोच फोटो पासपोर्टवर लावला, किंवा निकाहनाम्यात, तेव्हा अल्लाह खुश होतो?"
मौलवी काहीच बोलू शकले नाहीत. चर्चेवर मौन पसरलं... आणि मौलवीसाहेब पहिल्यांदा विचारमग्न झाले..!
कॅमेरा, फोटो, व्हिडीओ — चाळीस वर्षांपूर्वी हराम मानले गेले.
म्हटलं गेलं, "ही आत्म्याच्या प्रतिमेची नक्कल आहे – ही गुन्हा आहे."
पण आज त्या काळचेच मौलाना युट्युबवर 'दीन' शिकवतात, इस्लामिक टीव्हीवर कार्यक्रम घेतात.
म्हणजे काय..?
गोष्ट चुकीची नव्हती, तिचा अर्थ चुकीच्या काळात चुकीच्या नजरेने लावला गेला..
धर्म बदलला नाही — धर्म सांगणाऱ्यांची समज बदलली...
...आणि ही समज बदलायला उशीर झाला — तोवर एक संपूर्ण पिढी गोंधळात, गिल्टमध्ये आणि अंधश्रद्धेत गुरफटली.
इस्लाम म्हणजे 'यसर' – सुलभता, की 'उझ्र' – अडथळा?
हे आपण ठरवायचं आहे.
इस्लाम म्हटलं की न्याय, करुणा, सुज्ञता – असा एक दिव्य, विवेकी मार्ग समोर यायला हवा.
पण दुर्दैवाने, आज इस्लामला कठोर नियमांची, बंदिशींची, फतव्यांची एक शृंखला लावली जातेय...
"बँकेचं कर्ज हराम, विमा हराम, नोकरी हराम...!"
गरिबाला घर हवं असेल, तर त्याचं काय? दगडधोंड्यांच्या झोपडीत राहावं का?
की मौलवींच्या करुणेवर उधारी मिळेल, अशी आशा ठेवावी?
ही कठोरता, ही एकतर्फी शिकवण... ह्याचा धर्माशी काय संबंध?
एक काळ होता — जेव्हा आरोग्य विमा घेतल्यावर विचारलं जायचं,
"तू अल्लाहवर विश्वास ठेवत नाहीस का?"
आणि आज तीच मंडळी म्हणतात,
"बेटा, महागाई वाढलीय, मेडिक्लेम घे."
सत्य तेच होतं – पण समज उशीरा आली.
धार्मिक निर्णय हे भीतीवर नाही, वास्तवावर घ्यायला हवेत.
धर्म मार्गदर्शक असावा – अडथळा नव्हे.
कधी कुराण फक्त तोंडी पाठ होतं. कारण लिहिणं म्हणजे अपवित्रता, असं वाटायचं.
पण जेव्हा हाफिज युद्धात शहीद होऊ लागले, तेव्हा...
हजरत अबू बक्र (र.अ.) आणि हजरत उमर (र.अ.) यांनी ठामपणे सांगितलं..
"ज्ञान टिकवायचं असेल, तर ते लिहून ठेवा."
आज कुराण जगभर पोचलं – कारण धर्मानं काळाशी संवाद साधला.
काळ बदलतो, तसा धर्म सांगण्याची शैलीही बदलायला हवी – धर्माचा गाभा टिकवून.
आज मुस्लिम समाज एका दुहेरी संकटात आहे.
एकीकडे धर्माचं अज्ञान, दुसरीकडे धर्माच्या नावावर गप्प बसवणारे फतवे.
"फतवे की फिक्र?" – हा फक्त शाब्दिक खेळ नाही; हा अस्तित्वाचा प्रश्न आहे.
"बँक हराम, विमा हराम, ब्याजावर शिक्षण हराम,
सोशल मीडियावर मत हराम –मग शेवटी जगायचं कसं?
धर्म शिकवतोय की डर देतोय?"
धर्म भीतीसाठी नसतो – तो विवेक देतो.
धर्म रस्ता दाखवतो – भिंत उभी करत नाही.
"मुस्लिमांचं अर्ध आयुष्य हलाल-हराम ठरवण्यात जातं."
हे विधान उपहास वाटत असलं, तरी हे दु:खद वास्तव आहे.
धर्म जिवंत संवाद असतो — तो बंदिशीत मारला जातो.
धर्म विचार देतो — जर तो विचार नसेल, तर ते नियम केवळ एक यंत्रणा ठरतात.
जेव्हा माणूस विचार न करता नियम पाळतो – तेव्हा तो धर्मवादी होतो.
पण जेव्हा तो प्रेम, समज, आणि तर्कानं जगतो – तेव्हाच तो धार्मिक होतो.
आजची वेळ विचारांची आहे...
मुस्लिम समाजाला गरज आहे – प्रश्न विचारण्याची, चर्चेला तयार होण्याची, आणि फतव्यांपेक्षा फिकर स्वीकारण्याची.
इस्लाम पंख देतो — त्यात उड्डाण करा.
त्या पंखांना साखळ्या बांधू नका.
धर्म म्हणजे मार्ग आहे — बंदिस्त मज्जाव नव्हे.
धर्म म्हणजे प्रकाश आहे – तो डोळे झाकून चालण्यासाठी नव्हे, तर नीट पाहण्यासाठी आहे.
नमाज उरेल, पण समाज नसेल.
रोजा उरेल, पण रोजगार नसेल.
हज उरेल, पण हक्क राहणार नाहीत.
धर्म धरावा – पण त्याच्या साखळ्यांमध्ये अडकून नाही.
धर्म समजून जपावा – डोळे झाकून नव्हे.
"इस्लाम जब विचार करता है – तब दुनिया बदलती है.
और जब वो डरता है – तब पिछड़ता है."
आता वेळ आहे – डर झटकण्याची.
प्रश्न विचारूया. समजून घ्यायला शिकूया.
कारण खरा इस्लाम, तोच आहे – जो विचार देतो, आणि माणूस घडवतो.
"आज धर्माला काळाशी जोडणं ही काळाची गरज आहे. अन्यथा धर्म उरेल, पण धर्मीय हरवतील."
✍🏻 लेखक:- फकरुद्दीन बेन्नूर यांच्या लेखनातून केलेला भावानुवाद
-संपादन
Post a Comment