कोणताही मोटीवेशनल स्पिकर तुमचं नशीब बदलू शकत नाही. त्याने तुमच्या आधी पाच पन्नास पुस्तकं जादा वाचलेली असतात व त्यावर तो स्वत:च पोट भरत असतो.
युट्यूब व अशा अनेक सोशल साईटवर जे मोटीवेशनल वक्ते आहेत हा एक प्रचंड मोठा बोफोर्स घोटाळा आहे असं ठामपणे वाटतं.
तुम्ही असं वागा , तसं बसा , असं उभं रहा , हे करा , ते करू नका....
आगायाया त्याचं बघून ऐकून माणसं स्वत:च व्यक्तीमत्व काय हेच विसरून जातात.
यशाची १० सुत्रे , श्रीमंत माणसं ही ५ कामे करतात , मुलगी पटवण्याचे ७ अद्भुत उपाय , यशस्वी माणूस काय खातो ...इत्यादी या व अशा हजारो क्लिप्स् आज मोकाट सुटलेत.
मोटीवेशनल स्पीचेस हे मल्टिलेवल मार्केटिंगच पिल्लू आहे. अशा कंपन्या बळीचा बकरा शोधून , त्याला असलं काहीतरी ऐकवून दाखवून तयार करतात. व ज्याला एलआयसीत बसून झोपा काढायचा नाद लागलाय तो सहा महीन्यात कोट्याधीश व्हायचं बघू लागतो. जे शक्यच नसतय.
सुशांतसिंह राजपूत गेला. त्यानं एम एस धोनी व छिछोरे सारखे मोटीवेशनल मुव्हीज केले व अनेकांना ते चित्रपट पाहून १२ हत्तींच बळ अंगात संचारलं. मी पण असाच होणार वगैरे.
सुभाष चंद्रा झी ग्रुप चा चेअरमन , धंदा कसा करावा यावर रोज एम बी ए च्या पोरांना समोर बसवुन सल्ले द्यायचा , आज भीकेला लागलाय.
डी एस के , धंद्यातलं मराठी नाव. एक सामान्य माणूस कसा मोठा झाला यांच्या दंतकथा आजही प्रसिद्ध आहेत , यांचे सेमिनार जगभर झालेत , आज सपत्नीक कुठं आहेत हे सर्वांना माहीत आहे.
जगाला सल्ला देणे , ज्ञान देणे हा छंद अनेक जणांना असतो. पण कधी एकदा तरी शांत बसुन स्वत:ला काय येतय , जमतय याचा विचार केला पाहीजे. स्व ची ओळख असणे या सारखं दुसरं मोटीवेशन नाही.
निसर्गा सारखा मोटीवेशनल गुरू नाही. फक्त त्याला फॉलो केलं तरी जीवनात आनंद व समाधान मिळेल. तो प्रत्येकाला हिशोबात ठेऊन असतो. फक्त माणसालाच स्वत: बद्दल फार मोठे समज असतात. मुळात निसर्गाला एक गोष्ट मान्य असेल तर तिला गती असते. ते काम फार प्रयत्न न करता पुढं जात असतय. पण माणसाला हव्यास नडत असतो.
तुकाराम बोल्होबा आंबिले उर्फ संत तुकाराम म्हणून आपण ओळखतो यांना. या माणसानं कधी एम एस धोनी बघीतला नाही , किंवा डिएसके , चंद्रा ची भाषणं ऐकली नाहीत. तरी या माणसानं मोटीवेशन हजारो लाखो लोकांना दिलं आपल्या वागण्यातून.
आयुष्यभर नुसतं पांडूरंग पांडूरंग ...करत राहीला कधी यु ट्यूबवर कुणाला लाईक केलं नाही , सबस्क्राईब केल नाही पण बेल आयकॉन दाबला तो फक्त पंढरीचा....!!
आमची व आमच्या आधीची पिढी नशीबवान यासाठी कारण आयुष्यभर काय महत्वाचं आहे हे सांगणारी माणसं भेटली. उठसुट मोबाईल च्या माध्यमातून स्वत:ला घडवू पाहणारी सामाजीक रचना त्या वेळी जन्मालाच आलेली नव्हती.
जग काय म्हणेल या वाक्याला ज्या दिवशी काठेवाडी लावाल , त्या दिवशी ख-या अर्थानं आपण मोटीवेट झालो असं समजायचं. कारण मुळात आडात असेल तरच पोह-यात असतय. सुशांत सिंह राजपूतच्या अकाली व अनाकलनीय एक्जीट ने गंभीर प्रश्न दाखवून दिलेत.
खरा माणूस आतच असतो, बाहेर फक्त छानछौकी असते....!!
संकलित माहिती आणि संपादन:
विद्यार्थी मित्र प्रा.रफीक शेख,
🎓डॉ. ए.पी.जे.अब्दुल कलाम विद्यार्थी फाउंडेशन, परभणी.
https://www.vidhyarthimitra.com
Post a Comment