मी एक कोचिंग क्लासेस म्हणजेच खाजगी शिकवणी चालवणारा संचालक...तसा मी हाडामासाचा शिक्षकच..खूप स्वप्न उराशी बांधून शिक्षण घेतलं...पण कधी पैशाच्या अभावाने म्हणा, कधी मार्गदर्शनाच्या अभावाने म्हणा किंवा दुर्दैवाने म्हणा इच्छुक नोकरी मिळालीच नाही...(बरेच संचालक शिक्षण सेवक म्हणून रुजू होण्यासाठीच शिक्षण घेतात पण शासनाच्या जाचक अटी, अपुऱ्या जागा, राजकारण आणि मग आर्थिक परिस्थिती या मुळे तो हा मार्ग निवडतो ).....पण मग तो उभा राहतो एक धेय्य मनाशी ठेऊन आणि स्वतः जवळ असलेलं सगळं ओतून उभा करतो एक क्लास..त्यातही उद्देश एकच माझ्या उदरनिर्वाह बरोबर एक चांगली पिढी घडवायची, मुलांना शिक्षण तर द्यायचेच पण ते मुक्त असावे त्याला शिक्षण घेताना विषय समजून घेण्यावर जास्त भर नकी शासनाच्या फक्त कारकुनी औपचारिकता पूर्ण करायच्या..(कुणी म्हणेल की क्लासेसचे शिक्षक पैश्यासाठी काम करतात..खरं आहे ते ...पण मग अनुदानित शाळेतील शिक्षक बिनपगारी असतात का?? ).
यात मग सुरू होते अग्नी परीक्षा पार योग्य जागा शोधण्यापासून ते विद्यार्थी शोधण्यापर्यंत.... हे काम एकट्याने शक्य होत नाही मग मार्केटिंग मध्ये पैसा ओतायचा..व्यवस्थापक शोधायचे, शिक्षक शोधायचे...तेही विद्यार्थ्यांच्या मनासारखेच..या शिक्षकांचे वेतन द्यायचे ....कमी असेल पण विनाअनुदानित शाळेत कधीतरी अनुदान मिळेल म्हणून 10-15लाख भरलेल्या बिनपगारी शिक्षकांपेक्षा नक्कीच जास्त असेल...
मग येतो क्लासेसचा परवाना, दरवर्षीचा प्राप्तीकर , वाढणारे भाडे, वीज बिल, पालकांकडून शुल्क मागणी, छोटया मोठया जाहिराती...नाही म्हटले तरी माझ्या एका क्लासमुळे किमान 10-15 लोकांचं आर्थिक गणित चालतं... म्हणजे त्यांना रोजगार दिलाय हे म्हणणे ही अतिशयोक्ती नाही..आणि हे चक्र दरवर्षी सुरूच राहते...
त्यात विद्यार्थ्यांच्या निकालाची जबाबदारी पण मीच घेतो..भलेही ते ज्या शाळेत वा महाविद्यालयात शिकतात तेथील शिक्षक शासनाचा पगार घेतात जो याच पालकांकडून कर स्वरूपात वसूल केला जातो पण त्यांना प्रश्न करण्याची पालक तसदी घेत नाही..तरीही अखंड व्रत घेतल्याप्रमाणे मी माझी नैतिक जबाबदारी म्हणून विद्यार्थ्यांच्या निकालाची जबादारी घेतोच...एकेक विद्यार्थी माझ्या नजरेखाली असतो ...
एक दिवस नाही आला की काळजी वाटते की का नाही आला...शेवटी व्यावसायिक पण असावं लागतं...पालक सभा घेतो, गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करतो, गुणवंत विद्यार्थ्यांना अतिशय माफक फिस मध्ये तर कधी मोफत प्रवेश देतो ...
हे सगळं करताना माझंही कुटुंब आहे याचा विसर पडतो आणि माझा क्लासच मला कुटुंबा सारखा वाटतो....बऱ्याच वेळा तर आर्थिक झळ बसली की खूप त्रास होतो...शिक्षकांना पगार वेळेवर देता येत नाही तर त्यांचा द्वेष पण पत्करतो...प्रसंगी आहे ते सगळं गहाण ठेवतो...पण विद्यार्थ्यांना त्याची झळ पोहचणार नाही याची जीवापाड काळजी घेतो...आणि स्वतःचा उदरनिर्वाह पण चालवतो.....
हे करतोय अनेक वर्षांपासून पण कधी गेंड्याची कातडी पांघरलेल्या निगरगट्ट शासनाकडे भिकेची याचना केली नाही...कधी कोणत्या मागण्या केल्या नाही..क्लासेस क्षेत्रात जितके शिक्षक असतील तितकेच शिक्षकेतर लोकांचा रोजगार जुळलेला आहे..
पण कोरोना प्रादुर्भावाने गेल्या मार्च पासून माझा क्लास बंद आहे...आर्थिक रित्या तर खचलोच आहे पण मानसिक रित्या पण कारण विद्यार्थ्यांचा सहवास म्हणजे माझे जीवन..सात महिने झालेत कोणत्याच गोष्टी थांबल्या नाहीत..घर भाडे, क्लास चे भाडे, बिल आणि कर्जाचे हफ्ते..वाढत चाललेत...थांबलय ते शिक्षण, आर्थिक अवाक, शिक्षकांचे वेतन ...काळजी म्हणून सगळं सहन केलं..आता शासनाने अनलॉक करताना हळूहळू सगळं सुरू केलं पण शाळा आणि क्लासेसला अजूनही सुरू करण्यासाठी परवानगी दिली नाही...दारूचे दुकाने उघडलीत, मॉल उघडलेत, राजकिय नेते मंदिर उघडण्यासाठी प्रयत्न करीत आहेत ..या सगळ्यात माझ्यासारख्या क्लासेसच्या शिक्षकांकडे प्रशासनाचे लक्ष नाही...
हे मनोगत व्यक्त करायचे नव्हते पण शासन म्हणते मुलांच्या सुरक्षेसाठी आम्ही शाळा व क्लास सुरू करणार नाही पण मी ज्या वेळेस बघतो शहरातल्या बाजारपेठेत , मॉल मध्ये मुलं मुक्त संचार करीत आहेत आणि Social Distancing चे तीन तेरा वाजलेले दिसतात...मला वाटते या पेक्षा मी नक्कीच माझ्या विद्यार्थ्यांची कितीतरी अधिक पटीने काळजी घेईल...तशीही मी घेतोच....
आता धीर सुटतोय... रात्र रात्र झोप येत नाही...विचारांनी ग्रासलोय..पण तरीही प्रयत्नशील आहे पुन्हा उभा राहण्यासाठी... एका संधीची..पालकांनाही विनंती की आपण या विषयी प्रशासनाला विचारावे..
कारण तुमच्या पाल्याच्या शैक्षणिक भवितव्यासाठी शासन किती उदासीन आहे हेच यातून दिसते....आमचे सोडा पण तुमच्या मुलांसाठी...कारण माझं झालेलं नुकसान कधी भरून निघेल मलाच माहीत नाही...खूप सांगावस वाटतंय पण थांबतो...
#एक_संचालक
Post a Comment