कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शिक्षण क्षेत्रात ऑनलाईन शिक्षण पद्धतीला सुरुवात करण्यात आली आहे. मात्र अनेकांच्या घरी संगणक नसल्याने लहानग्यांच्या हाती मोबाईल द्यावा लागत आहे. तसेच वर्क फ्रॉम होम करणार्या पालकांना मुलांच्या अभ्यासासाठीही स्वतंत्र वेळ काढावा लागतो. सोबतच वारंवार खंडित होणार विद्युत पुरवठा, नेटवर्क मिळण्यात येणार्या अडचणी, सातत्याने मुलांना मोबाईल समोर बसावे लागत असल्याने त्यांच्या आरोग्याचा प्रश्न अशा अनेक समस्या निर्माण होत आहेत. या सर्व पार्श्वभूमीवर नवशक्ति व्यासपीठच्या माध्यमातून विचारण्यात आलेल्या ऑनलाईन शिक्षणाबाबतच्या प्रश्नावर बहुसंख्य वाचकांनी या शिक्षण पद्धतीमध्ये असलेल्या त्रुटींकडे बोट दाखवत त्या त्रुटींमध्ये सुधारणा करण्याची गरज व्यक्त केली. तसेच काही वाचकांनी ऑनलाईन शिक्षण पद्धतीला काळाची गरज असल्याचे सांगत प्रशासनाकडून सर्व स्तरातील मुलांपर्यंत हे शिक्षण पोहोचण्यासाठी सोय उपलब्ध करुन देण्याची मागणी केली आहे.
🎓 ऑनलाईनचे फायद्यांपेक्षा तोटे जास्त
सध्याच्या कोरोनाच्या वातावरणात ऑनलाईन शिक्षण पध्दत सुरू झाली आहे. विद्यार्थ्यांच्या शिक्षणात, अभ्यासात खंड पडू नये, शिक्षणाचा खोळंबा होउ नये यासाठी हा नवा पर्याय सद्य परिस्थितीत सुरु केलेला आहे. यामुळे आता मुलं बाहेर न पडता घरातच बसून नेटवर बसून शिकणार आहेत. शाळा, क्लास यासाठी कुठेही न जाता घरातूनच अभ्यास होणार आहे. तसं पाहीलं तर ही पध्दत चांगली आहे. बाहेर जायला नको, शिक्षणात खंड न पडता ते सलग सुरू राहिल, मुलं नव्या तंत्राला सरावतील, जास्तीत जास्त माहिती जमवतील, जे पालक ह्या तंत्राबाबत अनभिज्ञ आहेत ते देखिल मुलांसोबत हे नव तंत्र जाणून घेतील, अवगत करतील पण हे केवळ अशा ठिकाणी जिथे विजेचा लपंडाव नाही, नेटचा काही प्रॉब्लेम नाही अशा ठिकाणीच हे सुरळीत सुरु राहील आणि ही ऑनलाइन शिक्षणपध्दत यशस्वी ठरेल, लोकप्रिय होईल, फायदेशीरही ठरेल. सध्या शाळांचा अभ्यासक्रम ऑनलाईन सुरुही झाला आहे पण शाळेतल्या मुलांना तो आवडत नाही हेही तितकेच खरे आहे. नेहमी मित्रमैत्रीणींच्या गराडय़ात शाळेत जाणार्या मुलांना हा एकलेकोंडेपणाचा मार्ग रुचलेला नाही परंतु सद्य स्थितीत त्या शिवाय पर्याय नाही असे पालक त्यांना पटवून देत आहेत. जिथे विद्युतपुरवठा वारंवार खंडीत होतो, नेटवर्क मिळण्यास अडचण येत असेल त्या ठिकाणी ह्या ऑनलाईन शिक्षणपध्दतीचा पर्याय पुरता फसणार हे मात्र नक्की.
मुलांना त्याचा काहीही फायदा होणार नाही. तसेच याचा आणखीन एक तोटा म्हणजे मुलं अहोरात्र मोबाईलच्या निकटच्या संपर्कात रहाणार. ज्या मोबाईलचं मुलांच वाढणारं वेड कमी कसं करावं या विवंचनेनं आधीच हवालदिल झालेल्या पालकांना आता ऑनलाईन अभ्यासासाठी मुलांना मोबाईल नाइलाजास्तव सतत द्यावा लागणार आहे. त्यामुळे सतत मोबाईलमधे डोळे घालून बसणार्या मुलांच्या आरोग्याचा एक भला मोठा प्रश्न ऐरणीवर आला आहे. तसेच नोकरी करणारे पालक जे स्वतः वर्क फ्रॉम होम करत आहेत त्यांना आता मुलांच्या ऑन लाइन अभ्यासासाठी वेगळा वेळ काढावा लागणार आहे. त्यामुळे ताण येणारच, मधेच नेट बंद पडणार, नेटचा वेग मंदावणार अशा गोष्टी सातत्याने होणार, घरात एकापेक्षा जास्त लॅपटॉपची गरज भासणार नेटवर्क कोलमडणार आणि अभ्यासात, कामात अडथळा येणार. असे काही फायदे तर काही तोटे या ऑनलाईन शिक्षण पध्दतीचे आहेत.
– मनीषा शेखर ताम्हणे बोरीवली
🎓 ऑनलाईन शिक्षण निरुपयोगी..!
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शिक्षण क्षेत्रात ऑनलाईन शिक्षण पद्धतीला सुरुवात करण्यात आली आहे. ऑनलाईन अभ्यास करायचा म्हटलं तर त्यासाठी घरी स्वतःचा संगणक किंवा अद्ययावत दर्जाचा मोबाईल फोन असणं अत्यंत आवश्यक आहे. तसा असेल तरी दर महिन्याला नेट रिचार्ज वेळेवर भरुन घेणं आवश्यक आहे. ज्यांची आर्थिक ऐपत आहे त्यांच्यासाठी ठीक आहे. परंतु, सर्वसामान्य माणसाच्या उपजीविकेचे सगळे मार्ग बंद आहेत. कुटुंबासह दोन वेळच्या जेवणाची चिंता आहे, अशा पालकांना दर महिन्याला मोबाईल रिचार्ज करणं परवडणारं आहे? ग्रामीण भागात पावसाळ्यात विद्युतपुरवठा वारंवार खंडीत होतो. नेटवर्कची समस्या भेडसावत असते. अशावेळी विद्यार्थी ऑनलाईन शिक्षण कसे घेणार? त्यामुळे ऑनलाईन शिक्षण पद्धती ग्रामीण भागातील जनतेसाठी निरुपयोगी ठरणार आहे.
– सुधीर कनगुटकर, दिवा (पूर्व)
🎓 कायमस्वरुपी उपाय हवा
ऑनलाईन शिक्षण हा पर्याय पूर्णतः योग्य नाही. त्याकरिता आपल्याकडे पायाभूत सुविधा नाहीत, शिवाय गरिबांना ते परवडणारे नाही. ऑनलाईनद्वारे सर्वच मुले शिकतील याची शास्वती नाही. ऑनलाईन शिक्षण पद्धती काहींसाठी समाधान तर काहींसाठी समस्या बनलेली आहे. कोरोना विषाणूने मानवाच्या जीवन पद्धतीमध्ये मोठा बदल घडवून आणला आहे. त्यातच सर्वात महत्त्वाचा बदल म्हणजे ऑनलाईन शिक्षण पद्धत. माझ्या मते ऑनलाईन शिक्षण ही काळाची गरज असली, तरी ही पद्धत तेवढी लाभदायक नक्कीच नाही. पूर्वीच्या काळातील शिक्षण आणि आत्ताची शिक्षण पद्धती यात काळानुसारखूप मोठा फरक झाला आहे हे आपण सगळेच जाणतो. समोरासमोर शिकवल जाणार शिक्षण हे नक्कीच प्रभावी माध्यम आहे. तेवढं ऑनलाइन शिक्षण प्रभावी होत नाही. ऑनलाईन मध्ये खूप समस्या येत असतात. विशेष म्हणजे ग्रामीण भागात तर नेटवर्कची खूप अडचण येते. त्यामुळे ऑनाइनल शिक्षण पद्धतीमध्ये शिक्षण कमी आणि मनस्ताप जास्त दिसून येतो. त्यामुळे ऑनलाइन पद्धत सरसकट सर्वांना मानवणारी नाही. ऑनलाइन म्हणजेच डिजिटल शिक्षण अडचणीच्या काळात अपरिहार्य कारणास्त स्वीकारण्यात आली असली तरी कायमस्वरूपी इलाज असू शकत नाही. देशभरात ऑनलाइन शिक्षण घेण्यात 30 टक्के वाढ झाली असली, तरी ती केवळ महानगरांपुरती मर्यादित आहे. इंटरनेट उपलब्धता, त्याचा स्पीड, आधुनिक साधनांची उपलब्धता, शिक्षण संस्थांमधील पायाभूत यंत्रणा, शिक्षकांचे प्रशिक्षण, शिक्षक- विद्यार्थी- पालक यांची मानसिकता, त्यांचे तंत्रज्ञान हाताळणीचे कसब, प्रत्येकाची आर्थिक परिस्थिती असे अनेक प्रश्न समोर आहे. अल्प उत्पन्न आणि उच्च उत्पन्न कुटुंबातील मुलांमधील शिक्षणाची दरी अधिक रुंदावत आहे असे दिसते. अल्प उत्पन्न कुटुंबातील मुलांची कौटुंबिक परिस्थिती घरातील शाळांसाठी पोषक नसते. सामान्यतः ऑनलाइन शिक्षणासाठी संगणक आणि इंटरनेट जोडणी या दोन मूलभूत गोष्टींची आवश्यकता असते. मात्र, भारतात आज असे कोटय़वधी कुटुंबे आहेत की, ज्यांना इंटरनेट जोडणी परवडत नाही. तसेच या कुटुंबांतील मुलांना धड गृहपाठ करण्याइतपतही मोकळी जागा घरात उपलब्ध नसते. रोजच्या जगण्यासाठी धडपड करताना त्यांच्या डोक्यात तर मुलांच्या शिक्षणाचा विचारही नाही. शहरातील मुले ऑनलाइन शिक्षणाला लागलेली असताना आदिवासी भागातील मुले शेळ्या-मेंढय़ा सांभाळण्याचे काम करीत आहेत. कित्येकांना तर चार भिंतींचे घरही नशिबात नसते. असे विद्यार्थी ऑनलाइन शिक्षण कसे घेतील हा कायमप्रश्नच आहे. सरकारने एकूणच शिक्षण पद्धतीवर कायमस्वरूपी योग्य उपाययोजना करणे गरजेचे आहे.
– वैशाली आहेर पालघर…
🎓 शिक्षणाच्या नावाने चांगभलं
कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावमुळे अनेकांच्या जीवनशैलीमध्ये फार मोठा फरक पडत चालला आहे. ऑफिस मध्ये आठ-आठ तास काम करणारा नोकरदार वर्ग आज घरात एकाच ठिकाणी बसून वर्क फ्रॉम होमच्या नावाखाली बोर झाला आहे. मग मुलांची काय अवस्था झाली असेल. गेल्या शंभर दिवसापासून घरातच कोंडून राहावे लागल्यामुळे त्यांना घरात अस्वस्थ वाटू लागले आहे आणि लॉकडाऊन मुळे शाळा कॉलेज उघडणार नसल्याने आता घरातच बसून ऑनलाईन शिक्षण घ्यावे लागणार. आता शिक्षण क्षेत्रात ऑनलाईन क्रांतीचा उगम झाला आणि हे कुठं पर्यंत चालेल सांगता येणार नाही. ऑनलाईन शिक्षण घ्यायचे झाले तर तासंतास कम्प्युटर आणि मोबाईल समोर बसावे लागेल. शिवाय नेटवर्क च्या समस्या विद्यार्थी वर्गासमोर आ वासुन उभ्या आहेच. मुंबईत जरी मोबाईलचे नेटवर्क चांगले असले तरी खेडयात राहणार्या विद्यार्थ्यांचे काय? आज ही गावच्या ठिकाणी दोन दोन दिवस लाईट येत नाही मग मुलांनी मोबाईल चार्जिंग करायचे कुठे? याचा शिक्षण मंत्र्यांनी विचार केला आहे का? ऑनलाईन शिक्षण श्रीमंतांची मुले घेतील त्यांना परवडेलही, गरीब विद्यार्थ्यांनी शिक्षण सोडून द्यायचे काय? ऑनलाईन शिक्षणाच्या नावाखाली शाळा, कॉलेजची फी पालकांकडून उकळण्याचा पुरेपूर प्रयत्न शिक्षण खात्याकडून होत आहे. त्यांना विद्यार्थी वर्गाच्या समस्यांचे काही देणे घेणे नाही. कोरोनाने खर्या अर्थाने शिक्षणाचे चांगभलं करून टाकले आहे.
– दत्ता श्रावण खंदारे, धारावी…
🎓 ऑनलाईनमधील त्रुटी दूर करण्याची आवश्यकता
कोरोनाच्या साथीमुळे शिक्षणावर न भुतो… अशी बंधने आली आहेत. विद्यालयांमध्ये प्रत्यक्ष जाऊन शिक्षण घेणे धोक्याचे झाले आहे. त्यामुळे ऑनलाइन शिक्षण हाच पर्याय उरला आहे. आपल्या देशात शिक्षण क्षेत्रामध्ये आधुनिक साधने उपलब्ध असतानाही बहुतांश ठिकाणी पारंपारिक म्हणजेच ऑन-कॅम्पस पद्धत रूढ आहे. त्यामुळे ऑनलाईन शिक्षण पद्धतीमध्ये संक्रमण करताना भारतासह जगातील सर्वच शिक्षण संस्थांसमोर मोठे आव्हान आहे. ऑनलाईन शिक्षण पद्धतीचे भरपूर फायदे आहेत. पण त्याचबरोबर काही त्रुटी व तोटे आहेत. या त्रुटी दूर करून नवे पर्याय शोधावेच लागतील. मुख्य म्हणजे अशा परिस्थितीची कोणतीही पूर्वकल्पना नसल्याने यथोचित ऑनलाइन शिक्षण साधने उपलब्ध होण्यास काही काळ लागू शकतो. सध्या काही संस्थांनी ऑनलाइन पद्धत स्विकारलेली आहे व ती बर्यापैकी यशस्वी होत आहे. ऑनलाईन शिक्षण पद्धतीमध्ये विद्यार्थ्यांना एकाग्र ठेवणे व त्यांच्यावर वैयक्तिक लक्ष देणे कठीण आहे. अभियांत्रिकी, वैद्यकशात्र, किंवा तत्सम अभ्यासक्रमांमध्ये प्रात्यक्षिक सहभागाशिवाय शिक्षण देणे आणि घेणे अशक्यप्राय आहे. म्हणजेच संपूर्णपणे ऑनलाईन शिक्षण होऊ शकत नाही. त्यासाठी वेगळ्या पद्धती आणि नियम बनवावे लागतील. ज्या ठिकाणी अद्ययावत संगणकीय सुविधा उपलब्ध नसतील तेथे त्या पुरवाव्या लागतील. ऑनलाइन शिक्षण ही आजच्या परिस्थितीतील अपरिहार्यता असली तरी हा कायमस्वरूपी तोडगा नव्हे. देशात आज ऑनलाइन शिक्षणाचे प्रमाण 30 टक्के आहे. परंतु हे फक्त महानगरांमध्ये आढळते. इंटरनेटची तसेच विजेची उपलब्धता, स्पीड, संस्थांमधील यंत्रणा, शिक्षकांचे प्रशिक्षण, शिक्षक व विद्यार्थी यांचे कसब अशा अनेक पैलुंवर याचे यश अवलंबून आहे. ऑनलाईन शिक्षणासाठी परीक्षा पद्धतीमध्ये आमुलाग्र बदल करावे लागतील. त्याचबरोबर हॅकिंग /व्हायरस सारख्या समस्यांसाठी खात्रीलायक उपाय योजावे लागतील. मुंबई विद्यापीठामध्ये आजही दूरःस्थ / बहिःशाल विभागात ऑनलाईन पद्धत असूनही विद्यार्थ्यांना प्रवेश घेण्यासाठी विद्यापीठात प्रत्यक्ष जावे लागतेच. अशा पार्श्वभूमीवर आपण या नव्या संकटास किती प्रभावीपणे तोंड देऊ शकू याबाबत साशंकता आहे. पण विद्यार्थ्यांचे आयुष्यातील किमान एक वर्ष वाया जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे ते टाळण्यासाठी ऑनलाइन शिक्षण अपरिहार्य आहे. मात्र त्यातील त्रुटी आपल्याला जाणीवपूर्वक व चौकटीबाहेरचे परिश्रम घेऊन दूर कराव्या लागतील.
– सोनल प्रवीण कदम मुलुंड…
🎓 शिक्षण देण्यासाठी इतर मार्गांचा विचार व्हावा
ऑनलाइन वर्गाना प्रोत्साहन देण्याच्या सरकारच्या निर्णयावर कोणी प्रश्नचिन्ह उपस्थित करत असेल तर ते देशविरोधी कृत्य आहे अशी टिप्पणी उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने केली व ऑनलाइन शिक्षणासाठी प्रमाणित कार्यप्रणालीत नेमक्या काय त्रुटी, विसंगती आहेत याचा पुरावा देण्यासाठी याचिका करत्यांना सांगण्यात आले आहे. तर दुसरीकडे आपल्या देशाचे पंतप्रधान म्हणत आहेत की 80 कोटी जनतेला म्हणजे देशाच्या एकूण 60 टक्के जनतेला अन्नधान्य करोना काळात पुरवण्यात आले. म्हणजे पंतप्रधान यांच्या मते 60 टक्के भारतीय जनता अशी आहे ज्यांना अन्नधान्य विकत घेता येऊ शकत नाही आहे मग ऑनलाइन शाळेसाठी लागणारी साधन सामुग्री ही लोक कशी आणणार? याचा देखील विचार होणे गरजेचे आहे. तसेच शिक्षण हे फक्त पाठय़पुस्तकांच्या अभ्यासक्रमातूनच मिळते का? याच काळात लीलाताई यांना देवआज्ञा झाली व त्यांच्या वरील लेख बर्याच पेपर मध्ये आले त्यांनी चालू केलेल्या व त्यांच्या शाळेत गिरवले जाणार्या धडय़ाचे उदाहरण आपल्या समोर आहेच मग हा ऑनलाइनचा अट्टाहास कशाला व कोणासाठी? देशात अशी अनेक खेडी आहेत जिथे अजून वीज पोहोचली नाही इंटरनेट सोडाच पण साधा फोन देखील नाही मग तिथल्या मुलांचा प्रश्न कसा सोडवणार? अनेक शहरांत दोन्ही पालक नोकरी करतात त्यामूळे पाल्यावर लक्ष कसे ठेवणार हा देखील एक प्रश्न आहेच जास्तकाळ मोबाईल अथवा लॅपटॉप समोर बसल्याने डोळ्यांचे आजार चालू होतील ती वेगळी गोष्ट. इतर कोणत्या पद्धतीने शिक्षण देता येईल का? याचा विचार करावा लागेल. उदाहरण द्यायचे झाले तर घरातील धान्य सोलताना मोजायला लावल्यास त्यात पण शिक्षण मिळेलच ना? मग आपण आपली शिक्षणाची व्यख्या फक्त पुस्तकातील अभ्यासक्रमापुरता मर्यादित का ठेवावी..?
– महेश मलुष्टे मुंबई…
🎓 ऑनलाईन पद्धतीने स्वयं अध्ययन काळाची गरज
आजचा विद्यार्थी आणि त्याचे शिक्षण कोरोनामुळे लॉकडाऊन झाले आहे. त्याला पर्याय म्हणून ऑनलाइन शिक्षण अवलंबिले. विद्यार्थ्यांचे वय आणि त्यांची मानसिकता लक्षात घेऊन प्रत्येक इयत्तेनुसार ऑनलाईन अध्यापनाचे तास याचा तक्ता वृत्तवाहिन्यांनी प्रसारीत केला आणि आज त्याचे अवलोकन होत आहे. मुले गेम खेळण्यासाठी 2-3 तास मोबाईल सहज हातात घेऊन असतात त्यामुळे ऑनलाईनमुळे आरोग्यास धोका होण्याच्या शक्यतेबाबत कोणताही आक्षेप नाही. शिवाय डिजिटल जगात जगण्याचा नवीन अनुभव त्यांना मिळतोय ही चांगली गोष्ट आहे. पण आता प्रश्न येतोय ज्यांच्याकडे मोबाईल किवा संगणक नाहीत त्यांचे काय? विजेची समस्या ही पण आहेच. लहान मुले पालकांच्या धाकाने वेळीच मोबाईल पासुन दुर जातात पण युवक मात्र फोन मध्ये जास्त गुंतत आहेत. तसेच यामुळे तांत्रिक अडचणीही निर्माण झाल्या आहेत. शिवाय पालक -शाळा – शिक्षक – विद्यार्थी यांचा एकमेकांशी असलेला सहसंबंध तुटत आहे. काही ठिकाणी फीच्या माध्यमातून शैक्षणिक लूट सुरू आहे. आज परिस्थिती अशी आहे की पालकांनी आपला वेळ, पैसा आणि मोबाईल जरी उपलब्ध करून दिला तरी त्याचा प्रतिसाद 100% मिळतोच अस नाही. त्यामुळे ही उठाठेव कुणासाठी आहे शाळेसाठी की विद्यार्थ्यांसाठी? कॉलेज मधील विद्यार्थ्यांसाठी स्वयं अध्ययन ही संकल्पना उत्तम आहे. तसेच शालेय विद्यार्थ्यांसाठी दूरदर्शनवर प्रत्येक इयत्तेसाठी विषय आणि वेळ यांचे संतुलन साधून अध्यापन करावे. मूल्यमापन सक्तीचे करावे. पालकांनी हाच अभ्यास शाळेत जमा करावा. शिक्षकांनी त्यासाठी मार्गदर्शन करावे त्यामुळे विद्यार्थी अभ्यासात गुंततील. पालक -शाळा – शिक्षक – विद्यार्थी यांचे सहसंबंध जोपासले जातील आणि कोरोनाची भीतीही कमी होईल. – प्राची पाटील शहाबाज, पोयनाड….
🎓 ऑनलाईन शिक्षणामुळे विद्यार्थ्यांचा सामाजिक दुरावा वाढू लागेल
सध्या कोरोनाच्या जागतिक संकटामुळे शाळा बंद आहेत. शाळा सुरु करण्याजोगी परिस्थिती कधी निर्माण होईल, हे आज सांगता येणे कठीण आहे. भारतीय संविधानानुसार शिक्षण हा मुलांचा मूलभूत अधिकार आहे. ते देण्याचे माध्यम कोणते असावे ते मात्र सरकारला ठरवावे लागेल. विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून सरकारने यंदाचं शैक्षणिक वर्ष ऑनलाइन पद्धतीने सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. सध्याच्या तंत्रज्ञानाच्या युगात व कोरोना संकटाशी लढण्यासाठी शासनाने घेतलेला हा ऑनलाईन शिक्षण पद्धतीचा उपक्रम अतिशय स्तुत्य आणि कौतुकास्पद आहे. शहरी भागात श्रीमंतांसाठी हे सोप्प आहे. परंतु ग्रामीण भागातील गरीब मुलांसाठी हे एक आव्हानच असणार आहे. गरीब व रोजंदारी करणार्या कुटुंबातील मुलांची अवस्था बिकट आहे. टी.व्ही. हप्ता अथवा केबल बिल न दिल्याने बंद आहे, मोबाईल चार्ज करायला पैसे नाही. त्यामुळे मोबाईल फोन सुद्धा लोक कमी वापरतात. पालक मोबाईल बाहेर घेऊन गेले तर मुले ऑनलाईन शिक्षण कशी घेतील? काही प्राथमिक शाळा विद्यार्थ्यांबरोबर पालकांना सुद्धा मुलांच्या मदतीसाठी ऑनलाईन हजर राहावयास सांगत आहेत. कामासाठी घराबाहेर पडणार्या पालकांना हे शक्य होणार नाही. मूल जी सतत टीव्ही बघतात त्यांना मानसिक व शारीरिक त्रास किंवा दुखापत होत होती हे आपण बघत होतो. ही सगळी आव्हाने असताना आता तर ऑनलाईन शिक्षण आलं आहे. त्यामुळे इंटरनेटवर नियंत्रण कस ठेवायचं? सतत स्क्रीन पाहून डोळ्यांना त्रास होणे, डोळे लाल होणे, ड्राय होणे या सगळ्या तक्रारी आणखीन वाढतील. तसेच काही मुलांच्या घरी खूप लोक राहतात. ज्यांना भावंडे जास्त आहेत त्यांच्याकडे तेवढी पुरेशी ग्याझेटस नाहीत. इंटरनेटची कमी आहे, यांची अवस्था वैफल्यग्रस्त आहे. ऑनलाईन शिक्षण पद्धती योग्य पद्धतीने आणि एकाही विद्यार्थ्यावर अन्याय होऊ न देता राबवायची असेल, तर ग्रामीण व दुर्गम भागात काही मूलभूत गोष्टींची तात्काळ पूर्तता होणे आवश्यक आहे. त्यासाठी चोवीस तास विद्युत पुरवठा, मोबाईल सिग्नल क्षमता व एकाच वेळी तेवढे मोबाइलला चालू ठेवण्याची क्षमता ठेवावी लागेल. ऑनलाईन शिक्षणाच्या काही मर्यादांमुळे पारंपारिक शालेय शिक्षण आणि शाळांना तो संपूर्ण पर्याय ठरेलच असे नाही. जे विषय ऑनलाईन शिकता येणे शक्य आहे त्यांचे अध्यापन-अध्ययन ऑनलाईन होणे शक्य आहे. परंतु जे विषय प्रत्यक्ष एकत्र येऊनच शिकावे लागतात अथवा प्रयोगशाळांमधून दिले जाणारे शिक्षण हे ऑनलाईन माध्यमांमधून देता येणे अत्यंत अवघड किंवा कदाचित अशक्य आहे. त्यासाठी शाळांसारख्या संस्थां एकत्र येणे गरजेचे आहे, अशा दोन्ही पद्धतींचा वापर येणार्या काळात करावा लागेल. त्याचबरोबर मूल्यमापनाच्या पद्धतींमध्ये प्रमाणीकरण करून त्या ऑनलाईन पद्धतीने राबवता येतील. मुले शाळेत शिक्षणासाठी जातात तेंव्हा मित्रांमध्ये व शिक्षकांशी संवाद साधून आपल्या भावना अथवा चांगल्या वाईट गोष्टी शेअर करतात. त्यामुळे त्यांचे मानसिक आरोग्य चांगले राहते. आत्ताच्या परिस्थितीत विशेषत्वाने शाळेने मुलांच्या सद्यस्थितीतल्या जगण्याची दखल घेणं फार महत्वाचं आहे. मुले आत्ता काय करत आहेत, लॉकडाऊनच्या काळात त्यांनी आपला दिवस घालवण्यासाठी काही सकारात्मक पर्याय शोधले आहेत का, काही नवीन गोष्टी शिकायचा प्रयत्न केला आहे का, त्यांच्यापैकी कोणाला गंभीर, दुःखदायी अनुभवांना सामोरं जावं लागलं आहे का, त्यांच्या घरात पुरेसं अन्न-धान्य आहे ना, त्यांच्या कुटुंबाला अर्थिक-मानसिक विवंचना आहेत का आणि त्याचा परिणाम मुलांवर होतो आहे का, कोणाला शारिरीक-मानसिक हिंसेला तोंड द्यावं लागलं आहे का, हे सगळे प्रश्न महत्त्वाचे आहेत. शाळांना मुलांची परिस्थिती अवगत असणे अगत्याचे आहे. शिक्षकांनी मुलांशी विविध माध्यमातून संवाद साधून मुलांची स्थिती समजावून घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे. फोनवरून मैत्रीपूर्ण संवाद साधून विद्यार्थ्यांच्या समस्या जाणून घेऊन त्यांना आम्ही तुमच्यासोबत आहोत हा दिलासा देणारी `स्नेहसेतू योजना’ आखली पाहिजे. ग्रामीण भागात अथवा गरीब मुलांना या प्रकारच्या शिक्षणासाठी सरकार व इतर संस्थाच्या मदतीवर अवलंबून राहावे लागणार आहे. अनेक सरकारी आणि खासगी संस्थांनी एकमेकांशी समन्वय साधत प्रयत्न केले तर संपूर्णपणे आधुनिक आणि सर्वांना उपलब्ध अशी नवी शिक्षण व्यवस्था आपण उभी करू शकू अन्यथा ऑनलाईन शिक्षणामुळे सामाजिक दुरावा वाढू लागेल.
– प्रमिला श. जाधव, कुलाबा…
🎓 ऑनलाईन पद्धती उपयुक्त नाही.
कोरोनाच्या संकटाने उद्भवलेल्या गंभीर परिस्थितीमुळे शाळा सुरू करणे शक्य नाही. त्याला पर्याय म्हणून ऑनलाईन शिक्षणाचा पर्याय समोर येत आहे. पण आपल्या देशात ऑनलालाईन शिक्षण हा पर्याय उपयुक्त नाही. त्यात इंटनेट प्रॉब्लेम साबतच अनेक तांत्रिक अडचणी आहेतच. पण आपली शिक्षण पध्दती मुळात शिक्षक आणि विद्यार्थी यांच्यातल्या संवादाला जास्त महत्व देते. पाश्चात्यांकडे शिक्षण पध्दती आपल्या सारखी नाही. त्यांच्याकडे आधीपासुनच ऑनलाईन शिक्षण पध्दती आहे. आपला आभ्यासक्रम ऑनलाईन शिक्षणासाठी उपयुक्त नाही. संगणकाचे प्राथमिक ज्ञानही नसलेला शिक्षक वर्ग मोठय़ा प्रमाणावर आहे. पहिले त्यांना प्रशिक्षण देण्यातच दोन महिने निघुन जातील. शिक्षक आणि विद्यार्थी समोरासमोर नसल्याने जो संवाद व्हायला हवा तो होणार नाही. परिणामी हा प्रयोग कंटाळवाणा होऊ शकतो.
– संगीता करवंदे, पुणे…
🎓 गरीब विद्यार्थ्यांचा विचार व्हावा
प्रथमता ऑनलाइन शिक्षण हे मुलांना कसे असते हे चांगल्या प्रकारे समजून सांगणे गरजेचे आहे. यात पण भरपूर तांत्रिक बाबी आहेत, जसे कधी माईक ऑन/ऑफ ठेवावा, समोरच्याला कधी पिन करावे, ऑनलाइन असतानाच टेक्स्ट मेसेज चॅट कसे करावे या असंख्य बाबी मुलांना प्रथमता शिकवाव्या लागतील. यासाठी त्यांच्या पालकांना प्रेरित करावे लागेल. ऑनलाईन पद्धती ही संकल्पना भारतात जरी नवीन असली तरी प्रगत देशात ती काही वर्षांपूर्वीपासून आहे. आपण जरी प्रगतशील देशांमध्ये मोडत असलो तरी आपल्या येथे गरीब जनतेचे प्रमाण फार मोठे आहे. यांना तर उद्या काय आपण खाऊ याचा पत्ता नाही. काहीजणांनी तर मोबाईल किंवा लॅपटॉप हातात घेतलाहि नसेल. ही सत्य परिस्थिती आहे, कदाचित आपणास ते पटणार नाही. कारण आपण शहरात राहतो. येथे आपणास सहज सगळ्या सुखसोयी उपलब्ध असतात. कोरोनाच्या काळात तर अशा गरीब लोकांची परिस्थिती फारच बिकट होत आहे. अशा लोकांना ऑनलाइन शिक्षण हे स्वप्नवत व अशक्य बाब आहे, सरकारने या बाबत विचार करणे फार जरुरी आहे.
– उमेश गजानन मुरकर…
🎓 ऑनलाईन तात्पुतरेच योग्य
कोरोनाच्या चाहूलीने हबकलेल्या सरकारने सर्व शिक्षणसंस्था बंद केल्या आणि नंतर लॉकडाऊन जाहीर झाल्याने विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचे काय असा? प्रश्न पडला आणि त्यावर ऑनलाइन शिक्षणाचा उपाय सर्वांनी शोधला. तात्पुरती व्यवस्था म्हणून ऑनलाइन शिक्षणाचा पर्याय ठीक असला तरी तो कायम होणे योग्य ठरणार नाही. शाळेत वा कॉलेजमध्ये फक्त अभ्यासक्रम शिकविला जात नाही तर विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्न होतात. तसेच इतरांशी कसे वागावं, वेळ पडल्यास आपला हट्ट सोडून देणे, दुसर्यांचं कौतुक करणे, सामुदायिक खेळातूनही खूप शिकायला मिळते. शिक्षकांशी रोज भेट झाल्याने एक वेगळं नातं तयार होतं. रोज शाळेत गेल्याने शाळेबद्दल आत्मियता वाटायला लागते. हे सर्व ऑनलाइन शिक्षणात होत नाही. हल्ली तसंही घरटी एक मूल असल्याने एकलकोंडी वृत्ती वाढीस लागली आहे ती ऑनलाईन शिक्षणाने वाढण्याचा धोका संभवतो. आता कोरोनासोबतच जगायचे असल्याने ऑनलाइन शिक्षण किती काळ चालू ठेवायचे ह्याचा गांभीर्याने विचार व्हायला पाहिजे. कारण खरंखुरं ऑनलाइन शिक्षण घेण्यासाठी लॅपटॉप किंवा संगणक हवा ज्यामुळे शिकायला बरे पडेल. आणि आता ह्या क्षणाला सर्वांना ती सोय उपलब्ध होऊ शकत नाही हेही वास्तव आहे.
– माया हेमंत भाटकर, चारकोप गाव…
🎓 ऑनलाईनचा अट्टहास नको
कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे शाळा कधी चालू होणार याबाबत अनिश्चितता आहे. त्यावर तोडगा म्हणून बर्याच शाळांनी ऑनलाईन शिक्षणाचा पर्याय निवडला.
इंटरनॅशनल स्कूलसाठी हा पर्याय शक्य आहे, पण बाकी शाळा आणि खास करून जिल्हा परिषदेच्या शाळांसाठी हा पर्याय अशक्यच आहे. त्याठिकाणी ऑनलाईन शिक्षणासाठी लागणारी अत्यावत आणि आधुनिक तंत्रज्ञ आणि सामुग्री ही सहजरित्या उपलब्ध नाही. शहरी आणि ग्रामीण भाग यामधील शैक्षणिक सामाजिक दरी अशाने वाढत जाणार असून याकडेही शिक्षणमंडळाने लक्ष द्यायला हवे. मुलांच्या दृष्टीनेही ऑनलाईन शिक्षणाने आरोग्यावर होणारा परिणाम खास करून डोळ्यावर होणार सततचा ताण (जी मुलं मोबाईलचा वापर करत असतील) हा गंभीर स्वरूपाचा असणार आहे. या आणि अशा अनेक अडचणी असताना ऑनलाईन शिक्षणाचा अट्टाहास करणे कितपत योग्य आहे?
– पूर्णिमा नार्वेकर, दहिसर…
🎓 ऑनलाईन शिक्षण, अडचणीच फार
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शिक्षणा पासून कुणीही विद्यार्थी वंचित राहू नये, विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होता कामा नये या भावनेतून शालेय शिक्षण विभागाने ऑनलाइन शिक्षणास प्राधान्य देत शैक्षणिक वर्ष सुरु करण्याचा निर्णय घेतलाय किंवा घ्यावा लागलाही, हे जरी खर असल तरी मात्र ज्यांच्याकडे लॅपटॉप, टॅब, स्मार्टफोन आदि सुविधा आहेत किंवा घेऊ शकतात अशा शहरातील सदन, चाकरमानी शिक्षित पालक आपल्या मुलांना सहज ऑनलाइन शिक्षण देवू शकतात, परंतु वीज खंडित होणे, बिघाड होणे या गोष्टिना पालक कसं आवर घालणार? शहरात राहतट म्हणून सर्वच पालकांकडे ऑनलाइन शिक्षणाची आयुध असतातच असे नाही किंबहुना मुलांना अभ्यास समजावून सांगण्या इतपत सक्षम असतातच असेही नाही. शाळेत प्रत्यक्ष जेवढा अभ्यास होतो त्याच्या अर्ध्यानेही घरात ऑनलाइन अभ्यास मूल एकाग्रपणे करू शकत नाही हेही तेवढेच सत्य होय.
– विश्वनाथ पंडित, चिपळूण…
🎓 अवघड पण अशक्य नाही...!
जगाचा कारभार हा सध्या डिजिटल पद्धतीने राबवला जातो त्यामुळे ऑनलाईन शिक्षण त्यासाठी प्रमाणित कार्यप्रणाली यामुळे नुकसान होण्या ऐवजी आपण पुरोगामी होण्याच्या दिशेने एक महत्वाचे पाऊल टाकले आहे. ऑनलाईन शिक्षणामुळे तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात देशाची स्थिती आणखी मजबूत होण्यास हातभार लागेल. शिक्षण व वर्क टू होम ह्याचा मेळ बसवणे तशी तारेवरची कसरतच. यात अनंत अडचणी निर्माण होत असणार यात शंका नाही. मुलं उघडपणे संगणक व मोबाईल हाती देण्यास भाग पाडले. पालकांना ह्या निमित्ताने मुलांवर लक्ष ठेवणे त्यांचा अभ्यास घेणे
त्याच बरोबर स्वतःचे ऑफिसचे काम हि करणे आवश्यक जरी असले तरी स्वतःवर व मुलांवर मानसिक शारीरिक ताण येऊ न देणे यासाठी व्यायाम,पोषक आहार ह्याच बरोबर नात्यापेक्षा मित्रत्वाच्या भावनेने कार्य सिद्धीस नेले तर अशक्य काहीच नाही. ऑनलाईन हि काळाची गरज आहे.
– यशवंतराव चव्हाण, सीबीडी….
🙏🏻 सौजन्याने आणि साभार:
नवशक्ती
Post a Comment