पुस्तक हेचि गुरु....! ज्ञानाचे महामेरु..!
दि. २३ एप्रिल ! : जागतिक पुस्तक दिन!
"पुस्तकं..!"
पुस्तकं शिकवतात जगावं कसं आयुष्य
पुस्तकं शिकवतात घडवावं कसं भविष्य
पुस्तकातून कळते यशवंतांची, शुरांची कथा
पुस्तकातून कळते गीता,बायबल, कुराण,गाथा
पुस्तकात असते विज्ञान तंत्रज्ञानाची कहाणी
पुस्तकं वाचून झालीत अवघी माणसं शहाणी
पुस्तकं सांगतात मनामनातल्या गुजगोष्टी
पुस्तकात तरंगतात जंगल डोंगर सारी सृष्टी
पुस्तकं म्हणतात घे उंच गगन भरारी
पुस्तकं हरलेल्यांना देतात नव संजीवन उभारी
कधी मनास वाटला एकटेपणा एकांतवास
तेव्हा पुस्तकं उचला, येईल जिवंतपणा हमखास..
जगप्रसिध्द साहित्यिक शेक्सपिअरचा जन्मदिन तसेच मृत्यूदिन ही!
पुस्तके ...अर्थातच ग्रंथ...!
ज्यांनी आमच्या ज्ञानाचा,आमच्या व्यक्तिमत्वाचा,पाया रचून..!
आमच्या प्रतिभेला सोनकळस चढविला..
त्या पुस्तकांचे..! ऋण व्यक्त करण्याचा हा दिवस...!
वाचन संस्कृती रुजविणे, वृध्दींगत करणे, संरक्षित करणे आणि संक्रमित करणे हा या दिवसाचा मुख्य हेतू...!
ज्यांना लहानपणापासूनच जेवतांना, रिकामे बसलेले असतांना वा निद्रा देवीची आराधना करतांना ही पुस्तक वाचनाची वाईट खोड लागलेली असते, त्यांची हिच खोड पुढे त्यांच्या व्यक्तिमत्वाचे मूळ बनते..!
सततच्या वाचनाने त्यांच्या ज्ञानाला प्रतिभेची नवपल्लवी फुटत राहते आणि पुस्तकांच्या सखोल वाचनाने त्यांच्या व्यक्तिमत्वाचे झाड अविचल अवस्थेत कायमस्वरुपी उभे राहते असा हा पुस्तक महिमा सा-यांनाच ठाऊक आहे..!
E-माध्यमांची चलती असण्याच्या या काळात, "वाचनसंस्कृती" लोप पावत चालल्याचे विदारक दृश्य जणू पुस्तकांनाच वाळवी लागल्याचे निदर्शक म्हणून उभे केले जाते.
E-माध्यमात का होईना पण वाचन संस्कृती टिकून आहे..!
असे असले तरीसुद्धा पुस्तकांचे महत्व कमी झालेले नाही, होणार नाही..!
वाचन हा नुसता छंद नसतो, तर वाचनाने आपल्यावर आपल्या व्यक्तीमत्व जडणघडणीचे संस्कार होत असतात..!
स्वयंअध्ययनाने आपल्या व्यक्तीमत्वात होणारा विधायक बदल लक्षणीय असतो..!
म्हणून वाचनाची सवय स्वतःसोबतच इतरांचीही वृध्दींगत होण्यासाठी आपल्याला वाचन सवयी सोबतच पुस्तक दानाची ही सवय लागणे महत्त्वाचे आहे..!
यासाठी वाढदिवस, लग्नसमारंभ वा इतर कोणताही शैक्षणिक अथवा सामाजिक समारंभ असेल तर पुस्तक दान म्हणजेच पुस्तक भेट देण्यावर जाणीवपूर्वक भर देण्यात यावा..!
अशा उपक्रमांमुळे "वाचन संस्कृती" रुजविणे, वृध्दींगत करणे, संरक्षित करणे आणि संक्रमित करणे हा या दिवसाचा मुख्य हेतू नक्कीच साध्य होईल..!
प्रचंड वाचन करणारी व्यक्ती ही स्वयंअध्ययन करीत असल्यामूळे अशी व्यक्ती ही स्वतः एक जिवंत पुस्तक असते हे प्रकर्षाने आपण इतरांच्या लक्षात आणून दिले की, पुस्तक दान व वाचनसंस्कृती या दोन्ही बाबी आपोआपच वाढीस लागतील यात शंका नाही..!
पुस्तक वाचनातून म्हणजेच स्वयंअध्ययनातून तयार झालेले कोणत्याही व्यक्तीचे व्यक्तीमत्व हे आपल्या देशाचे भूषण असते..!
पुस्तक हेचि आपले गुरु आणि तेचि आपल्या ज्ञानाचे महामेरु असतात.पुस्तकांच्या पानापानांत जे ज्ञान असते ते ज्ञान,संस्कार म्हणून मनामनांत उमटते!
अशा या पुस्तकांचे प्रत्यक्ष वाचन करुन, त्या पुस्तकी ज्ञानाचा स्वतःच्या, समाजाच्या व देशाच्या विकासासाठी, दैनंदिन जीवनात वापर करणे हिच त्या पुस्तकरुपी गुरुंची सेवा असते!
यासाठी मात्र "वाचन-संस्कृती" प्रसाराचा आपण सर्वांनी सुपंथ धरावा, पुस्तकांच्या स्वयंअध्ययनेच स्व-व्यक्तिमत्व प्रत्येक व्यक्तीने सावरावे आणि या "वाचन-संस्कृती"ने अवघा देश हा प्रगतीपथावर न्यावा ही आमची तळमळ चारोळीरुपात व्यक्त करुन आम्ही या पोस्टची सांगता करतो...
पुस्तक हेचि गुरु, ज्ञानाचे महामेरु!
पुस्तक हेचि गुरु, ज्ञानाचे महामेरु,
वाचनाचे महत्व घेवू या ध्यानात;
ज्ञान जे पुस्तकांच्या पानापानांत,
संस्कार म्हणून उमटती मनामनांत!
ग्रंथ हाच गुरु मानून, ग्रथांच्या अर्थातच,पुस्तकांच्या पानापानांतले ज्ञान हे, मनामनांत खोलवर उमटून ह्या देशाची सर्वांगिण उन्नती व्हावी ही ईश्वरचरणी प्रार्थना..!
📘 लेख संकलन आणि संपादन..✍🏻
🙏🏻 आपलाच विनम्र स्नेही आणि एक पुस्तक प्रेमी..📘
#विद्यार्थी मित्र प्रा.रफीक शेख,
🎓 डॉ. ए.पी.जे.अब्दुल कलाम विद्यार्थी फाउंडेशन, परभणी.
Post a Comment