"भय" या शब्दाचं अस्तित्व माणसाच्या भावनांमध्ये नेहमीच राहिलं आहे. पण आपण कधी विचार केला आहे का, भीती का वाटते? खरं तर, भीतीचं मूळ नेहमीच अज्ञानामध्ये असतं. आपण जेव्हा एखाद्या गोष्टीचा पूर्णतः विचार करू शकत नाही, तिचं ज्ञान मिळवू शकत नाही, तेव्हा त्या अज्ञानातून भीती जन्माला येते. म्हणूनच म्हणतात, भय हे अज्ञानाच्या अंधकाराचं अपत्य आहे.
अज्ञान आणि अंधकाराचं नातं...
अज्ञान म्हणजे केवळ गोष्टींचं न समजणं नाही तर त्या गोष्टींचा अभ्यास न करणं, त्यांच्या मागील सत्य जाणून घेण्याचा प्रयत्न न करणं. अंधार आपल्याला दिसत नाही, तसंच अज्ञानामुळे आपल्याला सत्य जाणवत नाही. जेव्हा माणूस अज्ञानी राहतो, तेव्हा त्याला वाटतं की या अंधकारात काहीतरी धोकादायक आहे, आणि तेच त्याच्या भीतीचं कारण बनतं.
🔰 भीतीचे प्रकार आणि त्यांची कारणं...😲
भीती ही दोन प्रकारांमध्ये विभागली जाऊ शकते –
1. वास्तविक भीती: जी संकटावर आधारित असते, जसे अपघात, प्राण्यांचा धोका वगैरे.
2. कल्पित भीती: जी केवळ मनाच्या अज्ञानातून उद्भवते, जसे अंधाराची भीती, असफलतेची भीती, किंवा भविष्याची भीती.
यापैकी कल्पित भीती नेहमीच अज्ञानावर आधारित असते. उदाहरणार्थ, अनेकांना रात्रीच्या अंधाराची भीती वाटते, पण अंधार फक्त प्रकाशाचा अभाव आहे; त्यात स्वतःहून काही धोकादायक नसतं. आपण याचा विचार केला की भीती कमी होऊ लागते.
📚 ज्ञानाचं महत्व... ✍🏻
ज्ञान हा अज्ञानावरचा सर्वांत प्रभावी उपाय आहे. जेव्हा माणूस एखाद्या गोष्टीचं खरं स्वरूप जाणतो, तेव्हा त्याला त्या गोष्टीची भीती वाटत नाही...
उदाहरणार्थ, जर एखाद्याला एखाद्या रोगाची भीती वाटत असेल आणि तो त्या रोगाविषयी सखोल माहिती घेईल, उपचार आणि काळजीचे उपाय शिकेल, तर त्याची भीती कमी होईल.
🔰भयावर विजय मिळवण्यासाठी उपाय...
1. सत्याचा शोध घ्या: आपल्या भीतीमागचं कारण शोधा आणि त्यावर संशोधन करा.विवेकी विचार स्वीकारा.. आपलं विवेक जागृत करा..
2. स्वतःला प्रबोधित करा: वाचन, संवाद आणि निरीक्षणाच्या माध्यमातून आपल्या ज्ञानात भर घाला.
3. धैर्य आणि आत्मविश्वास वाढवा: कोणत्याही स्थितीला सामोरे जाण्याची क्षमता निर्माण करा.
4. योग आणि ध्यानाचा अवलंब करा: यामुळे मन स्थिर राहतं आणि अनावश्यक भीती कमी होते...
5.आयुष्याकडे पाहण्याचा सकारात्मक दृष्टीकोन स्वीकारा..
6.सकारात्मक दृष्टीकोनचं आत्मविश्वास वाढवतो आणि त्यांतुनचं रचनात्मक कार्य होऊ शकते.
भयाचं मूळ अज्ञानात आहे, पण ज्ञान हे त्या अंधकाराला दूर करून माणसाला शांतता, स्थैर्य आणि आत्मविश्वास देतं. अज्ञानाचा नाश केला की भयाचा नाश होतो. म्हणूनच, सतत शिकण्याचा आणि समजून घेण्याचा प्रयत्न करा. ज्ञानाच्या प्रकाशात भीतीचा अंधकार नष्ट होतो, आणि जीवनाला नवी उमेद मिळते.
"ज्ञान हे भयमुक्त होण्याचा सर्वोत्तम मार्ग आहे मित्रांनो..."✍🏻
- लेख संकलन आणि संपादन✍🏻
#विद्यार्थीमित्र प्रा.रफीक शेख
🎓 डॉ. ए.पी.जे.अब्दुल कलाम विद्यार्थी फाउंडेशन, परभणी.
https://www.vidhyarthimitra.com
Post a Comment