🎓 वाचन संकल्प महाराष्ट्र : 1 ते 15 जानेवारी वाचन पंधरवडा..
आजचं पुस्तक क्र. 4
डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम यांचे 'अग्नीपंख' पुस्तक
पुस्तक समीक्षा : अग्नीपंख
पुस्तक प्रकार : आत्मचरित्र
लेखक : डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम
मराठी अनुवाद : माधुरी शानभाग, सहायक : अरुण तिवारी..
प्रकाशन : राजहंस प्रकाशन संस्था
दिनांक 1 जानेवारी ते 15 जानेवारी ह्या पंधरवढ्यात महाराष्ट्र शासनाने जाहीर केलेल्या 'वाचन संकल्प महाराष्ट्र ' ह्या प्रकल्पाबद्दल मागे एका पोस्टला आपण सर्वांनी लाखाची भर टाकल्याने माझ्या वाचन प्रेरणा चळवळीला उत्साहाची लाट आल्याने खूप साऱ्या वाचकांनी मला काही सकारात्मक सूचना दिल्या त्याबद्दल धन्यवाद मित्रांनो...
आजच्या शालेय आणि महाविद्यालयिन विद्यार्थ्यासह विविध समाज माध्यमांवर ज्ञानकण शोधणाऱ्या वाचकांसाठी बेस्ट सेलर पुस्तकांची नुसती यादी प्रकाशित करण्यापेक्षा त्या त्यां पुस्तकातील जीवन उपयोगी मूल्यं, त्याची समाजभिमुखता, काळानुरूप होणाऱ्या बदलांमधील अनुकलता, जीवन प्रेरणा, विविध प्रकाशनांनी मराठीत उपलब्ध करून दिलेल्या प्रादेशिक भाषा आणि जागतिक किर्तीच्या पुस्तकातील वेगळेपण मराठी वाचकांसाठी ज्ञान-पर्वंणी ठरावी ह्या हेतूने मी स्वतः काही पुस्तकांचं केलेलं ज्ञानार्जन आपणा सर्वाच्या सेवेत ह्या वाचन पंधरवढ्यातलं आजचं चवथे पुस्तक 'अग्नीपंख'
भारताचे माजी आणि महान राष्ट्रपती, भारतरत्न डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम यांचं आत्मचरित्र The Wings of Fire..याच मराठीत अनुवादीत असलेले प्रेरणादायी पुस्तक..
हे पुस्तक अनेक भारतीय प्रादेशिक भाषांमध्ये प्रसिद्ध झालेले एक बेस्ट सेलर पुस्तक आहे मित्रांनो...
हे पुस्तक डॉ.कलामांच्या जीवनाचा प्रवास आणि यशस्वी वाटचालीची कहाणी सांगते. हे पुस्तक प्रेरणादायी, आशावादी, आणि जीवनातील संघर्षांवर मात करण्यासाठी प्रोत्साहित करणारं असून हे पुस्तक केवळ एका व्यक्तीचा जीवनपट नसून, नव्या भारताची स्वप्नं पाहणाऱ्या आणि ती सत्यात उतरवण्याचा ध्यास घेतलेल्या एका महान व्यक्तीची कथा आहे.
"अग्नीपंख" मध्ये डॉ. कलाम यांनी आपल्या बालपणापासून ते भारताचे मिसाइल मॅन आणि पुढे राष्ट्रपतीपदा पर्यंतचा प्रवास मांडला आहे. त्यांनी वैज्ञानिक, शिक्षक, आणि नेतृत्वकर्ता या सर्व भूमिका प्रभावीपणे निभावल्या. त्यांच्या कार्यातून त्यांनी विज्ञान-तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात भारताला नवी ओळख दिली.
'अग्नीपंख' हे पुस्तक चार विभागांमध्ये विभागलेले आहे:
1. प्रारंभिक जीवन आणि संघर्ष:
डॉ. कलाम यांनी रामेश्वरम मधील त्यांच्या लहानशा गावातील साध्या, परंतु संस्कारमय जीवनाचे वर्णन केले आहे. त्यांचे वडील जहाज बांधणी करत होते आणि आई धार्मिक होती. त्यांनी घरातूनच जबाबदारीची शिकवण घेतली. आर्थिक अडचणी असूनही, त्यांनी शिक्षणाकडे लक्ष दिले आणि आपल्या स्वप्नांचा पाठपुरावा केला. त्यांचे शिक्षक, मित्र, आणि कुटुंबीय यांनी त्यांच्या आयुष्यात महत्त्वाची भूमिका बजावली.
2. शिक्षण आणि प्रेरणा:
कलाम यांना विज्ञान आणि गणिताची आवड लहानपणापासून होती. त्यांचे शिक्षण सेंट जोसेफ्स कॉलेज आणि त्यानंतर मद्रास इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी येथे झाले. त्यांनी आपल्या प्रेरणादायी गुरूंचे (जसे की प्रो. सिवा सुब्रमण्यन) महत्व अधोरेखित केले आहे, ज्यांनी त्यांना आकाशातील गूढ शोधण्यासाठी प्रेरित केले.
3. वैज्ञानिक कारकीर्द:
कलाम यांची वैज्ञानिक कारकीर्द खूप प्रेरणादायक आहे. त्यांनी ISRO आणि DRDO या संस्थांमध्ये काम केले आणि भारतीय उपग्रह प्रक्षेपण वाहन (SLV-III) तसेच 'अग्नी' आणि 'पृथ्वी' क्षेपणास्त्रांच्या विकासामध्ये मोलाचा वाटा उचलला. त्यांच्या यशस्वी प्रकल्पांमुळे भारताला जागतिक स्तरावर प्रतिष्ठा मिळाली. ह्या पुस्तकात त्यांनी विज्ञान व तंत्रज्ञानाच्या माध्यमातून भारताला आत्मनिर्भर बनवण्याचे महत्त्व पटवून दिले आहे.
4. भारतासाठी स्वप्न:
डॉ. कलाम यांना केवळ वैज्ञानिक नव्हे, तर एक दूरदृष्टी असलेला नेता म्हणूनही ओळखले जाते. त्यांच्या मते, भारताला महासत्ता बनण्यासाठी शिक्षण, विज्ञान आणि तरुणांच्या सहभागाची गरज आहे. त्यांनी '2020 पर्यंतचा विकसित भारत' या त्यांच्या स्वप्नाबद्दल या पुस्तकात सविस्तरपणे सांगितले आहे.
अग्निपंख ह्या पुस्तकाची लेखनशैली अतिशय साधी, स्पष्ट आणि मनाला भिडणारी आहे. हे पुस्तक केवळ आत्मचरित्र नसून, एक प्रेरणादायी कथा आहे. कलाम यांचे विचार प्रत्येक वाचकाला जीवनात सकारात्मक दृष्टिकोन ठेवण्याची प्रेरणा देतात.
'अग्नीपंख' हे पुस्तक केवळ वाचकांसाठी प्रेरणादायी नाही, तर त्यांना जीवनात उच्च उद्दिष्टे ठरवण्यास प्रवृत्त करते. हे पुस्तक संघर्ष करणाऱ्या तरुणांसाठी दीपस्तंभासारखे आहे. डॉ. कलाम यांची साधी जीवनशैली, त्यांची मूल्ये, आणि मेहनतीची शिकवण यामुळे पुस्तक वाचणाऱ्या प्रत्येकाला आत्मपरीक्षण करायला लावते.
'अग्नीपंख' हे डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांचे आत्मचरित्र केवळ त्यांचा जीवनप्रवासच मांडत नाही, तर वाचकांना त्यांच्या आयुष्याचा तत्त्वज्ञानात्मक दृष्टिकोन शिकवते. हे पुस्तक प्रत्येकाने वाचावे, विशेषतः जे जीवनात मोठी स्वप्नं पाहतात आणि ती सत्यात उतरवण्यासाठी प्रयत्नशील आहेत. कलाम यांचा जीवनसंघर्ष आणि यशाची गाथा भारतीय तरुणांसाठी नेहमीच प्रेरणादायी ठरेल.
"स्वप्नं ती नव्हे जी आपण झोपेत पाहतो, तर ती आहेत जी आपल्याला झोपू देत नाहीत."
- डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम
- पुस्तक समीक्षक आणि डॉ. कलामांच्या कार्याचा अभ्यासक:
#विद्यार्थीमित्र प्रा.रफीक शेख,
🎓 डॉ. ए.पी.जे.अब्दुल कलाम विद्यार्थी फाउंडेशन, परभणी.
https://www.vidhyarthimitra.com
Post a Comment