पुस्तक समीक्षा : Who moved my cheese..?
लेखक : स्पेन्सर जॉन्सन एम. डी.
मराठी अनुवाद : मोहन मदगुलकर
प्रकाशन : मंजूल पब्लिशिंग हाऊस...
दिनांक 1 जानेवारी ते 15 जानेवारी ह्या पंधरवढ्यात महाराष्ट्र शासनाने जाहीर केलेल्या 'वाचन संकल्प महाराष्ट्र ' ह्या प्रकल्पाबद्दल मागे एका पोस्टला आपण सर्वांनी लाखाची भर टाकल्याने माझ्या वाचन प्रेरणा चळवळीला उत्साहाची लाट आल्याने खूप साऱ्या वाचकांनी मला खूप साऱ्या सकारात्मक सूचना दिल्या त्याबद्दल धन्यवाद मित्रांनो...
आजच्या शालेय आणि महाविद्यालयिन विद्यार्थ्यासह विविध समाज माध्यमांवर ज्ञानकण शोधणाऱ्या वाचकांसाठी बेस्ट सेलर पुस्तकांची नुसती यादी प्रकाशित करण्यापेक्षा त्या त्यां पुस्तकातील जीवन उपयोगी मूल्य, त्याची समाजभिमुखता, काळानुरूप होणाऱ्या बदलांमधील अनुकलता, जीवन प्रेरणा, विविध प्रकाशनांनी मराठीत उपलब्ध करून दिलेल्या जागतिक किर्तीच्या पुस्तकातील वेगळेपण मराठी वाचकांसाठी ज्ञान-पर्वंणी ठरावी ह्या हेतूने मी स्वतः काही पुस्तकांचं केलेलं ज्ञानार्जन आपणा सर्वाच्या सेवेत ह्या वाचन पंधरवढ्यातलं आजचं तिसरं पुस्तक स्पेन्सर जॉन्सन एम. डी. ह्या लेखकांनी लिहलेलं " who moved my cheese " हे पुस्तक अनेक भाषांमध्ये प्रसिद्ध झालेले एक जागतिक पातळीवरील बेस्ट सेलर पुस्तक आहे.
आपल्या उज्ज्वल भविष्याचं चित्र दाखवणाऱ्या अनेक पुस्तकांतील हे एक सुंदर आणि छोटेखानी प्रेरणादायी बोधप्रद पुस्तक. ज्यानं अनेक यशस्वी लोकांच्या आयुष्यावर विलक्षण प्रभाव पाडून त्यांना जगण्यासाठी आणि बदलण्यास प्रेरित केलंय.. जागतिक कीर्तीच्या सर्वच उद्योग आणि सेवा प्रधान क्षेत्रातल्या श्रीमंत माणसांनी आणि नेत्यांच्या यादीतील हे सर्वोत्तम पुस्तक मला खूपचं भावलं मित्रांनो...
पुस्तकाचा आशय आणि विषय :
खाण्याच्या चीजच्या शोधात असलेले दोन उंदीर व त्यांच्याचं आकाराची दोन माणसे यांची ही एक बोधकथा आहे.ती प्रत्येक माणसाला लागू पडते. चीज म्हणजे प्रत्येक माणसाला हवी असलेली गोष्ट जी मिळवण्यासाठी माणूस आटोकाट प्रयत्न करीत असतो. मग ती सत्ता, प्रसिद्धी, पैसा, नातेसंबंध ,....., यासारख्या असंख्य बाबी असतात.
भुलभुलैय्या असलेल्या जागेमध्ये स्निफ आणि स्नरी नावाचे दोन उंदीर राहत असतात. तेथेच उंदराच्या आकाराची हेम आणि हॉ नावाची दोन माणसे राहत असतात. ते सर्वजण चीजच्या शोधात भटकत असतात. त्यांना 'सी' या ठिकाणी चीजचा मोठा साठा सापडतो. मानव असलेले हेम आणि हॉ आपल्या पायातील बूट फेकून देतात. शेजारीच आपले कुटुंब बनवितात. आपल्या रूढी, परंपरा, अंधश्रद्धा, पूर्वजांचे शौर्य यांची फुशारकी मारत सुरक्षित कवचात जगत असतात. चीज हे त्यांच्यासाठी निव्वळ अन्न नसते तर ती व्यक्तिगत, कौटुंबिक, सामाजिक प्रतिष्ठा व सुख देणारी एक वस्तू असते. चीज मिळविणे व खाणे हा आपला जन्मसिद्ध हक्क आहे असे समजून निर्धास्तपणे भविष्याचा विचार न करता चीजच्या साठ्याचा आस्वाद घेत राहतात.
उंदरापैकी स्निफ याचे नाक फार दक्ष,तीक्ष्ण असते. त्यामुळे चीजच्या साठ्याचा वास घेत ते खराब होत आहे का ?ते संपणार आहेत का? संपले तर काय करायचे? याचा शोध घेत असतो. तर स्नरी हा खूप चालाक व धावण्यामध्ये तरबेज असतो.त्या दोघांचे एकच ध्येय असते ते म्हणजे चीजचा साठा मिळवणे, हादडत बसणे व संपण्या अगोदर गरजे नुसार स्वता:मध्ये बदल घडवत दुसरा साठा शोधून काढणे.
कालांतराने 'सी' येथील साठा संपतो.
माणूस असलेले हेम व हॉ हे बोंब मारत बसतात की आमचा चीज चा साठा कोणी पळवला? Who moved my cheese? शेजारी पाजारी शोध घेतात. भोवतालच्या भिंती, खालची जमीन फोडून पाहणी करतात. पण व्यर्थ. दोघांची उपासमार सुरू होते. दोन्ही उंदीरही तिथून गायब झालेले असतात. या दोघांना वाटते काहीं झाले तरी आपण माणसं आहोत.ते नीच दर्जाचे फुटकळ उंदीर आहेत.त्यांची अवस्था तर आपल्या पेक्षा वाईट असणार.ते तर उपाशी तडफडत असणार. चीज वर फक्त आमचाच हक्क आहे व आम्ही ते इथेच मिळवणार असे हट्टाला पेटलेले असतात.
सी येथील साठा संपण्या अगोदरच दोन्ही उंदरांनी शोध मोहीम हाती घेतलेली असते. जिथे अपयश येईल तो मार्ग सोडून नवीन मार्ग शोधत असतात. बदललेल्या परीस्थितीची दखल घेत स्वतः बदलत राहतात. आणि या प्रयत्नांमध्ये त्यांना 'एन' या ठिकाणी चीजचा मोठा साठा सापडतो. ते तिथे स्थलांतर करून चीज हादडत बसतात. व पुढच्या साठ्याचा शोध घेत राहतात..इकडे माणूस असलेले हेम व हॉ हे बोंब मारत बसतात की आमचा चीज चा साठा कोणी पळवला? Who moved my cheese? ते जागा सोडायला व बदलायला तयार होत नाहीत.
अशी ही अगदी साधी गोष्ट आहे. तो साठा संपून जाणार आहे व त्यासाठी आपल्याला बदलावं लागेल. बदल तसा सहज सोपा नसतो.त्यासाठी आपल्याला कम्फर्ट झोन मधून बाहेर पडावे लागते व अनोळखी अशा गोष्टींच्या भीतीवर मात करून धाडसी बनावे लागते. श्रम करावे लागतात.पण हे गुण या छोट्या माणसाकडे नाहीत..
हे पुस्तक वाचन का करावे?
प्रतिकुल परिस्थितीवर मात करीत भविष्याचा वेध घेताना अनुकूलता कशी साधावी ?ते कसे संपादन करावे? जीवनातील बदल अपरिहार्य आहेत, त्यांना स्वीकारल्याशिवाय प्रगती शक्य नाही आणि त्या बदलाला विलंब लावल्याने हानी होऊ शकते, जुन्या सवयींना चिकटून राहिल्यास नवीन संधींना गमावले जाऊ शकते,अनिश्चिततेमुळे भीती वाटते, पण प्रयत्न केल्यावरच नवी दारे उघडू शकतात, सामाजिक, आर्थिक आणि राजकीय परिवर्तनातं बदल होताना स्वतःचं अनुकूलन साधताना स्वतः मध्ये कोणते बदल कधी,केव्हा आणि कसे करावं.. जेणेकरून आयुष्य समृद्धपणे जगता येईल, हा कानमंत्र देणारं Who moved my cheese? हे पुस्तक नक्कीच आपणा सर्वासाठी प्रेरणादायीचं आहे मित्रांनो..
हे पुस्तक वाचून वाचकाला आत्मचिंतनाची एक नवी संधी मिळाली तर आपलं मानसिक स्वास्थ अजून उत्तम होऊ शकेल असं मला वाटतं..
"Who Moved My Cheese?" हे पुस्तक जीवनातील बदलांसाठी मानसिक तयारी कशी ठेवावी यावर आधारित असून, त्याचे विचार कालातीत आहेत. मराठी अनुवादामध्येही याचे सार टिकून आहे, आणि ते वाचकाला नवी दृष्टी देऊ शकते.
जर तुम्हाला बदलांमुळे चिंता वाटत असेल किंवा नवीन आव्हाने स्वीकारण्यात अडचण येत असेल, तर हे पुस्तक तुम्हाला प्रेरित करेल. त्याची सोपी भाषा आणि प्रभावी दृष्टिकोन वाचकाला स्वतःबद्दल विचार करायला लावतो.
क्रमश :
पुस्तक समीक्षक आणि संवेदनशील वाचक :
#विद्यार्थीमित्र प्रा.रफीक शेख,
🎓 डॉ. ए.पी.जे.अब्दुल कलाम विद्यार्थी फाउंडेशन, परभणी.
https://www.vidhyarthimitra.com
Post a Comment