जीवन कौशल्ये-
१) स्वजागृती-
प्रत्येक माणसाला स्वतःच्या क्षमता, मर्यादा, आवडी-निवडी, आकांक्षा, जीवन ध्येय हे ओळखताच यायला हवे! अन्यथा जो स्वतःलाही ओळखू शकत नाही, तो इतरांना कसे ओळखणार?
२) समानुभूती-
आपण नेहेमी इतरांचे दोष शोधतो, पण पाण्यामध्ये मासा, झोप घेतो कैसा; जावे त्याच्या वंशा तेव्हा कळे या उक्तीनुसार दुस-यांच्या भूमिकेत शिरुन, त्यांच्या जागी आपण असतो तर काय केले असते हा विचार करण्याचे हे कौशल्य आपल्यात हवेच!
३) समस्या निराकरण-
जेव्हा आपल्यासमोर अनेक पर्याय उपलब्ध असतील, त्यावेळी हे करु की ते करु अशी स्वतःची अवस्था होवू न देता, उपलब्ध पर्यायांतून योग्य व संभाव्य पर्याय निवडून त्याची अंमलबजावणी करण्याचे हे कौशल्यही अतिमहत्वाचे आहे!
४) निर्णय घेणे-
आपण जे बोलतो, विचार वा कृती करतो; ते करण्यार्वीच परिणामांचा विचार करावा आणि ज्याचे परिणाम चांगले होतील, असेच बोलावे, विचार वा कृती करणे यालाच विधायक निर्णय क्षमतेचे कौशल्य म्हणतात, जे दैनंदिन जीवनात आवश्यकच आहे!
५) प्रभावी संवाद कौशल्य-
आपली भाषा व कायिक हालचाली समृद्ध करुन आपले विचार हे शाब्दिक वा अशाब्दिक माध्यमांतून प्रभावीपणे मांडण्याचे हे कौशल्य आहे. खासकरुन आपण कुटुंबात वा समाजात वावरतांना या कौशल्याची नितांत गरज असते!
६) वैज्ञानिक दृष्टिकोन वा चिकित्सक विचारप्रक्रिया-
केवळ बाबा वाक्यम् प्रमाणम् असे वर्तन न ठेवता, प्रत्येक बाबीमागील कार्यकारणभाव समजून घेवून, उपलब्ध माहितीचे विश्लेषण व परिक्षण वस्तुनिष्ठ पध्दतीने करण्याचे हे कौशल्यही महत्वाचेच! यात पूर्वग्रहदूषितपणाला वाव दिला जात नाही, गैरसमज ही होत नाहीत.
७) सर्जनशील वा नवनिर्मिती कौशल्य-
आपण आजवर जे शिक्षण वा अनुभव घेतलेत, त्यांचा प्रत्यक्ष वापर करुन; आजवर जे कोणीही केलेच नाही, ते करण्याची वा नवनिर्मिती करण्याचे हे कौशल्य! मात्र या नवनिर्मितीतून मानवाचे कल्याण होईल, मानवाचा सर्वनाश होणार नाही याचा विचार होणेही तितकेच महत्वाचे!
८) आंतरव्यक्ती संबंध-
आपल्या कुटुंबात, समाजात आपल्याशी संबंधित जेवढेही लोक असतील, त्यांचा स्वभाव ओळखून त्यांच्याशी नम्रतेने निर्भेळ व स्नेहपूर्ण संबंध राखण्याचे हे कौशल्य आपल्या जीवनातील कटूता कायमची दुर करते..!
९) भावनांचे समायोजन-
आपल्याला जशा भावना आहेत, तशाच भावना इतरांनाही आहेत हे लक्षात घेवून; संयमाने आपल्या भावनांवर नियंत्रण ठेवत, इतरांच्या भावनेची कदर करायला शिकविणारे हे कौशल्यही जीवनात आवश्यकच..!
१०) ताण-तणावांचे समायोजन-
आज ज्याच्या मनाविरुध्द घडले वा सहनशक्तीच्या अभावामुळे जो तो उठतो, आणि एकतर भांडण, मारामारी, हत्या वा आत्महत्या करतो! मात्र संयमाने सहनशक्ती वाढवित जावून ताण-तणावांची कारणे शोधणे, त्या कारणांचा शारिरीक, मानसिक, कौटुंबिक व सामाजिक परिणाम लक्षात घेवून ताण-तणाव देणारी कारणे संपुष्टात आणण्याचे हे कौशल्य आपल्याला धकाधकीच्या युगातही माणूस म्हणूनच जगण्याचे व वागण्याचे बळ देते!
आता आपल्या लक्षात आलेच असेल की, माणूस म्हणून जगतांना केवळ संस्कृती, संस्कार व माणूसकी या बाबीच महत्वाच्या नसून माणूस म्हणून जगण्या-वागण्याची उर्जा देणारी ही दहाही कौशल्ये आपल्या प्रत्येकांत असणे आवश्यकच आहे!
सौजन्याने आणि साभार:
संकलन :- सतीश अलोनी (मनस्पंदन फौंडेशन)
Post a Comment