प्रिय विद्यार्थी मित्रांनो;
विद्यार्थी मित्र प्रा.रफीक शेख सर लेखन-संपादित
विद्यार्थ्यांसाठी करिअर मार्गदर्शन आणि समुपदेशन लेखमाला भाग-4 मध्ये आपलं हार्दिक स्वागत..
करिअर निवडीची चिंता कशाला..?
दहावी-बारावीच्या परीक्षांच्या अपेक्षित आणि अनपेक्षित निकालानंतर काही विद्यार्थी आणि पालकांना पुढील काळात कोणत्या क्षेत्रात आणि कशात करिअर करायचे, याची चिंता नेहमीच लागलेली दिसून येतेय..
'कोणत्या तरी मामाच्या मुलाने आयटीमध्ये इंजिनीअरिंग केले आणि त्याला 'कॅम्पस'मध्ये 15 लाखांचे पॅकेज मिळाले.'
'बाबांच्या कंपनीतल्या मित्राने सांगितले, की सध्या 'इंजिनिअरिंग'ला स्कोप चांगला आहे, त्यामुळे मेकॅनिकललाच प्रवेश घ्या.'
'अकरावीला सायन्स हवेच. त्यामुळे भरपूर पर्याय उपलब्ध राहतात.'
'मैत्रिणीची मुलगी डेन्टिस्ट झाली. खोऱ्याने पैसे कमावते आहे. तूही डेन्टिस्ट्रीच्या पर्यायावर विचार कर.'
'माउशीच्या बाजूला असलेला मुलगा क्लास-1 अधिकारी झाला, तुही कर..? होशील बाबा..!!'
'सध्या ज्या क्षेत्रात जास्त पैसा आहे ना मग् तेच कर, आपल्याला फक्त पैसे कमवायचयं..!'
वैगेरे वैगेरे ...खूप साऱ्या गैरलागू गोष्टी आपल्या कानावर सतत येत असतात...
या अशा चर्चा सध्या पालकांमध्ये सुरूही झाल्या असतील. पाल्याच्या भवितव्याची चिंता, हे त्यामागचे कारण जरूर आहे; पण आपल्या मुलाची परीक्षाही संपत नाही, तोवर पुढच्या प्रवेशाच्या चर्चा करणे किमान तर्काला तरी धरून आहे का,
याचा एकदा विचार करायला हवा...!
'आपण शिकतो कशासाठी?' या प्रश्नाचे स्टँडर्ड उत्तर म्हणजे, 'उत्तम नोकरी आणि भरपूर पैसे मिळावे म्हणून.' शिकण्याचा याशिवाय आणखी काही उद्देश असू शकतो, असा विचारही आपण करत नाही.
चांगले करिअर घडविण्यासाठी प्रयत्न करायलाच हवेत; पण त्या करिअरची निवड अशी बाजार गप्पांवर करायची, की विद्यार्थ्याचा कल आणि कुवत ओळखून, या प्रश्नाचे उत्तर पालकांनी शोधायला हवे.
पाल्याच्या भवितव्याची चिंता करणाऱ्या प्रत्येकच पालकाला असे वाटत असते, की उत्तम पगाराची नोकरी मिळाली, की पाल्याच्या भवितव्याचा प्रश्न मिटला. त्यासाठी मग दहावीनंतर सायन्स आणि बारावीनंतर इंजिनीअरिंग, मेडिकल किंवा फारतर आर्किटेक्चर.
कॉमर्सला जायचे, तर किमान सीए किंवा सीएस आणि आर्ट्सला गेल्यास प्राध्यापकी किंवा बेकारी असे आपले साचे ठरलेले आहेत.
उत्तम तबला वाजवणाऱ्याचे किंवा उत्तम चित्रकारी करणारीचेही उत्तम करिअर घडू शकते, असा विचार आपण क्वचितच करतो; कारण या गोष्टी आपण अजूनही एक्स्ट्रा करिक्युलरच ठरवल्या आहेत. त्यामुळे संगीताची मनापासून आवड असूनही नोकरी चांगली मिळावी, म्हणून एखाद्याला इंजिनीअरिंग करावे लागते. याचा अर्थ इंजिनीअरिंगला जाऊच नये, असा नाही. मुद्दा इतकाच, की आपण जे साचे ठरवतो, ते ठरविण्याची काही गरज नाही.
आता प्रश्न निर्माण होतो, तो असा, की आपल्याला जे आवडते, त्यात करिअरच्या वाटा शोधायच्या ठरवल्या, तर त्यात पैसे मिळतात का? मग आपला छंद महत्त्वाचा, की पैसे मिळवणे? या प्रश्नांची उत्तरे सोपी नक्कीच नाहीत; पण म्हणून टाळावीत, अशीही नाहीत. अनेकदा होते असे, की पालक आणि विद्यार्थी हे प्रश्न टाळून सरधोपट मार्गच निवडतात. पालकांची भूमिका प्रॅक्टिकल सल्ला दिल्याची असते आणि पाल्यासाठी तो नियतीने वाट्याला आलेला भाग असतो.
'आवडेल त्या विषयात करिअर करायचे, तर पैसे मिळतील का,' या कूटप्रश्नाची सोडवणूक होऊ शकते का? पूर्णांशाने नाही, तरी उत्तराचे किमान दिशादर्शन नक्कीच होऊ शकते. अलीकडच्या काळात करिअर कौन्सेलिंगने ही सोय नक्की केली आहे. करिअर कौन्सेलिंग हा विषय काही नवा नाही. गेली काही वर्षे तो अस्तित्वात आहे. अलीकडच्या काळात मात्र त्याची गरज जास्त प्रकर्षाने जाणवते आहे.
जागतिकीकरणाने अनेक क्षेत्रे खुली केली आणि पर्यायाने करिअरच्याही विविध संधी निर्माण झाल्या. तुमच्याकडे असलेल्या वैशिष्ट्यपूर्ण कौशल्यांना पैलू पाडायची तुमची तयारी असेल, तर आजच्या काळात कोणीही बेकार राहू शकत नाही.
हे पैलू पाडण्यासाठी कोणत्या शाखेचे शिक्षण घ्यावे, जोडीने काय काम करावे, याचे मार्गदर्शन करतो करिअर कौन्सेलर. म्हणजे मघाशी म्हटल्याप्रमाणे आवडत्या गोष्टीचे करिअरमध्ये रूपांतर कसे करता येईल, याची दिशा दाखवणारा मार्गदर्शक उपलब्ध आहे.
आता प्रत्येकानेच करिअर कौन्सेलरची मदत घ्यावी का, हा प्रश्न व्यक्तिसापेक्ष आहे; कारण एखाद्याला आपल्या आवडीचा आणि करिअरचा मेळ अगदी सहज घालताही येतो; पण आपला कल ओळखणे आणि त्यानुसार करिअरची दिशा ठरविणे ही खरेतर वाटते, तितकी सोपी गोष्ट नाही. एखाद्याची चित्रकला उत्तम असेल, तर त्याचे चित्रकलेत करिअरच होईल, असे नाही; पण त्याला या चित्रकलेचा इंटेरिअर डिझायनर किंवा आर्किटेक्ट बनण्यासाठी फायदा जरूर होऊ शकतो. मात्र, अनेकदा ही संगती सांगणारा कोणीतरी लागतो. त्यामुळे कल ओळखताना किंवा त्याची करिअरशी सांगड घालताना ज्यांचा गोंधळ उडतो, अशांसाठी करिअर कौन्सेलर नावाचा वाटाड्या उपयुक्त आहेच.
करिअरची दिशा निवडण्याच्या या टप्प्यावर करिअर कौन्सेलरसारख्या मार्गदर्शकाची मदत घेणे यात कमीपणा वाटण्याचे काहीच कारण नाही.
करिअरची गाठ एकदा शाखा निवडल्यावर घट्ट होण्याआधीच सोडवावी हे उत्तम. गरज आहे, ती दहावी आणि बारावीचे विद्यार्थी आणि आणि त्यांच्या पालकांनी वेळीच हा गुंता सोडविण्याची.
ह्या आणि अशा साऱ्या प्रश्नांवर आपल्याला एकच उत्तर ...!
या आणि सहभागी व्हा..!
करिअर मार्गदर्शन समुपदेशन लेखमालिकेत ..!
आणि आपणास पडलेल्या करिअर संबंधी सर्व प्रश्नांची उत्तरे देण्याचं आम्हीं नक्कीच प्रयत्न करू मित्रांनो..
आपली हाक आणि आमची साथ.. नेहमीच आपल्या सेवेत सदैव तत्पर...!
लेख संकलन, लेखन आणि संपादन..
🎓अधिक माहितीसाठी संपर्क:
विद्यार्थी मित्र प्रा.रफीक शेख,
9822624178 / 9970717187
🎓 डॉ. ए.पी.जे.अब्दुल कलाम विद्यार्थी फाउंडेशन, परभणी.
Post a Comment