प्रिय विद्यार्थी मित्रांनो;
विद्यार्थी मित्र प्रा.रफीक शेख सर लेखन-संपादित
विद्यार्थ्यांसाठी करिअर मार्गदर्शन आणि समुपदेशन लेखमाला भाग-6 मध्ये आपलं स्वागत.. आणि हार्दिक आभार आपण देत असलेल्या सकारात्मक प्रतिसादाबद्दल..
करिअर आणि व्यक्तिमत्व विकास
कोरोना काळात दहावी बारावी परीक्षाच्या अनपेक्षित निकालान नंतर सध्या हा काळ शैक्षणिकदृष्ट्या फार तेजीचा दिसतोय.. मुलांच्या बोर्डाच्या परीक्षा, त्यांचे निकाल, नवीन प्रवेश प्रक्रिया इत्यादी इत्यादी. या सगळ्यात एक शब्द सतत कानावर पडत राहतो. तो म्हणजे ‘करिअर‘ पेपरांमधून करिअर विषयक लेख, शाळामधून याच विषयावर व्याख्यानं आणि जेवणाच्या टेबलावर याच विषयावर चर्चा. सगळी मोठी माणसं सतत मुलांना सांगत असतात, ‘करिअरचा विचार कर.‘ ‘करिअरचा निर्णय घेणं फार महत्वाचं आहे.‘ पण हे करिअर म्हणजे नेमकं काय आहे? का ह्याला इतकं महत्व दिलं जातं का..?
अगदी सोप्या शब्दांत सांगायचं तर शास्त्रशुद्ध शिक्षण घेऊन केला जाणारा व्यवसाय/नोकरी. माणूस आपल्या आयुष्यात उपजीविकेचे साधन म्हणून जी काही कामं करतो त्यांना एकत्रितपणे करिअर म्हणतात आणि ह्या व्याखेतच त्याचं महत्व आपल्याला कळतं. आपल्या सगळ्या गरजांसाठी लागणारा पैसा हा आपल्याला आपल्या करिअरमधून मिळत असतो. आपल्या पुढच्या आयुष्यातली आपली जीवनशैली ही बहुतांशी आपल्या करिअरच्या निर्णयावर अवलंबून असते.
म्हणजे बघा हा, समजा रमेश बँकेत नोकरी करत असेल तर त्याला दर महिन्याला ठराविक पगार मिळेल. तो एखादी दुचाकी, वन बेडरुमचा फ्लॅट घेऊ शकेल. त्याला रोज 11 ते 6 कामावर जावं लागेल आणि त्याने घोटाळा केल्याशिवाय त्याचं पेपरात नाव यायची शक्यता नाही. याऊलट उमेश हा प्रसिद्ध क्रिकेटर असेल तर त्याला दर महिन्याला पैसे मिळतीलच असे नाही. पण तो एखादी महागडी कार, दोन चार बेडरुमचा फ्लॅट घेऊ शकेल. त्याच्या कामाचं वेळापत्रक अनिश्चित असेल आणि त्याचं पेपरात नाव अगदी दर महिन्याला सुद्धा येऊ शकतं. म्हणजेच उमेश आणि रमेशची जीवनशैली त्यांच्या करिअरने निर्धारीत केलीय आणि जी गोष्ट आपल्या अख्ख्या आयुष्याचा आराखडा तयार करण्यात महत्वाची भूमिका बजावते, त्या गोष्टीचा निर्णय नक्कीच महत्वाचा आहे ना..!
असा हा अत्यंत महत्वाचा निर्णय घेताना ब-याचदा कमी महत्वाच्या निकषांचा जास्त विचार होताना दिसतो. उदा. मित्रमैत्रिणी काय करतायत, पैसा किती मिळेल, पालकांची इच्छा इ. या गोष्टींचा विचार करणं चुकीचं आहे अस मी म्हणत नाही. पण यापेक्षा महत्वाच्या अशा काही निकषचा विचार होणं गरजेचं आहे.
हे निकष म्हणजे क्षमता, कौशल्य, आवड/कल आणि व्यक्तिमत्व.
ह्या सगळ्या निकषांचा एकत्रितरित्या विचार होणं खूप गरजेचं आहे. केवळ एका निकषाचा विचार केला तर त्याला एक परिपूर्ण निर्णय म्हणता येणार नाही. उदा. एखाद्या मुलाकडे उत्तम बौद्धिक क्षमता असेल, पण ना त्याच्याकडे लोकांशी संवाद साधण्याचं कौशल्य आहे, ना त्याला वैद्यकीय क्षेत्राची आवड आहे आणि ना तो सेवाभावी वृत्तीचा आहे तर केवळ त्याला ९० टक्के गुण मिळाले म्हणून त्याने ‘डॉक्टर‘ होणं कितपत योग्य आहे?
याऊलट जर त्याच्याकडे बारीक तपशील समजण्याचं कौशल्य असेल, त्याला आर्थिक क्षेत्रात रस असेल आणि तो चिकाटी वृत्तीचा असेल तर तो कदाचित चांगला ‘सीए‘होऊ शकेल.
दुर्दैवाने आपल्याकडे करियर निवडताना ‘व्यक्तिमत्व‘ या निकषाकडे फार दुर्लक्ष केलं जातं. व्यक्तिमत्व हा करिअरचा एक खूप महत्वाचा भाग आहे. प्रत्येक क्षेत्रासाठी विशिष्ट अशा व्यक्तिमत्वाची गरज असते. उदा. बोलघेवडा माणसू चांगलं मार्केटिग करु शकतो. चिकाटी आणि अभ्यासू वृत्तीचा माणूस चांगला शास्त्रज्ञ होऊ शकतो. उत्तम नेतृत्वगुण असणारा माणूस व्यवस्थापक अथवा नेता बनू शकतो. याचा अर्थ कमी बोलणारा माणूस मार्केटिग करुच शकणार नाही असा नाही. पण यशस्वी होण्यासाठी त्याला जितके कष्ट करावे लागतील तितके कष्ट बोलघेवड्या माणसाला करायला लागणार नाहीत. त्यामुळे करिअरचा विचार करताना व्यक्तिमत्वाचा विचार होणं तितकंच गरजेचं आहे.
व्यक्तिमत्वापेक्षाही दुर्लक्षित आणि खरंतर या सगळ्या निकषांपेक्षा अत्यंत महत्वाचा असा एक मुद्दा लक्षात घेणं मला स्वतःला फार महत्वाचं वाटत. तो म्हणजे ‘मला माझ्या करिअरमधून नेमकं काय हवं? ‘जोपर्यंत या प्रश्नाचं उत्तर आणि तुमच्या करिअरमधून मिळणारा लाभ जुळत नाही तोपर्यंत तुम्ही तुमच्या आयुष्यात / करिअरमध्ये ‘सुखी‘ होण्याची शक्यता मला फारच कमी वाटते.
प्रत्येक माणसाला त्याच्या करिअरकडून एक कुठलीतरी गोष्ट खूप तीव्रपणे हवी असते आणि ही गरज प्रत्येकाची वेगवेगळी असू शकते. कुणाला पैसा हवा असतो, कुणाला स्थैर्य, कुणाला स्टेटस्/प्रसिद्धी तर कुणाला समाधान हवं असतं.
हे उत्तर तुमच्या निर्णयावर फार मोठा परिणाम करतं. उदा. मला स्थैर्य महत्वाचं वाटतं असेल तर मी शेअर ब्रोकर बनून सुखी नाही होणार. उलट सरकारी नोकरी करुन सुखी होईन. मला प्रसिद्धी हवी असेल तर जरी मला दर महिन्याला पगार नाही मिळाला तरी मी एखादा नट होऊन सुखी असेन आणि जर मला समाधान हवं असेल तर खूप पैसा न मिळूनही मी खेड्यातल्या शाळेत शिकवून सुखी होईन. त्यामुळे तुम्हाला नेमकं काय हवंय हे स्वच्छपणे कळणं खूप गरजेचं आहे. तसंच करिअर निवडताना मला काय करायचं नाही हे कळलं तरी हा निर्णय घ्यायला खूप मदत होते.
करिअर निवडताना वेगवेगळ्या क्षेत्रांची माहिती असणं, त्या क्षेत्रात नेमकं काय काम होतं हे समजून घेणं ह्या गोष्टी नक्कीच गरजेच्या आहेत. पण ह्या सगळ्यात आधी मुळात स्वतःच्या आत डोकावून बघणं अत्यंत गरजेचं आहे. तुम्हाला काय हवंय हे जोपर्यंत तुम्ही स्वतः ठरवू शकत नाही तोपर्यंत ह्या जगातला कुठलाही शिक्षक, पालक, करिअरतज्ज्ञ, अभिक्षमता चाचण्या तुम्हाला एका मर्यादेपर्यंतच मदत करु शकतात.
त्यामुळे करिअर निवडीच्या पायरीवर उभ्या असणा-या विद्यार्थी मित्रांनो आधी स्वतःच्या आत डोकावा, नाहीतर तुमचा, हा सुंदर वास कुठून येतोय म्हणून जंगलभर हिडत फिरणारा कस्तुरीमृग व्हायला वेळ लागणार नाही..!
ह्या आणि अशा साऱ्या प्रश्नांवर आपल्याला एकच उत्तर ...!
करिअर मार्गदर्शन समुपदेशन लेखमालिकेत ..!
आणि आपणास पडलेल्या करिअर संबंधी सर्व प्रश्नांची उत्तरे देण्याचं आम्हीं नक्कीच प्रयत्न करू मित्रांनो..
आपणा सर्वांना पुढील वाटचालीस आपणास हार्दिक शुभेच्छा सह सदिच्छा मित्रांनो...
आपली हाक आणि आमची साथ..
नेहमीच आपल्या सेवेत सदैव तत्पर...!
लेख संकलन, लेखन आणि संपादन..
🎓अधिक माहितीसाठी संपर्क:
विद्यार्थी मित्र प्रा.रफीक शेख,
9822624178 / 9970717187
🎓 डॉ. ए.पी.जे.अब्दुल कलाम विद्यार्थी फाउंडेशन, परभणी.
Post a Comment