‘खबर देने के लिए स्टूडियो ज़रूरी थोड़ी है?
कही पे भी खड़े रहकर खबर दे देंगे,
सड़क, नुक्कड़ पर खड़े रहकर खबर देंगे..!
रविश कुमार यांनी रॅमन मॅगसेसे पुरस्कार स्वीकारताना केलेले भाषण :-
“ रॅमन मॅगसेसे पारितोषिक घोषित झाल्यापासून माझं आयुष्यच बदलून गेलंय. आपण मला बहाल करत असलेल्या सन्मानापेक्षा मी जास्त भारावून गेलोय ते इथं मॅनिलात उतरल्यापासून आपण करत असलेल्या माझ्या आदरातिथ्याने. त्या आतिथ्यामुळे माझे पाहुणेपण दूर सरून मी तुमच्या कुटुंबातलाच एक असल्यासारखं मला वाटू लागलंय. सर्वसाधारणपणे पारितोषिक समारंभ म्हणजे एक प्रासंगिक भेटगाठ असते. माणसे एक दिवस एकत्र येतात आणि मग पुन्हा भेट घडतेच असं नाही. इथं मात्र जरा वेगळंच वाटू लागलंय. माझ्याबरोबरच्या तुमच्या वागण्यामुळे मला मनापासून असं वाटू लागलंय की तुम्ही माझी निवड करावी इतकं चांगलं काम माझ्या हातून खरोखरच घडलं असणार. एरवी आपण सगळी आपापले आयुष्य निभावून नेणारी साधीसुधी माणसंच तर आहोत. तुमच्या प्रेमाने मी अधिकच नम्र बनलोय आणि माझी जबाबदारी अधिकच वाढलीय.
आपण विषमतेचे मोजमाप नेहमी आरोग्याच्या आणि आर्थिक संदर्भात करतो पण ज्ञान आणि माहिती या क्षेत्रातील विषम विभागणीचे मापन करण्याचीही वेळ आता आलेली आहे. गुणवत्तापूर्ण ज्ञान मिळवण्याची सर्व साधने आज ठराविक शहरापुरतीच मर्यादित असताना छोट्याछोट्या शहरात आणि खेड्यात माहितीच्या बाबतीतील या विषमतेचे काय परिणाम होत असतील याची पुसटशी कल्पनाही आपण करू शकत नाही. व्हाट्सअप विद्यापीठातील प्रचारयंत्रणा हाच त्यांच्या ज्ञानाचा स्रोत असतो हे उघडच आहे. सध्याच्या तरुण पिढीलाही आपण दोष देऊ शकत नाही कारण योग्य शिक्षणापासून आपणच त्यांना वंचित ठेवलंय ही वस्तुस्थिती आहे. माध्यमसंकटाचे मूल्यमापन करणे त्यामुळे इथे अधिकच महत्त्वाचे ठरते. माध्यमेच जर व्हाट्सअप विद्यापीठाचे रूप धारण करणार असतील तर प्रेक्षक आणि समाज यावर त्याचा कोणता ठसा उमटेल? भारतीय नागरिकांना आता याचे भान येऊ लागले आहे हे सुचिन्ह होय. म्हणूनच मला येत असलेल्या अनेक अभिनंदन संदेशांत माध्यमांच्या बेगडीपणाबद्दलची चिंता ठायीठायी व्यक्त झालेली दिसते. त्यामुळे मला स्वतःविषयी धन्यता वाटत असली तरी मी काम करतो त्या व्यवसायाची अवस्था पाहून मात्र माझे मन तीव्र दुःखाने व्यथित होते.
भारतीय माध्यमांवरील संकट हे अपघाताने किंवा यदृच्छेने आलेले नसून ते व्यवस्थात्मक आहे. आता पत्रकार बनणे हा एकांडा उपक्रम बनला आहे कारण अनेक वृत्तसंस्था मान न झुकवणाऱ्या पत्रकारांना जबरदस्तीने नोकरी सोडायला भाग पाडत आहेत. याही परिस्थितीत प्रामाणिक पत्रकारितेच्या जपणुकीसाठी आपले आयुष्य आणि व्यावसायिक कारकीर्द पणाला लावणाऱ्या काही मोजक्या लोकांमुळे आम्ही आजही टिकून आहोत ही आश्वासक गोष्ट होय.
कितीतरी स्त्री पत्रकार मोकळेपणाने व्यक्त होताहेत आणि मुक्त पत्रकारिता करत उपजीविका करत आहेत. काश्मिरात इंटरनेट बंद असताना आणि तेथील टी व्ही चॅनेल्सवर सरकारी भूमिकाच दाखवण्याचं बंधन असताना त्या साऱ्या मुस्कटदाबीतूनही वार्तांकन करण्याचे, ट्रोल सैन्याला तोंड देण्याचे धैर्य जे दाखवताहेत त्यांचाही उल्लेख येथे करायला हवा. संस्था म्हणून पत्रकारिता आपल्याच कर्माने लोप पावत असतानाही काही मोजके पत्रकार मात्र आजही स्वत्व टिकवून आहेत.
वार्तांकनाचे पावित्र्य पुनर्स्थापित करणे आपल्याला शक्य होईल काय? दर्शकांना वार्तांकनातील सत्यता, तसेच मते आणि ती मांडण्याचे मंच यामधील विविधता यांचे मोल कळेल अशी आशा मी बाळगतो. वार्तांकनात सच्चाई असेल तरच लोकशाही परिपुष्ट होऊ शकेल.
मी हा रॅमन मेगॅसेसे पुरस्कार स्वीकारत आहे. ज्ञान आणि माहिती विषयक विषमतेने भरलेल्या जगात राहूनही वस्तुनिष्ठ तथ्यांची आणि ज्ञानाची भूक असलेल्या सगळ्या वाचकांना आणि दर्शकांना लाभलेला हा पुरस्कार आहे या भावनेने मी तो स्वीकारत आहे. अनेक तरुण पत्रकारांना या भुकेची जाणीव आहे. पत्रकारितेला आज प्राप्त झालेले विकल रुप येणाऱ्या काळात ते पालटून टाकतील. ही लढाई ते हरतीलही कदाचित पण प्रतिकार करत राहण्याखेरीज अन्य उपाय आता उरलेला नाही. सगळ्या लढाया जिंकण्यासाठी नाही लढल्या जात. रणभूमीवर होते उभे कुणीतरी हे सगळ्या जगाला कळावं म्हणूनही काही लढाया लढायच्या असतात.”
Long live Journalism,
Long live democracy.
#RavishKumar
#झुकेगा_नहीं_साला
#RavishKumarNDTV
#NDTVIndia
Post a Comment