पुस्तकाचे नाव: इस्लामचे भारतीय चित्र
लेखक: हमीद दलवाई
प्रकाशित: 1969, साधना प्रकाशन, पुणे.
"इस्लामचे भारतीय चित्र" हे हमीद दलवाई यांचे अत्यंत महत्त्वपूर्ण पुस्तक आहे, ज्यामध्ये त्यांनी इस्लाम धर्माचा भारतीय समाजातील स्वरूप आणि प्रभाव याचा सखोल अभ्यास मांडला आहे. दलवाई हे समाजसुधारक, लेखक आणि धर्मनिरपेक्षतेचे खंदे समर्थक होते.
स्वातंत्र्यप्राप्तीनंतर 1960 च्या दशकातला फाळणीनंतर तयार झालेला पूर्व पाकिस्तान (आजचा बांगलादेश ) आणि ईशान्य-पूर्व आणि उत्तर भागातील मुस्लिमांची तत्कालीन स्थिती, पश्चिम बंगाल आणि आसाममधील जातीय राजकारणात होरपळून निघालेला भारतीय समाज, त्याची जातीय मानसिकता, शैक्षणिक, सामाजिक, धार्मिक, राजकीय आणि सांस्कृतीक प्रश्नांत 'गुरफटलेलं' मुस्लिम समाजाचं अस्तित्व.. ई.. आदी संवेदनशील विषयाला हात घालत त्या भागात भारत भ्रमण करतांना समाजातील प्रत्येक स्तरावरील घटकांशी त्यांचा झालेला सामना आणि भेटलेल्या प्रत्येक व्यक्तीच्या व्यक्तीमत्वाला आपल्या व्यासंगाने आपलंस करीत मुस्लिम समाजाला येत्या काळात प्रबोधन दिशेने नेण्यासाठी त्यांनी या पुस्तकाच्या माध्यमातून मुस्लिम समाजातील परंपरागत रूढी-परंपरांच्या विरोधात आपली भूमिका मांडली आणि त्यांच्या सुधारणांसाठी आवश्यक ते उपाय सुचवले आहेत.
त्यांच्या एकूण पुस्तकात हे 'प्रवास वर्णन' विविध ठिकाणाच्या स्थानिक मुस्लिम समाजाचे ज्वलंत प्रश्न आपल्या विवेकी चौकटीतून व्यक्त होताना आपणा सर्वांना अंतर्मुख करणारे आहेत मित्रांनो..
ह्या पुस्तकातील मुख्य मुद्दे:
1. धर्मनिरपेक्षता आणि प्रागतिकता:
हमीद दलवाई यांनी या पुस्तकात मुस्लिम समाजाच्या धर्मनिरपेक्षतेकडे वळण्यासाठी केलेल्या प्रयत्नांचा उल्लेख केला आहे. त्यांच्या मते, भारतातील मुस्लिम समाजाने स्वतःची स्थिती सुधारण्यासाठी आणि प्रगतीसाठी धर्माच्या अडथळ्यांपासून मुक्त होणे आवश्यक आहे.
2. इस्लामची पुनर्व्याख्या:
हमीद दलवाई यांनी इस्लामच्या भारतीय संदर्भात पुनर्व्याख्या करण्याची गरज अधोरेखित केली आहे. त्यांचा मुद्दा असा आहे की, इस्लाम हा धर्म वेळोवेळी बदलणाऱ्या समाजाला अनुकूल असावा, ज्यायोगे तो प्रगतीशील आणि प्रगल्भ होईल.
3. मुस्लिम स्त्रियांची स्थिती:
हमीद दलवाई यांनी मुस्लिम समाजातील स्त्रियांची स्थिती आणि त्यांच्यावर होणाऱ्या अन्यायांवर विशेष भर दिला आहे. त्यांचे असे मत होते की, समाजातील स्त्रियांची परिस्थिती सुधारली गेली पाहिजे आणि त्यांना पुरेसें शैक्षणिक आणि सामाजिक अधिकार दिले पाहिजेत.
4. सामाजिक सुधारणा आणि राजकारण:
हमीद दलवाई यांचे हे पुस्तक फक्त धार्मिकचं नाही, तर सामाजिक आणि राजकीय विषयांवरही भाष्य करते. त्यांनी मुस्लिम समाजाच्या हितासाठी पुढाकार घेण्याच्या आणि सरकारच्या सहभागाची आवश्यकता अधोरेखित केली आहे.
शैली आणि भाषा:
लेखकाची शैली अत्यंत स्पष्ट आणि प्रभावी आहे. दलवाई यांनी वैज्ञानिक दृष्टिकोनातून मुस्लिम समाजाच्या समस्यांचा विचार केला आहे. त्यांनी कठोर पण योग्य शब्दांत आपली मते मांडली आहेत, त्यामुळे पुस्तक वाचकांना विचारप्रवर्तक वाटते.
"इस्लामचे भारतीय चित्र" हे हमीद दलवाई यांचे एक धाडसी पुस्तक आहे, ज्याने मुस्लिम समाजाच्या सुधारणेची गरज अधोरेखित केली आहे. भारतीय समाजातील मुस्लीम समाजाने आपली रूढीवादी आणि परंपरावादी विचारसरणी बदलण्याची आणि आधुनिक जगाशी सुसंगत होण्याची आवश्यकता आहे, हे या पुस्तकातून ठळकपणे अधोरेखित केले आहे.
-पुस्तक समीक्षक आणि लेख संपादन
#विद्यार्थीमित्र प्रा. रफीक शेख,
सदस्य, मुस्लिम सत्यशोधक मंडळ, पुणे
डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम विद्यार्थी फाउंडेशन, परभणी.
https://www.vidhyarthimitra.com
#आम्ही_पुस्तक_प्रेमी
Post a Comment