मंटो..!
समाजाला आरसा दाखवणारा लेखक
सआदात हसन मंटो यांचे लिखाण आणि त्यांचे विचार वास्तवदर्शी होते यात शंकाच नाही..
हिंदुस्थान जिंदाबाद, पाकिस्तान जिंदाबाद इन चिखते चिल्लाते नारोके बीच..कई सवाल है. जब गुलाम थे तब आझादी का ख्वाब देखते थे! अब आझाद हैं तो कौनसा ख्वाब देखेंगे? मैं किसे अपना मुल्क कहूँ? लोग धडाधड क्यूँ मर रहें है? इन सब सवालोंके मुख्तलीफ जवाब थे! हिंदुस्थानी जवाब, पाकिस्तानी जवाब.
एक हिंदू जवाब-एक मुसलमान जवाब...असं म्हणत फाळणीच्या वेदनांची धार कागदांवर शब्दांच्या रुपाने उतरवणारा सच्चा साहित्यिक होता सआदत हसन मंटो.
1912 मध्ये त्यांचा जन्म झाला आणि 1955 मध्ये निधन. फाळणी ही त्यांच्या जीवाला लागलेली टोचणी होती. ज्या मुंबईवर त्यांनी अतोनात प्रेम केलं ती मुंबई त्यांना स्वातंत्र्यानंतर एक वर्षातच म्हणजेच 1948 मध्ये सोडावी लागली. मुंबईतल्या ग्रांट रोड, फॉरस रोड या ठिकाणी राहिलेल्या मंटो यांनी मुंबईतली गरीबी, गुन्हे, वेश्यावस्ती अगदी जवळून पाहिली. त्यांच्या कथांमध्येही या सगळ्याचं यथार्थ वर्णन असे.
“मै तो अपनी कहानींयोको एक आईना समझता हूँ जिसमे समाज अपने आपको देख सके..और अगर किसी बुरी सुरतवाले को आईनेसे शिकायत हो तो इसमें मेरा क्या कसूर?”
असं सआदत हसन मंटो थेट विचारत...
हकिकतसे इन्कार करना क्या हमें बेहतर इन्सान बना देता है? असाही सवाल त्यांनी समाजाला उद्देशून केला होता. स्वातंत्र्यपूर्व काळातील प्रस्थापित लेखकांनी त्यांना आपल्यामधे सहभागी करुन घेतलं नाही. मात्र मंटो हे प्रवाहाच्या विरोधात लिहित राहिले. मी जे पाहतो तेच माझ्या लेखणीतून उमटतं. तुम्हाला ते स्वीकारायचं नसेल तर तो तुमचा प्रश्न आहे अशी भूमिका घेऊनच मंटो जगले.
समाजातल्या वास्तवावर रोखठोक भाष्य करणाऱ्या या साहित्यिकाची आजच्या दिवशी पुण्यतिथी आहे. मंटो यांना जाऊन 65 वर्षे पूर्ण झाली आहेत. मात्र त्यांच्या कथा, त्यांचं साहित्य हे आजही अनेकांना भुरळ घालतं. व्हिक्टर ह्युगो, मॉक्झिम गॉर्कि यांसारख्या विदेशी लेखकांचा त्यांच्यावर प्रभाव होता. त्यांनी अनेक इंग्रजी पुस्तकं वाचली होती. त्यातली रोखठोक शैली त्यांनी आपल्या लिखाणातही आणली. सिनेसृष्टीसाठीही त्यांनी काही काळ लेखन केलं. नौशाद, अशोक कुमार यांच्याशी त्यांची चांगली दोस्ती होती.
मंटो यांच्या अनेक कथा अशा आहेत ज्यामध्ये स्त्री-पुरुष संबंधांचं खुलं वर्णन करण्यात आलं. त्यामुळे या कथा अश्लीलता पसरवत आहेत असा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला. यासाठी त्यांच्यावर सहावेळा खटलाही भरवण्यात आला होता. मात्र त्यांच्यावरचा हा आरोप सिद्ध होऊ शकला नाही. हो मात्र जो दंड ठोठावला जाई तो भरण्यासाठी पैसे नसल्याने त्यांना तुरुंगवास मात्र भोगावा लागे.
ठंडा गोश्त या कथेत इश्वर सिंह या गुंडाची आणि त्याची प्रेयसी असलेल्या कुलवंतची गोष्ट सांगितली आहे. या दोघांमध्ये शरीरसंबंध येत असतात. मात्र फाळणीनंतरच्या काही दिवसांमध्ये इश्वर हा त्याच्या प्रेयसीसोबत शरीरसंबंध ठेवण्यात असमर्थ ठरू लागतो. तिला वाटतं की इश्वर सिंहच्या आयुष्यात दुसरी कुणी स्त्री आहे. या वादातून एक दिवस कुलवंत इश्वर सिंहच्या मानेवर सुरा फिरवते. त्याचा जीव जाणार असतो तेव्हा ती त्याला विचारते की आता तरी खरं सांग. तेव्हा तो तिला सांगतो फाळणी झाल्यानंतर जे अत्याचार झाले त्यातला एक अत्याचार मी देखील केला होता. मात्र तो केल्यानंतर मला समजलं की ती मुलगी मेली होती. जसं थंड मांस असतं ना (ठंडा गोश्त) तशीच ती होती.
या कथेवरुन बराच वादंग माजला होता. अगदी तशीच काहीशी वादग्रस्त कथा होती ती बू ..बू ही कथा एका तरुणाची आहे. हा तरुण वेश्यांकडे जात असतो किंवा कधी कधी त्याच्याकडे वेश्या येत असतात. एक दिवस त्याच्या घरी आलेली वेश्या, तिच्याकडून मिळालेलं सुख त्याला तृप्त करतं. मात्र त्या वेश्येच्या अंगाला एक दुर्गंध (बू) येत असतो. ती वेश्या त्याच्या घरुन निघून जाते. मात्र त्याच्या लक्षात राहतो तो दुर्गँध. काही कालावधीनंतर या तरुणाचं लग्न होतं. तेव्हा तो त्याच्या बायकोमध्येही तसाच दुर्गंध शोधत राहतो. असा काहीसा कथाभाग बू या कथेत आहे. ही कथाही वाचणाऱ्याला अस्वस्थ करते. अंतर्मुख करते. विचार करायला भाग पाडते.
उपजत प्रतिभा, संवेदनशील मन आणि लेखनाची किमया असे तिन्ही गुण मंटो यांच्या अंगी होते. त्यामुळे त्यांच्या लेखणीतून उतरणारं लिखाण हे बावनकशीच होतं. त्यावेळी ते झिडकारलं गेलं, नाकारलं गेलं मात्र आज ते लोकांना पटतं आहे. त्यामुळेच त्यांच्या कथांवर आजही नाटकं लिहिली जातात. सादर केली जातात. एक हाँ हे त्यांच्याच कथेवर आधारित नाटक सध्या हिंदी रंगभूमीवर सादर होतं आहे. शेखर सुमन आणि सुचित्रा कृष्णमुर्ती हे दोघेजण त्यात काम करत आहेत.
मंटो यांचे नाव जसे काहीसे विचित्र होते तसाच त्यांचा स्वभावही काही प्रमाणात लहरी होता. त्यांना सिगरेट आणि दारु पिण्याची सवय तर होतीच. मात्र त्यांची वृत्तीच बेफाम, बेफिकीर होती. कधी कधी मंटो वैफल्यग्रस्त होऊन स्मशानातही जाऊन बसत. वडिलांचे आणि त्यांचे कधीही पटले नाही. सआदत हसन मंटो मुंबईत आले तेव्हा त्यांनी काही काळ पत्रकारिताही केली. मात्र ती न रुचल्याने ते हिंदी सिनेसृष्टीसाठी लिखाण करु लागले. स्वतंत्र नाटकंही लिहू लागले. मुंबईत त्यांचे वास्तव्य होते तेव्हा त्यांनी भायखळा, नागपाडा भागातल्या अंधाऱ्या चाळी. इराण्यांची हॉटेल्स, फोरास रोड, वेश्या वस्ती हे सगळे जवळून पाहिलं होतं. त्याचाच संदर्भ त्यांच्या लेखनातही येत असे.
त्यांच्या कथा या पुढचा विचार मांडणाऱ्या होत्या. स्वातंत्र्यपूर्व काळातले मंटो हे एक विद्रोही विचार करणारे साहित्यिक होते असं म्हटलं तर मुळीच वावगं ठरणार नाही. मात्र मंटो यांना लागलेल्या सिगरेट आणि दारुच्या व्यसनाने घात केला. पाकिस्तानात गेल्यानंतर म्हणजेच 1948 नंतर त्यांचे हे व्यसन बळावलं.
1955 मध्ये आजच्याच दिवशी म्हणजेच 18 जानेवारीला त्यांचं निधन झालं. साहित्यातला एक तारा निखळला. मात्र या ताऱ्याच्या लेखणीचा प्रकाश आजही अनेकांना नवे मार्ग दाखवतो आहे. आज मागे वळून पाहताना वाटतं की काय ग्रेट लेखक होता मंटो. हे वाटणं जितकं अस्सल आहे तितकीच त्यांना त्यावेळी समाजाने स्वीकारलं नाही याची खंतही वाटतेच! मात्र मंटोच्या कथा आजही समाजाला आरसा दाखवण्याचं काम करत आहेत हे विसरुन चालणार नाही.
-संकलित लेख
इंटरनेटवरून साभार
Post a Comment