"खरा विद्यार्थी कधीच सुट्टी घेत नसतो..."
#विद्यार्थीमित्र
नुकताच 2024-25 या शैक्षणिक वर्षातील दहावीचीं बॅच संपली,बोर्ड परीक्षेच्या तयारी दरम्यान, 8-10 तासांच्या अभ्यास सत्रांचे नियोजन तीन टप्प्यांत पार पाडताना विद्यार्थ्यांसोबत माझाही वाचन प्रवास चालू होता. अभ्यासाच्या या प्रक्रियेत नुसते वाचन नव्हे, तर त्याचे आत्मसातीकरण हा खरा अध्यात्मिक अनुभव ठरला. जे जे वाचले, ते ते जगले, तरच वाचनाची खरी फलश्रुती साधता येते..!
वैचारिक आणि प्रेरणादायी पुस्तकांचे वाचन म्हणजे मनाच्या क्षितिजांचा विस्तार..! हे पुस्तकंच आपल्याला नवी दिशा, नव्या संधी आणि नव्या शक्यता दाखवतात. वाचनामुळे जगण्याचा दृष्टीकोन बदलतो, निर्णयक्षमता सुधारते आणि आयुष्य अधिक अर्थपूर्ण होते. जीवनप्रवासात समृद्धता, प्रगल्भता आणि उदात्त दृष्टीकोन हे त्यातूनच आकार घेतात.
शालेय जीवनातच अवांतर वाचनाची गोडी लागली होती, पण शैक्षणिक आणि सामाजिक चळवळीतील सक्रिय सहभाग, तसेच पुरोगामी, वैचारिक लोकांचे मार्गदर्शन यामुळे महाविद्यालयीन जीवनात विवेकी दृष्टिकोन (Rationalist Mindset) अधिक विकसित होत गेला. जगण्याचे भान आणि विचार करण्याची सखोलता ही वाचनाची मोठी देणगी मला ह्या सर्वांमुळे लाभली.
शैक्षणिक, सामाजिक, आर्थिक, मानसिक, राजकीय आणि आध्यात्मिक विज्ञान (Spiritual Science) या विषयांवरील सातत्यपूर्ण वाचनाने स्वतःवरील विश्वास अधिकाधिक समृद्ध होत गेला आणि व्यवसायिक क्षेत्रात सामाजिकता अग्रस्थानी ठेवण्याचा दृढ निश्चय झाला. आज जे काही यश पदरी पडलंय, त्यामागे वाचनाने दिलेली सशक्त अभिव्यक्ती आहे, आणि म्हणूनच मी कायम पुस्तकांचा ऋणी राहीन, ज्यानं आयुष्याला एक नवी दिशा दिली आहे.
दररोज 3-4 तासांचे वाचन, महाराष्ट्रभर होणारी शैक्षणिक आणि सामाजिक व्याख्याने, चर्चासत्रे, ऑनलाईन संवाद, परिसंवादातील सक्रिय सहभाग, या सर्वांनी माझ्या वाचन प्रेरणेला नवे बळ मिळवून दिले. प्रत्येक पुस्तक एक नवीन गुरु असतं, प्रत्येक वाचन हा एक नवीन प्रवास असतो.
मित्रांनो, ज्ञान हीच खरी शक्ती आहे, आणि वाचन हीच त्या शक्तीची गुरुकिल्ली..! वाचन म्हणजे फक्त शब्दांची ओळख नव्हे, तर समाज, संस्कृती, विज्ञान, अर्थशास्त्र, इतिहास आणि भविष्यकालाच्या संधींना भिडण्याची संधी आहे.
जे जग बदलतात, ते आधी स्वतःला बदलतात..! आणि स्वतःला बदलण्यासाठी वाचना सारखा उत्तम मार्ग नाही. म्हणूनच, खरा विद्यार्थी कधीच सुट्टी घेत नाही—तो दररोज नव्या ज्ञानाच्या शोधात असतो..!
"आज जे वाचतो, तेच उद्या आपली ओळख ठरेल..!"
म्हणूनच, चला वाचूया, शिकूया आणि आयुष्य समृद्ध करूया मित्रांनो..!
धन्यवाद मित्रांनो..लेख आवडला असेल, तर आपल्या प्रियजनांसोबत नक्की शेअर करा.!
इतरांसोबत सकारात्मक विचार शेअर करणे हाच मानसिक शक्तीचा सर्वात मोठा स्रोत आहे.
-एक पुस्तकप्रेमी आणि समाजमाध्यमकार..
#विद्यार्थीमित्र प्रा.रफीक शेख
The Spirit of Zindagi Foundation
🎓 डॉ. ए.पी.जे.अब्दुल कलाम विद्यार्थी फाउंडेशन, परभणी.
https://www.vidhyarthimitra.com
Post a Comment