"लोक कसेही वागले, तरी आपण आपले चांगुलपण जपायला विसरू नये."
माणसांना समजून घ्यायचं तर... ✍️
माणसं... समजायला कठीण, थांग न लागणारी..! आयुष्यात असंख्य लोक भेटतात—काही समजतात, काही न बघताच जाणवतात, आणि काही शेवटी अर्धवटच उमगत राहतात. खरं तर, पूर्णपणे कुणी कुणाला कधी समजू शकत नाही. आयुष्यभर संसार करणारे नवरा-बायकोही एकमेकांना पूर्णपणे ओळखू शकत नाहीत, तर बाकीचं तर सोडाच..!
माणसं राग धरतात, अबोला धरतात, रुसतात, भांडतात. एखाद्याने चांगल्या हेतूने काही सांगितलं तरी त्याचाच राग धरतात, अपमान करतात, दुरावतात. नात्यात, मैत्रीत, ओळखीत आणि अगदी आभासी जगतातही—व्हॉट्सअॅप, फेसबुकवरही हे सारखंच होतं. लोकं ब्लॉक करतात, दुर्लक्ष करतात, आणि तरीही स्वतःला ‘सहज वागलो’ असं समजतात.
पण यात गंमत अशी की, जिथे नको तिथे स्तुती होते, तिथेच पाठीमागे टीका रंगते. समोर गोड बोलणारेच मागे विखारी बोलतात. कोणीतरी खरं सांगायचा प्रयत्न केला, तर त्यालाच वाईट ठरवलं जातं. उलट जे खोटं बोलतात, तेच मोठे होतात. अशावेळी "उलटी गंगा वाहते!" याचा खरा अर्थ उमजतो.
माणूस आपल्याला जितका कळतो, तितकाच न कळणारा असतो. प्रत्येकाला स्वतःचंच बरोबर वाटतं. दुसऱ्याच्या चुका मोठ्या वाटतात, पण स्वतःच्या मात्र लपवल्या जातात. कधी नुसताच टाईमपास म्हणून जवळ येणारे असतात, आणि गरज संपली की सहज दुरावणारेही असतात. खऱ्या माणसांची संख्या कमी असते, पण खोट्या गोडगोड बोलण्याची चलती असते.
कधी कधी वाटतं, माणसांच्या वागणुकीला काही अर्थच उरलेला नाही. लोकांना माणसं हवी असतात, पण नातं जपायची तयारी नसते. काहींना आपलेपणा फक्त शब्दांत दाखवता येतो, पण तो कृतीत उतरवता येत नाही. कोणी मदतीसाठी हाक मारली, तर आपण पुढे येतो; पण गरज संपल्यावर तीच लोक आपल्याला विसरतात. हेच आयुष्याचं कटू सत्य आहे—जेवढं अधिक चांगुलपणाने वागाल, तेवढंच अधिक दुःख मिळेल.!
पण या सगळ्यातही एक गोष्ट विसरता कामा नये—दुसऱ्याने काहीही केलं, तरी आपण आपली माणुसकी सोडायची नाही. लोक बदलतात, परिस्थिती बदलते, पण आपले चांगले विचार आणि स्वभाव कधीही बदलू नये. कारण जग बदलणं आपल्या हातात नसलं, तरी स्वतःला चांगलं ठेवणं नक्कीच आपल्या हातात असतं. माणसांनी कितीही दुखावलं, तरी आपण आपल्या माणुसकीत घट्ट राहायचं.
शेवटी मित्रांनो.. माणसं कळली किंवा नाही कळली, पण आपण त्यांना आपुलकीनं समजून घ्यायचं—इतकंच आपल्या हातात आहे! कारण जगणं हे लोकांच्या बोलण्यावर नाही, तर आपल्या विचारांवर अवलंबून असतं..!
धन्यवाद मित्रांनो..! लेख आवडला असेल, तर आपल्या प्रियजनांसोबत नक्कीच शेअर करा.🙏
सकारात्मक विचार शेअर करणे हीच मानसिक आणि सामाजिक शक्ती वाढवण्याची सर्वात मोठी ताकद आहे. जेव्हा आपण प्रेरणादायक विचार इतरांसोबत वाटतो, तेव्हा ती ऊर्जा द्विगुणित होते आणि आपले जीवन अधिक सकारात्मक आणि समृद्ध बनते. त्यामुळे, चांगल्या गोष्टी शेअर करत राहा आणि एकमेकांना पुढे जाण्यास प्रेरित करा मित्रांनो..!
-विचार संकलन आणि संपादन.. ✍️
-एक पुस्तकप्रेमी आणि समाजमाध्यमकार..
#विद्यार्थीमित्र प्रा.रफीक शेख
The Spirit of Zindagi Foundation
🎓 डॉ. ए.पी.जे.अब्दुल कलाम विद्यार्थी फाउंडेशन, परभणी.
https://www.vidhyarthimitra.com
Post a Comment