नुसत्या वाचनाने माणूस मोठा होत नाही... कारण वाचन म्हणजे केवळ शब्दांचे आकलन नव्हे, तर विचारांचे संवर्धन असते. वाचलेल्या विचारांना स्वतःचे अनुभव जोडायचे असतात. जेव्हा एखादा विचार आपल्या जीवनात प्रत्ययास येतो, तेव्हाच तो आपला होतो. अन्यथा, तो फक्त कागदावर उमटलेला शाईचा ठिपका राहतो.
साहित्य हे केवळ मनोरंजनासाठी नसते; ते आत्मसंवादासाठी असते. करमणूक करवून घेतानाही स्वतःला खर्ची घातल्याशिवाय ती करमणूक मनात भिनत नाही. जी कला केवळ पाहिली जाते ती डोळ्यांपर्यंतच मर्यादित राहते, पण जी जगली जाते ती आत्म्याला स्पर्श करते.
'साहित्य हे निव्वळ चुन्यासारखं असतं.' त्यात आपल्या विचारांचा कात टाकल्याशिवाय आपल्या आयुष्याचा ग्रंथ रंगत नाही. जेव्हा आपण त्यातील विचारांशी संवाद साधतो, त्यांच्यावर चिंतन करतो, तेव्हा ते साहित्य केवळ लेखकाचे राहात नाही – ते आपले होते, आपल्याला आकार देते.
लेखकाला हवा असतो संवाद, त्याशिवाय त्याचं पान रंगत नाही. पण तो संवाद केवळ वाचक-लेखक यांच्यात न राहता वाचकाच्या मनात विचारांचे नवे अंकुर फुलवणारा असावा. विचारांना कृतीची जोड मिळाली, तरच ते समाजात परिवर्तन घडवू शकतात.
वाचन हे ज्ञानाचे दार उघडते, पण त्या दारातून पाऊल टाकून पुढे जाणे, अनुभवातून शिकणे आणि विचारांना कृतीत उतरवणे – यातच खरा आत्मविकास आहे मित्रांनो..! वाचनाने दिशा मिळते, अनुभवाने ती स्पष्ट होते आणि चिंतनाने ती सखोल होते. वाचलेले जेव्हा जगले जाते, तेव्हाच खरे शिकले जाते.!
शब्द हे शक्तिशाली असतात, पण त्यांना कृतीची जोड लाभली, तरच ते समाजपरिवर्तनाचे साधन बनतात. विचार फक्त मेंदूत राहिले, तर ते कधीच क्रांती घडवत नाहीत. चिंतन हे विचारांना सुस्पष्टतेकडे नेते, तर अनुभव त्यांना अधिक अर्थपूर्ण बनवतो.
असे म्हणतात की, "ज्ञान आणि अनुभव यांची सांगड घातली, की त्यातूनच खरा समज जन्माला येतो." फक्त माहिती मिळवणे म्हणजे शिक्षण नव्हे, तर ती माहिती समजून घेऊन योग्य वेळी योग्य ठिकाणी वापरणे, हाच खरी शिक्षणाची खूण आहे.
शेवटी, कोणत्याही यशस्वी व्यक्तीच्या आयुष्याचा मागोवा घेतला, तर दिसते की त्यांच्या यशामागे वाचनाचा पाया, अनुभवाची शिदोरी आणि चिंतनाची धार आहे. त्यामुळे, वाचूया, अनुभव घेऊया आणि विचारांना अधिक खोल उंची देत आपल्या जीवनाचा एक अर्थ शोधूया मित्रांनो..!
धन्यवाद मित्रांनो..लेख आवडला असेल, तर आपल्या प्रियजनांसोबत नक्की शेअर करा.!
-विचार संकलन आणि संपादन.. ✍️
-एक पुस्तकप्रेमी आणि समाजमाध्यमकार..
#विद्यार्थीमित्र प्रा.रफीक शेख
The Spirit of Zindagi Foundation
🎓 डॉ. ए.पी.जे.अब्दुल कलाम विद्यार्थी फाउंडेशन, परभणी.
https://www.vidhyarthimitra.com
Post a Comment