दुःखद बातमी..!😢
प्राध्यापक विठ्ठल (बाबासर) भास्करराव गायकवाड देशमुख (चिंचोलीकर) सर...
(महात्मा फुले कनिष्ठ महाविद्यालय, परभणी)
काल संध्याकाळी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने सरांचं अकस्मात निधन झाल्याची बातमी, आता उशिरा एका मित्राकडून कळली… आणि मन अक्षरशः अस्वस्थ झालं..
सन 2001 मध्ये मी महात्मा फुले कनिष्ठ महाविद्यालयात प्रवेश घेतला..त्या काळात वि. बी. गायकवाड सरांकडे मराठी आणि अर्थशास्त्र हे दोन्ही विषय होते.
आज मागे वळून पाहतो तेव्हा लक्षात येतं.. त्यांनी शिकवलेली भाषा फक्त शब्द नव्हती; त्यांनी शिकवलेलं अर्थशास्त्र फक्त संकल्पना नव्हती. त्यांच्या वर्गात शिस्त होती, पण ती भीतीने नव्हती;
ती होती त्यांच्या प्रभावाने, त्यांच्या अभ्यासाने आणि त्यांच्या निखळ प्रेमाने...
त्यांचं व्यक्तिमत्त्व जणू एखादं जिवंत पुस्तक...अभ्यास, साहित्यप्रेम, संस्कार आणि माणुसकीचा ध्यास यांचा एक विलक्षण संगम.
त्यांच्या अध्यापनात केवळ विषय नव्हता; तर जीवनाचे धडे, मूल्यांची पेरणी आणि माणूस घडवण्याची तळमळ होती.
आज मी शिक्षक-प्रशिक्षणाच्या अनेक व्याख्यानांत उभा राहतो,
तेव्हा माझ्या प्रत्येक वाक्यात, प्रत्येक विचारात, गायकवाड सरांचं नाव नकळत उच्चारलं जातं. त्यांनी दिलेला आत्मविश्वास हा माझा आजही कायमचा वारसा आहे.
परभणीतील बहुजन, वंचित, गरिबांच्या लेकरांसाठी कै. अण्णासाहेब गव्हाणे यांच्या दूरदृष्टीतून उभी राहिलेली महात्मा फुले एज्युकेशन सोसायटीची शाळा व कनिष्ठ महाविद्यालय ही संस्था माझ्यासारख्या हजारो विद्यार्थ्यांची आयुष्यं घडवणारी भक्कम वीट ठरली आहे.
साताऱ्याच्या रयत शिक्षण संस्थेसारखीच, मराठवाड्यात ही संस्था खऱ्या अर्थाने शिक्षणाची क्रांती घडवणारी होती..
गायकवाड सरांचा माझ्यावर विशेष स्नेह, माझ्या भाषेमुळे होता..हे आजही माझ्या हृदयात अभिमानाने कोरलं गेलंय.
मराठी साहित्य - वाचनाची गोडी आपणचं आम्हास लावली, ग. दि. मा, पु. ल. देशपांडे, व. पू. काळे, गो. नी. दांडेकर, अण्णा भाऊ साठे,साने गुरुजी,शांता शेळके आणि शाहीर अमर शेख यांच्या साहित्य वाचनातुनचं आज माझी अभिव्यक्ती समृद्ध झालीये सर.. त्याचं सर्वं श्रेय आपणासचं..
सरांनी आमचं विश्व घडवलं,.अंधारात रस्ता दाखवला,
ज्ञानाच्या दिव्याने आयुष्य उजळवलं.
आज ते नाहीत…
पण त्यांच्या आठवणी, त्यांचे शब्द,
त्यांची शिकवण आणि माणुसकीची ती नजर
कधीही नाहीशी होणार नाही.
गायकवाड सर, आपण आमच्यात नसाल, पण
आपण आमच्या रक्तात, शब्दांत, विचारांत कायम असाल.
आपल्याला विनम्र श्रद्धांजली.🌹😢
- आपला एक स्नेहीं आणि प्रिय माजी विद्यार्थी
#विद्यार्थीमित्र प्रा.रफीक शेख
The Spirit of Zindagi Foundation
🎓 डॉ. ए.पी.जे.अब्दुल कलाम विद्यार्थी फाउंडेशन, परभणी.
https://www.vidhyarthimitra.com
Post a Comment