ध्येय स्पष्ट असेल, मार्ग निश्चित असेल आणि प्रामाणिक, अथक प्रयत्नांची जोड असेल, तर जगातील कोणतीही शक्ती तुम्हाला ध्येयप्राप्तीपासून रोखू शकत नाही. त्यासाठी सकारात्मक विचारसरणी अंगीकारणे आवश्यक आहे.
यशस्वी होणं म्हणजे निश्चित केलेल्या अंतिम ध्येयाप्रत पोचणं. यश हा अपघात किंवा योगायोग नसतो. यशाला शॉर्टकट नसतो. यशस्वी होण्यामधील सर्वांत मोठा अडथळा म्हणजे भीती. स्वामी विवेकानंद म्हणतात, "भीती म्हणजे मृत्यू, भीती म्हणजे दुबळेपणा. मित्रांनो, निर्भय व्हा. भीतीवरचा जालीम उपाय म्हणजे कृती!‘
"अशक्य'" या शब्दापासून आपण जितके दूर जाऊ, तितके यशाच्या समीप जाणारच! यशस्वी होण्यासाठी पुढील बाबींवर लक्ष केंद्रित करायला हवे -
१) ध्येय निश्चित करा.
२) ते कसं प्राप्त करता येईल, याचा सतत विचार करा.
३) ध्येयप्राप्तीपर्यंत थांबू नका.
विश्वविख्यात शिल्पकार मायकल ॲंजेलोला त्याच्या अप्रतिम कलाकृतींबद्दल विचारलं गेलं होतं, तेव्हा तो म्हणाला होता, "दगडातील पुतळा तर आधीपासूनच होता. मी फक्त त्याच्यावरचा अनावश्यक भाग काढून टाकला!‘
या शिल्पकाराप्रमाणेच ध्येयाचं चित्र स्पष्टपणे आपल्याला पाहता आलं पाहिजे. आपल्या मेंदूला ध्येयाबद्दल स्पष्ट आणि सरळ सूचना आवश्यक असतात; तरच आपण आपल्या सर्व शक्ती त्यावर केंद्रित करू शकतो आणि त्यातूनच अजरामर कार्य उभं राहतं. तुमचं ध्येय हेच तुमचं सर्वस्व असायला हवं. ध्येयानं झपाटून जा.
ध्येय स्पष्ट असेल, मार्ग निश्चित असेल आणि प्रामाणिक, अथक प्रयत्नांची जोड असेल, तर जगातील कोणतीही शक्ती तुम्हाला ध्येयप्राप्तीपासून रोखू शकत नाही. त्यासाठी सकारात्मक विचारसरणी अंगीकारणे आवश्यक आहे. नकारात्मक विचार, व्यक्ती, जागा, भावना यांचा विषाप्रमाणे त्याग करायला शिका. मग अनुभवा निसर्गाची संपूर्ण ताकदीनिशी तुम्हाला दिलेली सकारात्मक, प्रतिसादात्मक स्पंदने! प्रयत्न कधीच सोडू नका. जबाबदारी, जोखीम पत्करा.
टॉम वॉटसन म्हणतात, "तुम्हाला यशस्वी व्हायचं असेल तर तुमच्या प्रयत्नांचा - ते असफल ठरत असले तरीही - वेग दुप्पट करा.‘ प्रत्येक अपयशानंतरही जोमानं उभं राहता आलं पाहिजे. उत्कृष्ट नियोजन हाच यशाचा गुरुमंत्र.
जलतरणपटू मायकल फेल्प्स ऑलिंपिक सुवर्णपदकाचा विजेता. जागतिक विक्रम मोडण्याचं त्याचं ध्येय होतं. त्यासाठी "फक्त २४.६ सेकंद‘ हाच विचार त्याच्या मनात सतत घोळत असे. रोज अठरा तास तो पाण्यात सराव करीत असे. जिद्द, चिकाटी असावी तर अशी..!
यशस्वी लोकांची मानसिकता अशीच असते. जास्तीत जास्त काम करण्याची तयारी दर्शवा. तुमच्याकडून जे अपेक्षित आहे, ते दिल्यानंतर तुम्ही आणखी काय देता यावरच तुमचं यश अवलंबून असतं. मोबदल्यापेक्षा कितीतरी अधिक द्यायला शिका. फोर्डच्या "बिझिनेस फिलॉसॉफी‘चं सार होतं, "जास्तीत जास्त लोकांना कमीत कमी किमतीत चांगल्यात चांगली वस्तू द्या.‘
"तुला संगितातली जाण नाही, प्रतिभा नाही,‘ असं ज्याला हिणवलं जायचं त्या बिथोव्हेननं अजरामर संगीतरचना जगाला दिल्या. त्यानं दृष्टिकोन बदलला. अपयशी होणं नाकारलं. आपण जे आहोत, ते केवळ आणि केवळ आपले विचार आणि कृती यामुळेच!
दोन-तीन ग्रॅम वजनाचा हमिंग बर्ड त्याच्या लवचिक शरीरामुळे नेत्रदीपक कसरती करू शकतो; परंतु आकाशात उंच भरारी घेऊ शकत नाही. याउलट दीडशे किलो वजनाचा शहामृग पक्षी असूनही उडू शकत नाही; मात्र बळकट पायांमुळे तो ताशी पन्नास मैल वेगाने धावू शकतो.
थोडक्यात, आपली बलस्थानं ओळखा आणि सर्व ताकदीनिशी लढा. आत्यंतिक तळमळ हीच कार्यसिद्धीची सुरवात असते.
यश मिळवण्यासाठीची संधी नेमकी असते कुठं? कुठंही.
आत्ता तुम्ही आहात तिथंच. वर, खाली, आजूबाजूला! फक्त मन खुलं ठेवा. प्रयत्नवादी व्हा. आशावादी बना... मी प्रार्थना करते, तुम्ही स्वप्नं बघा! स्वप्नांचा पाठलाग करताना येणाऱ्या संकटांचा निर्भीडपणे सामना करा. तुमची स्वप्नं पूर्ण होवोत..!
संकलित लेखन:इंटरनेटवरून साभार
विद्यार्थी मित्र प्रा.रफीक शेख,
🎓डॉ. ए.पी.जे.अब्दुल कलाम विद्यार्थी फाउंडेशन, परभणी.
https://www.vidhyarthimitra.com
Post a Comment