प्रिय विद्यार्थी मित्रांनो;
विद्यार्थी मित्र प्रा.रफीक शेख सर लेखन-संपादित
विद्यार्थ्यांसाठी करिअर मार्गदर्शन आणि समुपदेशन लेखमाला भाग-3
करिअर मार्गदर्शन...एक मास्टर प्लॅन
दहावी- बारावीच्या परीक्षांचे अपेक्षित आणि अनपेक्षित निकालानंतर घराघरात विद्यार्थ्यांचे करिअर, पुढील शिक्षण याविषयी चर्चा सुरू होते. मात्र, अनेकदा विद्यार्थ्यांप्रमाणेच पालकही याबाबत संभ्रमात असतात. डोळसपणे आणि पुढील भावी संधीचा ह्या सर्व बाबींचा विचार करून आणि योग्य मार्गदर्शन घेणे महत्त्वाचे आहे.
आज उच्च शिक्षणाला स्पेशलायझेशन, स्किल बेस्ड लर्निंग तसेच मल्टी डिसिप्लिनरी अप्रोच या महत्त्वाच्या घटकांची जोड मिळाली आहे. योग्य माहिती आधाराने जाणीवपूर्वक निवडलेले करिअर केवळ विद्यार्थ्यांची बौद्धिक, नैतिक क्षमता वाढवत नाही, तर देशाची सामाजिक, आर्थिक बाजूदेखील बळकट करत असते.
प्रामुख्याने करिअर निवडताना 'भविष्यातील आर्थिक उत्पन्नाचे साधन' हा एकच विचार केला जातो. त्यात काही गैर नाही. परंतु त्याला विद्यार्थ्यांची व्यक्तिगत आवड तसेच बौद्धिक क्षमतेची जोड मिळाली, तर प्रत्येक व्यक्ती केवळ जॉब ओरिएंटेड न होता जॉब सॅटिसफॅक्शनसह समाजाच्या सक्षम निर्मितीसाठी आपलं योगदानही देऊ शकतं..
आजच्या माहिती तंत्रज्ञानाच्या युगात इंटरनेट, करिअर वेबसाइटस् उपयुक्त माहिती पुरवू शकतात.
चला तर मग, या सर्व प्रक्रियेत पालक-विद्यार्थी कोणती भूमिका घेऊ शकतात, याचा मास्टर प्लान बनवूया.
विद्यार्थ्याची भूमिका:
आजचा विद्यार्थी हा जागरूक आणि चौकस आहे. योग्य दिशेने वाटचाल केल्यास करिअर निवड ही खूप सोपी व सहज होऊ शकेल.
- सुट्टीचा कालावधी आपल्या आवडीच्या क्षेत्राची माहिती गोळा करण्यासाठी वापरावा.
- कॉलेज निवडताना वेळ वाचवण्याचा विचार करावा. वाचलेला वेळ सखोल अभ्यासाकरिता उपयोगी ठरेल.
- निवडलेल्या शाखेतील विविध करिअरसंबंधी माहिती अधिकृत वेबसाइटद्वारे मिळवता येईल.
- शाळेची माजी विद्यार्थी संघटना असल्यास तुमच्या निवडलेल्या क्षेत्राशी निगडीत माजी विद्यार्थी उद्बोधक माहिती पुरवू शकतील.
- फेसबुक, व्हाट्सएप व अन्य सोशल साइटद्वारे सीनिअर मित्र-मैत्रिणींशी चर्चा शक्य आहे.
- प्रत्येकाने स्वतःच्या जमेच्या बाजू आणि न जमणाऱ्या बाजू जाणून घ्याव्यात. स्वतःच्या मूल्यमापनामुळे योग्य दिशेने वाटचाल शक्य होईल.
- शाळेतील शिक्षक तसेच मुख्याध्यापकांचे मार्गदर्शन घ्यावे. तुम्हाला सर्वात चांगले ओळखणारे शिक्षकच असतात, जे तुम्हाला तुमच्या शैक्षणिक क्षमतेबद्दल सांगू शकतील.
पालकांची भूमिका:
- दहावीची परीक्षांचे निकाल आलेल्या विद्यार्थ्यांच्या पालकांनी प्रथम पाल्याची गुणवत्ता, प्राथमिक इयत्तांपासून त्याचा प्रत्येक विषयाकडील कल लक्षात घेऊन कला, वाणिज्य, विज्ञान यांपैकी एका शाखेची निवड करावी.
- साधारणपणे उच्च माध्यमिक परीक्षेनंतर पुढील शिक्षणाची आखणी केली जाते. मात्र त्याची पूर्वतयारी शालान्त परीक्षेनंतरच करून निश्चित ध्येय ठरवावे.
- निवडलेल्या क्षेत्राची व्याप्ती, लागणारे विशेष कौशल्य, कालावधी तसेच भविष्यातील त्याची उपयुक्तता, निवडलेल्या क्षेत्राशी संबंधित शाखा व उपशाखा याचाही मुलांसोबत विचार करावा.
- निवडलेल्या क्षेत्रातील जाणकार, तज्ज्ञांची भेट घेऊन अधिक माहिती घ्यावी.
- मुलांना त्यांच्या मनाप्रमाणे करिअर निवडण्यासाठी एकटे सोडू नये. बऱ्याचदा या वयातील विद्यार्थी अपरिपक्व असतो. अंधानुकरण, समवयस्क मित्र-मैत्रिणींचे विचार, स्वत:ची अपुरी ओळख यामुळे चुकीचे निर्णय घेऊ शकतो.
'ट्रायल अँड एरर' पद्धतीमुळे इथे मोलाचा शैक्षणिक काळ वाया जातो, निराशाही येऊ शकते.
पालकांनी स्वत:च्या अपेक्षांचे ओझे मुलांवर लादू नये. त्यांची मित्र-मैत्रिणींबरोबर तुलना करू नये. यामुळे मुलांचे मानसिक स्वास्थ्य हरवतेच, त्यांच्यात न्यूनगंड निर्माण होऊ शकतो. मुलांमधील विशेष प्राविण्य ओळखून त्याला प्रोत्साहित करावे.
- घरातील वातावरण दबावाचे नसावे. मुलांना मत मांडण्याचे स्वातंत्र्य असावे.
- काही वेळेस पालक स्वतःच नवनवीन व्यवसाय क्षेत्रामुळे प्रभावित होतात. कधी मुलाने हे करावे अशी अपेक्षा करतात, तर कधी ते करावे, अशी अपेक्षा करतात. त्यामुळे मुलांमध्ये धरसोड वृत्ती निर्माण होईल.
- आवड कालांतराने बदलू शकते. त्यानुसार अनेक पर्यायांचा विचार करावयास हरकत नाही. प्रत्येक विद्यार्थ्याने एका मुख्य करिअरचा किंवा त्यास पूरक असलेल्या करिअरचा नक्कीच विचार करावा.
- करिअर निवडताना विविध क्षेत्रातील मागणीचा विचार पालकांनी करावा. मागणी तसा पुरवठा या तत्त्वानुसार करिअर कालबाह्य होणार नाही.
- पालकांनी विद्यार्थ्यांना असाध्य तसेच अवास्तव उद्दिष्टांमुळे संभावणाऱ्या निराशेतून सावरले पाहिजे.
विद्यार्थी , पालक,शिक्षक आणि समुपदेशक या सर्वांच्या चर्चेतुन पालकांनी आपल्या मुलाच्या योग्य करिअर निवडीसाठी सर्वतोपरी सहकार्य करावे..
पालक आणि विद्यार्थी मित्रांनो न संकोचता एकमेकांशी मुक्त संवाद साधून करिअरच्या निवडीसाठी योग्य मार्ग निवडून त्यांत आपलं जीवन सुकर आणि अर्थपूर्ण बनवा बरं..
पुढील वाटचालीस आपणास हार्दिक सदिच्छा आणि शुभेच्छा..!
आपणांस काही सहकार्य लागत असेल तर नक्कीच कळवा मित्रांनो...
🎓अधिक माहितीसाठी संपर्क:
विद्यार्थी मित्र प्रा.रफीक शेख,
9822624178 / 9970717187
Post a Comment