माणसाचे अंतःकरण बदलल्याशिवाय त्याची वागणूक बदलणार नाही. समाजात बदल घडवून आणायचे असतील तर माणसांची मने शुद्ध विचारांनी समृद्ध व्हायला हवीत..
शिक्षण म्हणजे काय ? या प्रश्नामुळे मला आश्चर्य वाटते. आपण शाळेत जातो म्हणजे काय करतो? वेगवेगळे विषय शिकतो. परीक्षा उत्तीर्ण करतो. त्यात श्रेणी मिळवतो. शिक्षण म्हणजे नक्की काय ? हा प्रश्न विद्यार्थी, पालक आणि शिक्षक या सर्वांसाठी सारखाच महत्त्वाचा आहे. एवढेच नव्हे तर या पृथ्वीवर राहणाऱ्या सर्वांसाठी तो महत्त्वाचा प्रश्न आहे. परीक्षेत उत्तीर्ण होणे आणि एखादी नोकरी मिळवणे हाच शिक्षणाचा हेतू असू शकतो काय ?
की, आपण तरुणवयाचे असतानाच संपूर्ण जीवन-व्यवहार समजून घेणे हा शिक्षणाचा हेतू असतो? आयुष्य म्हणजे काही एखादी नोकरी किंवा व्यवसाय नाही. नोकरी-व्यवसाय हे जगण्यासाठी आवश्यक आहेतच. पण जीवन म्हणजे त्याहून वेगळे काहीतरी आहे. जीवन ही मोठी आश्चर्यकारक गोष्ट आहे - असामान्य, विशाल आणि परिपूर्ण.
आपल्याला जर फक्त उपजीविकेपुरतेच शिकवले गेले तर जगण्यातला मूळ उद्देशच नाहिसा होईल.
परीक्षेत उत्तीर्ण होण्यापेक्षाही जीवनाचा उद्देश समजून घेणे अधिक महत्त्वाचे आहे.
तुम्ही शिक्षक असा किंवा विद्यार्थी, आपण स्वतःला शिक्षित करण्याचा आणि शिक्षण देण्याचा उद्देश कोणता हे विचारले पाहिजे.
आयुष्य म्हणजे काय ? आयुष्य ही असामान्य गोष्ट नाही का ? पक्षी, पशु, फुले, बहरलेले वृक्ष, आकाश, तारका, नद्या-पवर्त इ. सर्वामध्ये जीवन सामावलेले आहे. जगणे म्हणजे गरिबी आणि श्रीमंती यांच्यातील संघर्ष, जीवन म्हणजे जाती-वर्ण-गट, राष्ट्रे यांच्यात चाललेला सततचा संघर्ष, ध्यानसाधना म्हणजे जीवन.
आयुष्य म्हणजे धर्म. जीवन म्हणजे मनात चाललेल्या घडामोडी-ईर्ष्या, महत्त्वाकांक्षा, भाव-भावना, भीती, तृप्तता आणि उतावळेपणा इत्यादी. हे सगळे आणि याहून अधिक बरेचसे म्हणजे जीवन. बहुतेक वेळा यातले थोडेसेच जाणून घेण्यास आपण तयार असतो.
कुठली तरी परीक्षा आपण उत्तीर्ण होतो, मग एखादी नोकरी करतो, मग लग्न करतो, मग मुलं वगैरे होतात आणि नंतर आपण एखाद्या यंत्राप्रमाणे वागू लागतो.
आपल्यामध्ये भीती, उतावळेपणा आणि आयुष्याबद्दल उत्कंठा खूप प्रमाणात असते. तर मग जीवनाचा संपूर्ण व्यवहार समजून घेणे हे शिक्षणाचे खरे उद्दिष्ट असायला हवे.
की परीक्षेपुरते स्वतःला तयार करून घेऊन उत्तम नोकरी मिळवणे हे उद्दिष्ट असायला हवे.?
माणूस किंवा स्त्री म्हणून मोठे झाल्यावर आपण काय व्हायला हवे किंवा काय करायला हवे ?
बहुतेक वेळा मुलामुलींची लग्ने होतात आणि तुम्ही कुठे आहात हे कळण्याआधीच तुम्ही माता-पिता झालेले असता. नंतर वाढत्या कौटुंबिक जबाबदाऱ्यांमुळे आपल्या कामात किंवा घरकामात स्वतःला वाहून घेता. यालाच जीवन म्हणायचे काय? हा प्रश्न तुम्ही स्वतःला विचारायला नको का ?
तुमची आर्थिक परिस्थिती चांगली असेल, तुमचे वडील तुम्हाला चांगल्या नोकरीवर किंवा कामधंद्याला लावून देत असतील तर तुमचं लग्नही छान होईल; पण त्यातही तुमच्या स्वतःच्या कर्तृत्वाचा अपव्यय होतोच.
जीवनातल्या सगळ्या बारकाव्यांचा, जीवनाचे अप्रतिम सौंदर्य, त्यातली सुख-दुःखे यांचे मर्म जर कळत नसेल तर त्या शिक्षणाचा काय उपयोग?
तुम्ही पदव्या मिळवाल, नोकरी मिळवाल, पण नंतर काय? जर तुमचं मन बोजड, थकलेलं आणि मूर्खपणाने भरलेलं असेल तर शिक्षणाचा उपयोग काय?
तुम्ही जर तरुण आहात तर तुम्ही हे समजून घ्यायला नको का की आयुष्य कशासाठी असतं? तुमच्यातल्या बुद्धिमत्तेला अधिक धारदार बनवणे आणि वर विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे मिळवण्याचा प्रयत्न करणे हे शिक्षणाचे कार्य असायला नको का ?
बुद्धिमत्ता म्हणजे काय ? बुद्धिमत्ता म्हणजे मुक्त विचारांचे, निर्भयपणे, कुठल्याही साचेबद्ध पद्धतीशिवाय आपण सत्य शोधून काढण्यासाठी केलेले आकलन. पण आपण बुद्धिमान आहोत की नाही याबद्दल तुम्ही स्वतःच साशंक असता.
महत्वाकांक्षेचा कोणताही प्रकार पारलौकिक किंवा ऐहिक तुमच्यात अस्वस्थता निर्माण करीत असतो. त्यामुळे महत्वाकांक्षेने तुम्ही सरळ, साधे अर्थातच बुद्धिमत्तापूर्ण व्यक्तिमत्व तयार करू शकत नाही.
निर्भय वातावरणात तरुणांनी स्वतःला घडविणे फार आवश्यक आहे. आपण जसजसे मोठे होत जातो, तसतसे वेगवेगळे भयगंड निर्माण होत राहतात.
जगण्याची भीती, नोकरी जाण्याची भीती, परंपरांची भीती, शेजारी किंवा नवरा किंवा बायको काय म्हणेल याची भीती, मरणाची भीती; यातली एखादी किंवा अनेक प्रकारची भीती प्रत्येकाच्या मनात ददलेली असते. जेथे भय आहे तेथे प्रज्ञा नाही.
जगण्याचा खरा अर्थ शोधण्याकरिता स्वातंत्र्य आवश्यक आहे.
आयुष्य खरोखरीच सुंदर आहे. त्याची समृद्धी, गहनता आणि अद्वितीय मनोहारी रूप तुम्हाला तुम्ही अनेक प्रस्थापित गोष्टींना विरोध केल्याशिवाय कळणारच नाही.
संघटित धर्म, रूढी, परंपरा, सध्याचा समाज या सगळ्यांच्या विरुद्ध जाऊन विचार केल्यावर सत्य काय आहे ते कळेल.
अनुकरण करणे नव्हे तर शोधून काढणे हे शिक्षणाचे कार्य आहे. तुमचे पालक आणि तुमचे शिक्षक काय सांगतात ते खरे आहे असे मानणे सोपे आहे.
अस्तित्वात असलेल्या गोष्टींवर विश्वास ठेवणे सोपे. पण ते जगणे नव्हे. तुमच्यासाठी सत्य काय आहे ते जाणू घेणे म्हणजे जगणे. तुम्ही स्वतंत्र विचारांचे असलात तरच हे करू शकाल.पण तुम्हाला असे करण्यास कुणीही प्रोत्साहित करणार नाही. देव काय आहे, ते तुम्ही शोधून काढण्याचा प्रयत्न कराल तर विरोध होईल. कारण त्यावेळी तुम्ही असत्याच्या विरोधात उभे असाल.
तुमच्या पालकांना आणि समाजाला तुमची सुरक्षितता महत्त्वाची वाटत असते. सुरक्षित राहणे म्हणजेच इतरांचे अनुकरण करणे आणि म्हणजेच भयग्रस्त राहणे होय.
तुम्ही, तुमच्या शिक्षकांनी आणि शिक्षणतज्ज्ञांनी देखील भयमुक्त वातावरणात स्वतंत्रपणे विचार करणे आवश्यक आहे.
भयमुक्त वातावरण तयार करणे सोपे नाही, पण ते व्हायला हवे. कुठल्याही परंपरागत विचारांची, राजकीय पक्षांची, त्यांच्या विचारांची, धर्माची, रूढींची बांधीलकी किंवा गुलामी न स्वीकारता स्वतंत्रपणे विचार करायला हवा. या जगात न थांबणारे अनेक संघर्ष चालू आहेत. राजकारणी लोकांना सत्ता टिकवून ठेवायची असते.
हे जग वकिलांचे, पोलिसांचे, सैनिकांचे, महत्त्वाकांक्षी स्त्री-पुरुषांचे आहे. यात सगळ्यांनाच आपले स्थान मिळवायचे आणि टिकवायचे आहे. इथे तथाकथित संत आणि गुरू आहेत - त्यांचे शिष्य आहेत. त्यांनाही सत्ता आणि स्थान हवे आहे - इथे नाहीतर पुढल्या जन्मी. हे जग वेडे आहे, पूर्णपणे गोंधळलेले.
इथे साम्यवादी भांडवलदारांशी भांडतात, समाजवादी त्या दोघांशीही भांडतात आणि प्रत्येकजण दुसऱ्या कुणाशीतरी संघर्ष करीत असतो.
कशासाठी, तर सुरक्षित स्थानासाठी, सत्ता किंवा सुखासाठी. परस्परविरोधी धर्मश्रद्धांनी हे जग दुभंगले आहे.
जाती, वर्ग, वर्ण, श्रेष्ठ-कनिष्ठत्व या जाणिवांनी सर्वत्र गोंधळ माजला आहे.
अशा या जगात तुम्हाला शिकून स्वतःला जगण्यायोग्य सिद्ध करायचे आहे.
जगाच्या ह्या चौकटीत स्वतःला निश्चित करावेसे तुम्हाला वाटते आणि तुमच्या पालकांनाही. या अशा गोंधळलेल्या समाजात स्वतः गोंधळून जाऊन तुम्हाला जगायचे आहे की पूर्ण स्वातंत्र्य मिळवून दुसरा एक निकोप समाज घडवायचा आहे.. ?
हे भविष्यात नाही तर आत्ताच करायचे आहे. नाहीतर सगळं काही नष्ट होईल. आत्ताच आपल्याला अशी पावले उचलावी लागतील की ज्यामुळे तुम्हाला सत्य शोधून काढता येईल आणि आपल्या बुद्धिसामर्थ्याचा उपयोग करून घेता येईल.
तुम्हाला हे जग नीट समजून घ्यायचे आहे. तुमच्या अंतर्मनात खोलवर संघर्ष चालू आहे. तुम्ही सतत संघर्षरत आहात आणि जे सतत संघर्षरत असतात तेच सत्य शोधून काढू शकतात. जे प्रवाहासोबत, परंपरांसोबत वाहत जातात त्यांना हे शक्य नसते.
त्यासाठी तुम्हाला सतत निरीक्षण, सतत अभ्यास करावा लागेल. मग तुम्हाला सत्य, ईश्वर, प्रेम शोधता येईल. जर मनात कुठली भीती असेल तर तुम्हाला शोध घेणे, निरीक्षण करणे, शिकणे जमणार नाही. तुमच्यात जागृती येणार नाही.
म्हणून शिक्षणाचे कार्यकरणे हे होय. ज्यामुळे मानवी विचार, मानवी संबंध आणि प्रेम यांच्याआड येणाऱ्या सर्व गोष्टींचा बिमोड करणे हे होय..
-लेख संकलन आणि संपादन:
विद्यार्थी मित्र प्रा. रफीक शेख
डॉ. ए.पी.जे अब्दुल कलाम विद्यार्थी फाउंडेशन, परभणी.
Post a Comment