जन्म: 5 मे 1818 मृत्यू:14 मार्च 1883
कार्ल मार्क्स यांच्या काही गोष्टी ज्यामुळे सामान्यांचं आयुष्य झालं सोपं..!!
आज त्यांची 200 वी जयंती आहे. कार्ल मार्क्स यांच्या विचारांचा अभ्यास अनेक अंगांनी झाला आहे. त्यांनी सांगितलेल्या तत्त्वांबद्दल मत-मतांतरं आहेत, पण एक गोष्ट आपल्याला कबूल करावी लागेल की या शतकावर प्रभाव असणाऱ्या प्रमुख विचारवंतांपैकी ते एक आहेत.
मार्क्स यांच्या संकल्पना सोशल इंजिनिअरिंगसाठी एक प्रेरणास्रोत म्हणून बघितल्या गेल्या. पण त्याचे समाजावर गंभीर परिणाम झाले. जेव्हा त्यांनी दिलेल्या सिद्धांतांचा संबंध सर्वंकषवाद, पारतंत्र्य आणि नरसंहाराशी जोडला गेला तेव्हा मार्क्स यांच्याबद्दल अनेक गैरसमज समाजात पसरले आणि त्यांना मानणारे आणि न मानणारे असे दोन गट पडले.
पण मार्क्स यांच्या विचारांमुळे मानवी जीवनात सकारात्मक बदल घडले ही बाब आपल्याला नाकारता येणार नाही.
मार्क्स यांनी समाजाला काही चांगल्या गोष्टी देखील दिल्या आहेत. अतिश्रीमंतांचा एक गट जगाच्या अर्थव्यवस्थेवर नियंत्रण ठेवतो, त्याचप्रमाणे भांडवलशाही अर्थव्यवस्था अस्थिर आहे. अर्थव्यवस्थेवर वारंवार येणाऱ्या संकटांमुळे कधीकधी अर्धमेलं व्हायला होतं आणि औद्योगिकीकरणामुळे मानवी नातेसंबंध दृढ होतात अशा अनेक चांगल्या गोष्टी त्यांनी मांडल्या.
पण अजूनही मार्क्स यांनी काय केलं याबद्दल खात्री होत नसेल तर 21 व्या शतकात त्यांनी नक्की काय केलं हे जाणून घेऊ या.
1) शाळा ही बालकांची योग्य जागा
हे तसं अगदीच स्वाभाविक आहे नाही का? पण 1848 साली कार्ल मार्क्स त्यांचा कम्युनिस्ट पक्षाचा अजेंडा लिहित होते तेव्हा बालमजुरी अगदी नित्याची गोष्ट मानली जात होती.
'आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेनं' (ILO) दिलेल्या 2016 च्या आकडेवारीनुसार दहापैकी एक बालक हा बालमजूर आहे. मात्र आज अनेक मुलांनी फॅक्टरी सोडून शाळेचा रस्ता धरला याचं बऱ्यापैकी श्रेय मार्क्स यांना जातं.
The Great Economists: How Their Ideas Can Help Us Today या पुस्तकाच्या लेखिका लिंडा युआह म्हणाल्या, "मार्क्स आणि एंगलच्या 1848 सालच्या जाहीरनाम्यात सरकारी शाळांमधल्या मुलांना मोफत शिक्षण आणि कारखान्यातील बालमजुरीवर बंदी हा दहा मुद्द्यांपैकी एक मुद्दा होता."
मार्क्स आणि एंगेल यांनी लहान मुलांच्या शिक्षणाचा पुरस्कार केला. "19व्या शतकाच्या शेवटी लहान मुलांचं शिक्षण आणि फॅक्टरीत लहान मुलांना काम करण्यापासून रोखणं हा महत्त्वाचा विषय होता. त्यात मार्क्सच्या भूमिका एकरूप झाल्या." असं त्या पुढे म्हणाल्या.
2) फावल्या वेळेची तरतूद
24 तास आणि सातही दिवस कामच करत राहणं तुम्हाला आवडत नाही ना? लंच ब्रेकबद्दल तुमचं काय मत आहे? तुम्हाला रिटायर होऊन उतारवयात पेन्शन घ्यायला आवडेल का? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं 'हो' अशी असतील तर तुम्ही मार्क्सचे आभार मानायलाच हवेत.
लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समधले प्राध्यापक माईक सॅवेज म्हणतात, "जेव्हा तुम्ही खूप वेळ काम करता तेव्हा तुम्ही तुमचे नसताच. तुम्ही तुमच्या आयुष्यासाठी जबाबदार नसता. भांडवलशाही समाजात टिकण्यासाठी पैशाच्या बदल्यात मजुरी ही एकच गोष्ट कशी विकतात याबाबत मार्क्स यांनी विपूल प्रमाणात लेखन केलं. अशी परिस्थिती अनेकदा अव्यवहार्य असते असंही मार्क्स यांचं मत आहे."
या परिस्थितीमुळे शोषण होतं आणि दुरावलेपण वाढीला लागतं. त्यामुळे साध्या माणूसकीपासून दुरावल्याची भावना निर्माण होण्यास मदत होते.
आपल्याबरोबर असलेल्या कामगारांसाठी मार्क्सला आणखी बऱ्याच गोष्टी हव्या होत्या. आपण स्वतंत्र, सर्जनशील व्हावं अशी मार्क्स यांची इच्छा होती. सगळ्यांत महत्त्वाचं म्हणजे आपल्या वेळेवर आपलं नियंत्रण हवं असं त्यांना वाटायचं.
"आपण काय करतो यावरून आपल्या कामाचं मोजमाप होऊ नये, असं मार्क्सचं म्हणणं होतं. एक असं आयुष्य असावं जिथं आपल्याला हवं तसं जगता यावं, असं मार्क्स यांचं म्हणणं होतं. तसं पाहायला गेलं तर सध्या प्रत्येकालाच आपल्या मनासारखं जगावं वाटतं. म्हणजेच मार्क्स यांनी जे सांगितलं तेच अनेकांना करावं वाटतं असं आपण म्हणू शकतो." असं सॅवेज यांनी सांगितलं.
"मार्क्स यांचं एक सुप्रसिद्ध वाक्य आहे, ते म्हणतात, असं आयुष्य हवं जिथं आपण सकाळी शिकार, दुपारी मासेमारी, संध्याकाळी गुरं राखणं आणि रात्री फक्त गप्पा झोडणं किंवा वादविवाद घालणं करू शकू. मार्क्स यांचा भर स्वातंत्र्य, मुक्ती आणि परकेपणाविरोधात लढा या गोष्टींवर होता," असं सॅवेज सांगतात.
3) कामातून मिळणारं समाधान महत्त्वाचं
मानवाला सर्वांत जास्त आनंद निर्मितीतून मिळतो. आपण तयार केलेल्या वस्तू पाहायला कुणाला आवडणार नाही. लोक आपलं प्रतिबिंब त्या वस्तूंमध्ये पाहतात.
आपण करत असलेल्या कामामुळे आपल्याला सर्जनशील होण्याची तसंच आपल्यातलं सर्वोत्तम देण्याची संधी मिळायला हवी. बुद्धी असो वा कौशल्य त्यामध्ये प्रगती होऊन आपली वाटचाल एक चांगला माणूस होण्याकडं व्हावी अशी मानवाची स्वाभाविक इच्छा असते.
"जर तुमची नोकरी चांगली नसेल किंवा ते काम तुमच्या मनाविरुद्ध असेल तर तुम्हाला नैराश्य येईल. कदाचित परकेपणाची भावनासुद्धा बळावेल," हे शब्द सिलिकॉन व्हॅलीतील एखाद्या मोटिव्हेशनल गुरूचे नाहीत तर 19 व्या शतकातल्या एका व्यक्तीचे आहेत. ती व्यक्ती म्हणजे कार्ल मार्क्स.
1844 साली मार्क्स यांनी इकोनॉमिक अॅंड फिलॉसॉफिक मॅनुस्क्रिप्ट नावाचं एक पुस्तक लिहिलं होतं. सुखी आणि निरामय आयुष्य हवं असेल तर आपण काम करतो त्यातून समाधान मिळणं आवश्यक आहे असा विचार मांडणाऱ्या विचारवंतांपैकी कार्ल मार्क्स एक होते.
आपण इतका वेळ कामाच्या ठिकाणी घालवतो त्यामुळे त्यातून आपल्याला काहीतरी आनंद मिळायला हवा असं त्यांचं म्हणणं होतं.
तुम्ही ज्या गोष्टीची निर्मिती केली आहे, त्यातलं सौंदर्य पाहण्यातून आपल्याला कामाचं समाधान मिळू शकतं आणि पर्यायानं त्यातून माणसाला आनंद मिळू शकतो असं मार्क्स यांना वाटत असे.
वेग, वाढलेलं उत्पादन आणि नफा ही भांडवलशाहीची अविभाज्य अंगं आहेत. त्यामुळे एकाच प्रकारच्या कामात तुम्ही निपुण व्हावात असं भांडवलदारांना वाटतं. त्यामुळं काम साचेबद्ध होतं. समजा स्क्रूला आट्या पाडण्याचं काम तुम्ही दिवसातून हजारवेळा केलं आणि अनेक दिवस हेच काम करत राहिलात तर त्या कामातून आनंद शोधणं हे कठीण होऊन जाईल असं मार्क्स म्हणतात.
4) बदलांचे पुरस्कर्ते व्हा:
जर आपल्या समाजात काही चुकीचं घडत असेल, काही अन्याय होतोय, असमानता आहे असं तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही आवाज उठवता, आंदोलन करता आणि बदलासाठी प्रयत्न करता.
भांडवलशाही म्हणजे 19 व्या शतकात ब्रिटनमध्ये पिचलेल्या कामगारांसाठी एक प्रकारची बंदीशाळा होती, पण कार्ल मार्क्सचा बदलांवर विश्वास होता. इतरांनी देखील या तत्त्वावर विश्वास ठेवावा असं आग्रह त्यांनी धरला. ही कल्पना पुढे लोकप्रिय झाली.
समलिंगी लोकांविरुद्ध भेदभाव, वर्णभेद आणि विशिष्ट वर्गाच्या वर्चस्वाच्या विरुद्ध कायदा अशा अनेक गोष्टींविरुद्ध संघटित लढा दिल्यानं अनेक देशांच्या सामाजिक परिस्थितीत मोठे बदल झाले.
लुईस नेल्सन हे लंडनमधील 'मार्क्सिझम फेस्टिव्हल'चे एक आयोजक आहेत. "समाजात बदल होण्यासाठी एका क्रांतीची गरज असते. आपण समाज बदलण्यासाठी आंदोलन करतो. त्यामुळेच कामाच्या तासांची संख्या आठवर आणण्यास सामान्य लोकांना यश आलं आहे," असं ते सांगतात.
मार्क्स नेहमीच तत्त्वज्ञ म्हणून ओळखले जातात. पण नेल्सन यांना हा मुद्दा फारसा पटत नाही. "असं म्हटल्यामुळे त्यांनी फक्त तत्त्वज्ञान आणि सिद्धांत लिहिले असं वाटण्याची शक्यता आहे. पण मार्क्स यांच्या कार्याकडे नीट लक्ष दिलं तर असं लक्षात येईल की ते एक कार्यकर्ते होते. त्यांनी 'इंटरनॅशनल वर्किंगमेन असोसिएशनची' स्थापना केली. संप करणाऱ्या गरीब कामगारांच्या बाजूने ते उभे होते."
"त्यांची "Workers of the world unite" ही घोषणा म्हणजे क्रांतीची नांदी होती. आपल्या आयुष्यात बदल व्हावा म्हणून लढावं वाटणं म्हणजेच कार्ल मार्क्स यांच्या विचारांचा वारसा पुढे नेण्यासारखं आहे.
क्रांती करणं हे मार्क्स यांनी दिलेल्या सिद्धांतावर आधारितच आहे. तुम्ही स्वतःला मार्क्सवादी म्हणून घ्या अथवा नको पण जी व्यक्ती न्याय मिळण्यासाठी आंदोलन करत आहे ती एका अर्थानं त्यांचेच विचार पुढे नेत आहे, असं नेल्सन म्हणतात.
"स्त्रियांना मतदानाचा अधिकार कसा मिळाला?" असा प्रश्न नेल्सन पुढे विचारतात.
"संसदेत असणाऱ्या पुरुषांना त्यांची परिस्थिती पाहून वाईट वाटलं आणि त्यांनी महिलांना मतदानाचे अधिकार दिले असं झालं नाही.
तर स्त्रिया त्यांच्या हक्कांसाठी लढल्या आणि त्यांना ते अधिकार मिळाले. आपल्याला वीकेंड कसा मिळाला? कारण ट्रेड युनिअननं संप केला तेव्हा आपल्याला साप्ताहिक सुटी मिळणं सुरू झालं."
सामाजिक सुधारणांवर मार्क्सवादी विचारांचा पगडा होता असं आपल्याला दिसून येतं. या संदर्भात ब्रिटनमधील कंझर्व्हेटिव्ह नेते क्विंटिन हॉग यांनी 1943 साली केलेलं वक्तव्य अगदी समर्पक ठरतं. ते म्हणतात, "जर ते (कामगार) सुधारणा मागत असतील तर त्या आपण दिल्या पाहिजेत अन्यथा ते क्रांती करतील."
5) सरकार आणि उद्योजकांचं नातं काय असतं ?
मार्क्स यांनी आपल्याला सरकार आणि मोठे उद्योग यांच्यामध्ये असलेल्या साटंलोट्याबाबत आधीच सावध केलं होतं. त्याचवेळी माध्यमांवर बारीक लक्ष ठेवा असं देखील त्यांनी सांगितलं होतं.
सरकार आणि मोठ्या कंपन्या यांच्यातल्या हितसंबंधांबद्दल तुम्हाला काय वाटतं?
चीन आणि गुगलचे एकमेकांमध्ये हितसंबंध गुतले आहेत असं कळल्यावर तुम्हाला अस्वस्थ वाटतं का? युजर्सची वैयक्तिक माहिती निवडणुकीवर प्रभाव टाकण्यासाठी वापरणाऱ्या फेसबुकबद्दल तुम्हाला काय वाटतं?
मार्क्स आणि एंगेल्स 19 व्या शतकात याबद्दल आक्षेप नोंदवत होतेच की. अर्थातच त्याळी सोशल मीडिया नव्हता. NYU मधले रिसर्च फेलो आणि बुनोज एरिस विद्यापीठातले क्रिमिनॉलॉजीचे प्राध्यापक वॅलेरिया वेघ विस म्हणाले की हा धोका ओळखणारे ते दोघंच पहिले होते.
"मार्क्स आणि एंगेल्स यांनी सरकार, बँक, बिझनेस, वसाहतवाद यांच्यात असलेल्या सहकार्याच्या रचनेचा अभ्यास केला. हा अभ्यास इतका सखोल होता की त्यांनी या अभ्यासाठी 15 व्या शतकाचे संदर्भ देखील त्यांनी शोधले" असं ते सांगतात.
यातून निष्कर्ष काय निघाला? वसाहतवादाला उत्तेजन देण्यासाठी गुलामगिरीला चालना देणे, एखादी पद्धत निषेधार्ह असली आणि ती सरकारसाठी किंवा उद्योगासाठी उपयुक्त असेल तर कायदा त्याच बाजूचा होतो.
प्रसारमाध्यमाच्या ताकदीबद्दल मार्क्स यांनी केलेली निरीक्षणं 21 व्या शतकातसुद्धा तंतोतंत खरी ठरत आहेत.
"जेव्हा जनतेच्या मताच्या प्रभावाचा मुद्दा येतो त्यावेळी प्रसारमाध्यमांच्या ताकदीचं महत्त्व मार्क्स यांना कळलं होतं. हल्ली आपण फेक न्यूज, मीडिया याबद्दल हिरीरीनं बोलत असतो. पण मार्क्सला हे आधीच कळलं होतं," वेघ विस पुढे सांगतात.
"त्यावेळी छापून येणाऱ्या लेखांचा त्यांनी अभ्यास केला आणि त्यातून एक निष्कर्ष काढला. छोट्या छोट्या गुन्ह्यांचा आणि गरीब लोकांचा समावेश असलेल्या गुन्ह्याचं वार्तांकन मोठ्या प्रमाणात होतं. पण राजकीय व्यक्तींचा आणि पांढरपेशी व्यक्तींचा समावेश असलेल्या गुन्ह्याकडे फारसं लक्ष दिलं जात नाही" असंही ते पुढे म्हणाले.
समाजात फूट पाडण्यासाठी प्रसारमाध्यामांची मदत घेतली जाते. "आयरिश लोक इंग्रजांच्या नोकऱ्या हिरावून घेत आहेत, कृष्णवर्णीय आणि श्वेतवर्णियांमध्ये फूट पाडणं, तसंच पुरूष विरुद्ध स्त्रिया, स्थानिक विरुद्ध स्थलांतरित अशी फूट पाडणं असे प्रकार होतात. जेव्हा गरीब वर्ग आपापसात लढतो त्यावेळी शक्तिशाली लोकांकडे कोणाचंच लक्ष नसतं," वेघ विस सांगतात.
"आणखी एक गोष्ट नमूद करावीशी वाटते ती म्हणजे, मार्क्सवाद भांडवलशाहीच्या आधी आला. हा दावा थोडा विचित्र वाटू शकतो, पण हे लक्षात घ्या जेव्हा जगाला भांडवलशाही माहीत नव्हतं तेव्हा जगाला मार्क्सवाद माहिती होता." असं युआह सांगतात.
The Great Economists: How Their Ideas Can Help Us Today या पुस्तकाच्या लेखिका लिंडा युआह सांगतात की भांडवलशाही हा शब्द अॅडम स्मिथ यांचा नाही. स्मिथ यांना अर्थशास्त्राचं जनक मानलं जातं. त्यांनी बाजारतले अदृश्य हात ही संकल्पना पुढे आणली, पण वॅनिटी फेअरचे लेखक विलिअम मेकपिस थॅकरे यांच्या एका कादंबरीत 'भांडवला'चा उल्लेख आहे.
"भांडवलाचा मालक असा शब्दप्रयोग थॅकरे यांनी केला होता," असं युआह म्हणतात.
या सगळ्या संकल्पना आर्थिक संदर्भात वापरणारे कार्ल मार्क्स हे पहिलेच आहे. 1867 साली लिहिलेल्या दास कॅपिटलमध्ये याचा उल्लेख पहिल्यांदा करण्यात आला होता. हा शब्द मार्क्सवादाला विरुद्धार्थी शब्द म्हणून वापरला जातो. त्यामुळे एका अर्थानं मार्क्सवाद हा भांडवलशाहीच्या आधी आला होता, असं आपण म्हणू शकतो."
-लेख संकलन आणि संपादन:
विद्यार्थी मित्र प्रा. रफीक शेख
Post a Comment