🎓पुस्तक समीक्षा : इस्लाम आणि सहिष्णुतेचे भवितव्य..
इंग्लंड स्थित असलेलें सॅम हॅरिस ( मानवी हक्क अभियान आणि एक सामाजिक कार्यकर्ते, पत्रकार ) आणि माजिद नवाझ ( संस्थापक सदस्य - 'क्विलिअम ' इस्लामिक संशोधन संस्था ) यांच्यातल्या चर्चेचें परीलेखन मराठीत करुणा गोखले यांनी अनुवादित केलेलं पुस्तक साधना प्रकाशनानें प्रकाशित केलेलं पुस्तक 'मुस्लिम सत्यशोधक' मंडळानं मला सदिच्छा भेट दिली..
बऱ्याच दिवसांनी हे पुस्तक हाती घेतलं आणि एका अडीच तासाच्या सत्रात हे पुस्तक आज पूर्ण केलं आहे, इस्लामिक जगतात हे पुस्तक प्रबोधन पर्व नक्कीच आणेल ह्याचा विश्वास बाळगतो मित्रांनो..
इस्लाम आणि सहिष्णुतेचे भवितव्य..✍🏻
हॅरिस आणि नवाझ या दोघांची विचारधारांच्या बाबतीत कोणे एके काळी 'दोन ध्रुवांवर दोघे आपण' अशी अवस्था होती. हॅरिस निरीश्वरवादी, अमेरिकन, गोरे आणि ख्रिश्चन तर नवाझ पाकिस्तानी कौटुंबिक वारसा असलेले ब्रिटनचे नागरिक, धर्माने मुस्लिम आणि कट्टरतावादी. हॅरिस एक यशस्वी, उच्चशिक्षित, सुस्थित, व्यासंगी प्राध्यापक, तर नवाझ वयाच्या सोळाव्या वर्षी शाळा-कॉलेज सोडून कट्टर इस्लामवादींच्या प्रभावाखाली येऊन जगभर अतिरेकी संघटनेची सदस्यसंख्या वाढवण्याच्या उद्योगाला लागलेला आणि त्यापायी इजिप्तमध्ये तुरुंगाची हवा खात बसलेला विशीतला तरुण. पण Amnesty International ही संस्था त्याच्या कोवळ्या वयाकडे बघून त्याला पंखाखाली घेते, त्याचे प्रदीर्घ काळ समुपदेशन करून त्याला कट्टरतावादाच्या विळख्यातून सोडवते आणि पुनश्च उच्च शिक्षण घेण्यास उद्युक्त करते. अशा युवकाबरोबर सॅम हॅरिस का सुसंवाद साधतात असा आपल्याला प्रश्न पडू शकतो. त्याचे उतर आहे नवाझ यांच्यामध्ये घडून आलेल्या हृदयपरिवर्तनात.
उच्च शिक्षण पूर्ण करून नवाझ यांनी इंग्लंडमध्ये क्विलिअम ही संस्था स्थापन केली आहे व त्याद्वारे ते इस्लाममधील आणि मुस्लिमांमधील कट्टरता दूर व्हावी या दृष्टीने संघटित प्रयत्न करत आहेत.
उदारमतवाद, मानवतावाद, स्त्री- पुरुष समानता, व्यक्तिस्वातंत्र्य यांना इस्लाममध्ये स्थान मिळावे, यासाठी ते झगडत आहेत. त्यांच्या या कार्याला पाठिंबा देण्यासाठी सॅम हॅरिस त्यांच्याबरोबर खुली चर्चा करत आहेत. या चर्चेत इस्लाममधील कोणत्या संकल्पना मुस्लिमेतरांना अनुदार किंवा कडव्या वाटतात, हे कुठलाही आडपडदा न ठेवता ते नवाझ यांच्यासमोर मांडतात.
ते करताना अपराधीही वाटून घेत नाहीत आणि इस्लामला आरोपीच्या पिंजऱ्यात उभेही करत नाहीत. त्यावर नवाझसुद्धा स्वसमर्थनाचा पवित्रा न घेता चर्चा पुढे नेतात; बाजू उलटवण्याचा प्रयत्न करत ख्रिश्चन धर्मावर प्रतिहल्ला चढवत नाहीत. 'इस्लाम अँड द फ्यूचर ऑफ टॉलरन्स' हे पुस्तक म्हणजे हॅरिस आणि नवाझ यांनी केलेल्या चर्चेचे शब्दशः.. परिलेखन आहे.
मला या चर्चेची चार वैशिष्ट्ये महत्त्वाची वाटतात-
1. आपल्यावर मुस्लिमद्वेषाचा आरोप होईल याची तमा न बाळगता हॅरिस इस्लाममधील त्यांना काय खटकते आणि जे खटकते,ते उदारमतवादाच्या कसे विरोधात आहे, हे स्पष्टपणे मांडतात.
2.हॅरिस ख्रिश्चन धर्मातील विसंगतींवरसुद्धा बोट ठेवतात.
3.नवाझ त्यांच्यावर कुठलेही आरोप न करता, मुस्लिमांच्या रोषामागची आणि इस्लामच्या अतिरेकीकरणाची कारणे शोधू बघतात. पण ते करताना ख्रिश्चन धर्मीयांनीसुद्धा कसे खूप काही चुकीचे केले आहे, याची यादी देत बसत नाहीत.
4. इस्लामचे इतर धर्मांशी वितुष्ट का आले, याच्या इतिहासात फार काळ न अडकता यापुढे सर्वच धर्मांनी उदारमतवाद, परस्पर- सहकार्य, मानवतावाद, व्यक्तिस्वातंत्र्य, मूलभूत मानवी हक्कांचे पालन आणि स्त्री-पुरुष समानता यांना किमान सामायिक मूल्ये मानून आपापल्या धर्मांत ती अंतर्भूत करावीत, असे हॅरिस आणि नवाझ ठामपणे प्रतिपादन करतात.
या पुस्तकात एक ख्रिश्चन धर्मीय एका मुस्लिम व्यक्तीसोबत इस्लामची चिकित्सा करतो आहे. साहजिकच त्यांच्या चर्चेत मुख्यत्वे इस्लाम आणि थोड्या प्रमाणात ख्रिश्चन धर्मांचे संदर्भ येतात. पण त्यांच्या चर्चेमागची भावना सर्वच धर्मीयांना उपयुक्त ठरावी.
भिन्न धर्मीय, भिन्न वंशीय किंवा भिन्न भाषिक समूहाविषयी अविश्वास आणि भीती वाटणे, ही उत्क्रांतीमधील आदिम मानवी भावना आहे. तीमागे अज्ञाताचे भय आणि स्वसंरक्षणाची प्रेरणा होती. म्हणूनच मानवाचा इतिहास हा भिन्न धर्मविचारांमधील, प्रदेशांमधील आणि भाषांमधील संघर्षाचा इतिहास राहिलेला आहे. पण आता उत्क्रांतीचा तो टप्पा आपण कधीच मागे टाकला आहे.
आज, माहिती- विस्फोटाच्या युगात, पृथ्वीतलावरील कुठलीच भाषा, वंश किंवा धर्म मानवाने आदिमतेपासून सुरू केलेला आणि आधुनिकतेच्या दिशेने जाणारा हा प्रवास अधिक सुकर, सुखकारक आणि सौहार्दपूर्ण व्हावा असे वाटत असेल, तर भिन्न धर्मीयांमध्ये निकोप चर्चा होणे आवश्यक आहे.
अशी चर्चा शक्य आहे, हे या पुस्तकातून फार प्रभावीपणे समोर येते.
भारतात अशा चर्चांची विशेष आवश्यकता आहे, कारण आपण स्वत:ला धर्मनिरपेक्ष, लोकशाही राष्ट्र मानतो आणि विविधतेत एकता हे स्वतःचे वैशिष्ट्य समजतो. केवळ भारतातच नाही, तर जगात सर्वत्र विविध धर्म, पंथ, जाती, भाषिक समूह यांमध्ये शांतिपूर्ण सहजीवन शक्य करायचे असेल, तर नवाझ आणि हॅरिस यांमध्ये झालेल्या चर्चेपासून आपणही प्रेरणा घ्यायला हवी.
मुळात इस्लाम धर्म कट्टर नाहीये, त्याची मुळ शिकवण ही जागतिक स्तरांवर विश्व-बंधुत्व, सामाजिक सुधारणा,वैश्विक मानवतावाद, एक ईश्वर उपासना, इस्लामच्या मुळ 5 आज्ञाचं पालन, इस्लामिक जीवन पद्धती,ज्ञान-संपादनुक (ईक्रा ) ई.. आदी सह पैगंबरांनीं अरब जगतातल्या केलेल्या सामाजिक सुधारणा आणि त्यातून साधलेली स्थिर भौतिक प्रगती ई.. आदी प्रमाण असताना.. व्यक्तीगत आणि राजकीय स्वार्थानं जागतिक राजकारण तेलानं सदैव तापून ठेवून त्यावर आपल्या पोळ्या भाजून अरब जगतात सदैव अस्थिर वातावरण निर्माण करणाऱ्यांना हा ' इस्लाम आणि सहिष्णुतेचे भवितव्य' हा संवाद निश्चितच ती खरी बाजू समजून देणारा आहे असं मला वाटतं मित्रांनो.
📚आपलाच एक पुस्तक समीक्षक:
#विद्यार्थीमित्र प्रा. रफीक शेख,
डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम विद्यार्थी फाउंडेशन,परभणी.
@मुस्लिम_प्रबोधन_मंच
Post a Comment