🎓 इंजिनिअरिंग प्रवेशाची बदलती दिशा...!
सावधान विद्यार्थी मित्रांनो आणि पालकांनो...
" भूतकाळाच्या मोजपट्टीवर भविष्याचे निर्णय घेणे धोकादायक ठरू शकतात."
इंजिनिअरिंग अभ्यासक्रमाला प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांची खूपच लगबग चालू आहे. बहुतेक सर्व पात्रता परीक्षांचे निकाल हाती पडलेले आहेत. आयुष्याची ध्येयरेषा आणि करिअरची दिशा दोन्ही ठरविण्यासाठी केवळ विद्यार्थीच नाही, तर पालकांचीही घालमेल होत आहे. विविध मार्गदर्शन सत्रं, समुपदेशकांकडे नोंदणी, आपल्या जवळच्या ओळखीच्या संबंधित विषयात कार्यरत असलेल्यांची मतं जाणून घेण्यातच बहुतांश पालक-विद्यार्थ्यांचा वेळ जातो आहे. पण, या सर्व सोपस्कारात आपली मतं, आवड, परिस्थिती, गुणश्रेणी यांच्या आधारावर निर्णय घेताना फारसे कुणी दिसत नाही.
सर्व जण केवळ काही गृहीतके आणि क्रेझ यांच्या अनुषंगाने अभियांत्रिकी शिक्षणाकडे पाहात आहेत. खरंतर सध्या अभियांत्रिकी शिक्षण आणि व्यवस्था यात नव्या शैक्षणिक धोरणामुळे बरीच सुधारणा, बदल झालेले जाणवतात. एका निःस्पृहपणे अवलोकनाची आवश्यकता ओळखून या लेखाचा आपण प्रपंच करत आहोत.
आज घडीला प्रवेशनिश्चिती करताना ओढा पालकांचा विवक्षित अभ्यासक्रमांकडेच असतो. उदा. कॉम्प्युटर इंजिनिअरिंग, साहजिकच आहे ते; कारण अनेक वर्षांपासूनचा नोकरी, तुलनात्मक पगार, विविध संधी, परदेशवारी यांसारख्या निकषांमध्ये कॉम्प्युटर इंजिनिअरिंगला चढता भाव मिळायचा, पण, ते भविष्यातही शक्य होईल का? उद्योग क्षेत्रांच्या गरजा बदलत जात आहेत. शिक्षण आणि करिअर, नोकरी यांमधील तफावत वाढत आहे.
अट्टाहासाने एकाच अभियांत्रिकी विद्याशाखेची वाढती मागणी आवश्यकतेपेक्षा जास्त मनुष्यबळनिर्मितीस कारणीभूत ठरत आहे. त्यातून मग उद्योग क्षेत्राची मागणी पडते; तसेच उद्योग क्षेत्र सध्या नवतंत्रज्ञानाच्या अंमलाखाली असून, त्यांच्या गरजा बदलत आहेत.
रोजगार क्षमता वाढविण्यासाठी उद्योगांची गरज ओळखूनच आपल्या करिअरची दिशा ठरवावी, कारण संधी आणि तंत्रज्ञानाचे भविष्य सातत्याने बदलते आहे. आज प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे इंडस्ट्रीमध्ये पाऊल पडण्यासाठी आणखी चार वर्षांचा कालावधी आहे, तोपर्यंत पुलाखालून बरेचसे पाणी वाहून जाते. भविष्यातील संधीचा वेध घेऊन, आपल्या क्षमतेचा आदमास घेऊन आणि तंत्रज्ञानबदलाचा वेग आणि दिशा यांचा अंदाज बांधून आज अभियांत्रिकी विद्याशाखेला आपण प्राधान्य द्यावे, हेच उचित ठरेल.
गमतीचा भाग असा असतो बघा.... दर पाच-सात वर्षांनी अभियांत्रिकी शिक्षणातील विद्याशाखांची मागणी कमी-जास्त प्रमाणात बदलत असते. माहिती तंत्राज्ञानाच्या युगाच्या नांदीबरोबरच साधारणतः नव्वदच्या दशकात अचानक कॉम्प्युटर शिक्षितांची गरज निर्माण झाली. तेव्हा बहुतांश असे शिक्षित कॉम्प्युटर इंजिनिअरिंग मध्येच मिळायचे. साहजिकच त्यांना मिळणारे वेतन, संधी राहणीमान बदलाला कारणीभूत आहेत. त्यावेळी इतर इंजिनिअरिंग विद्याशाखांमध्ये कॉम्प्युटर शिक्षण अगदीच बाल्यावस्थेत होते. योग्य परिसंस्थेच्या आणि प्रोत्साहनाअभावी त्याने नीटसं बाळसं धरलंच नाही.
अशा विद्याशाखांतून मूलभूत अभियांत्रिकीवरच जास्त भर होता, जो आवश्यकही आहेच. त्यानंतरची पिढी कॉम्प्युटरची व्याप्ती पाहातच मोठी झाली आणि अनाहूतपणे या शिक्षणाची वलयांकित क्रेझ त्यांना खुणावू लागली. पण, त्या अनुषंगाने येणाऱ्या पॅकेजमधील आव्हाने अशांच्या खिजगणतीतही नव्हती.
दरम्यानच्या काळात इतर मूलभूत विद्याशाखांतूनही मागणीनुसार कॉम्प्युटर शिक्षण त्या-त्या विद्याशाखेच्या प्रावीण्यासह देण्यात येऊ लागले. लवकरच ते उद्योगाला जास्त भावू लागले आणि मल्टिस्किल्स, मल्टिटास्किंग वाढीला लागून इंटरडिसिप्लिनरीइंजिनिअरिंग नोकरीसाठी प्राधान्यक्रम ठरवू लागली. अभियांत्रिकी शिक्षणातील सर्व भिंती पडून एकच कॉम्प्रिहन्सिव इंजिनिअरिंगची मागणी तो म्हणजे आजचा हा काळ.
आज अभियांत्रिकी शिक्षण कॉम्प्युटर ज्ञानाशिवाय पूर्णच होऊ शकत नाही. कॉम्प्युटर आज कुठल्याही अभियांत्रिकीसाठी केवळ एक साधन म्हणून राहिले आहे. त्यातून एकत्रित अभियांत्रिकी संकल्पना रुजू लागली.
बदलत्या बाजार मागणीनुसार अभ्यासक्रमातही आमूलाग्र बदल होऊ लागले. पारंपरिक दृष्टिकोनाला छेद मिळून नवतंत्रज्ञानावरील अवलंबित्व वाढले, मागणी वाढली.
या मागणीत हार्डवेअर अधिक सॉफ्टवेअर असा मुलामा लागला. अशा तरल परिस्थितीत स्पेशलायझेशन महत्त्वाचे होतेच, पण एकांगी निर्णय कुठेच बसत नव्हते. अशा वेळी 'स्टिक टू दि बेसिक्स' या क्रिकेटमधल्या म्हणीप्रमाणे वागण्याची, निर्णय घेण्याची वेळ आलेली आहे. आधी जसे म्हटले आहे, त्याप्रमाणे कॉम्प्युटर शिक्षण अनिवार्य झाले, पण सर्वस्व नाही.
त्यामुळे मूलभूत इंजिनिअरिंग विद्याशाखा जशा मेकॅनिकल, सिव्हिल, इलेक्ट्रॉनिक्स, इलेक्ट्रिकल, केमिकल यांनी कात टाकली. नव्या युगाचे नवे अभ्यासक्रम घडविले, अर्थात कॉम्प्युटरची अनिवार्यता लक्षात घेऊनच.
यापूर्वी अशी आजच्या काळाची फक्त एकमेव विद्याशाखा होती, ती म्हणजे इन्स्ट्रुमेंटेशन आणि कंट्रोल इंजिनिअरिंग. या नव्या शैक्षणिक बदलांमुळे उद्योगाची मागणी आणि विद्यार्थी मनुष्यबळपुरवठा यांची सांगड बसली. येत्या काळातील नवतंत्रज्ञान एकीकडे रोजगाराच्या संधी हिरावत असतानाच नव्या शतपटींनी जास्त संधी देऊ घालत आहे. एआय, इंडस्ट्रीयल ऑटोमेशन, मशीन लर्निंग, इंडस्ट्री 4.0, आयओटी यांसारख्या तंत्रज्ञानांत प्रामुख्याने मूलभूत इंजिनिअरिंगची गरज भासू लागली.
व्हीएलएसआय तंत्रज्ञानाने कन्झुमर क्षेत्रात आमूलाग्र बदल आणला आहे. सॉफ्टवेअर इन्स्टॉल करण्याऐवजी डेडिकेटेड मशीन्स बनविण्याकडे कल वाढत आहे. त्यांची लोकप्रियताही झपाट्याने वाढतेय. भारत मॅन्युफॅक्चरिंग हब बनण्याच्या मार्गावर आहे.
ऑटोमोबाइल्स, इन्फ्रास्ट्रक्चर, कम्युनिकेशन, प्रोसेसिंग या क्षेत्रांनी वेगळी झळाळी प्राप्त केली आहे. अशा परिस्थितीत वैविध्यपूर्ण अभियांत्रिकी शिक्षणाला समसमान संधी असेल. कॉम्प्युटरसह अभियांत्रिकीची गरज भासतेय. अशावेळी भूतकाळाच्या मोजपट्टीवर भविष्याचे निर्णय घेणे धोकादायक ठरू शकतात.
एकांगी अभियांत्रिकीकडे न जाता मूलभूत अभियांत्रिकीच्या बदलत्या विद्याशाखांकडे वळणे हितावह आहे. तेच मुख्यतः भविष्य आहे.
पारंपरिक विचारसरणी सोडून असामान्य परिस्थितीतील आव्हाने पेलण्यासाठी चोखंदळ बनावे लागेल. मूलभूत अभियांत्रिकी विद्याशाखेत राहणे, हे शहाणपणाचे लक्षण आहे. केवळ क्रेझ म्हणून कॉम्प्युटर इंजिनिअरिंगचे मुख्यत्वे शिक्षण घेणे धोक्याची घंटा असू शकेल.
थोडा समग्र विचार करा आणि मगच शिक्षणात प्रवेश घ्या. हे एकमात्र निश्चित.
अभियांत्रिकी शिक्षणाला पर्याय नाहीच....!
जेव्हा अभियांत्रिकी शिक्षणाची अनिवार्यता जाणवते, तेव्हा दर्जेदार, नामवंत संस्थांमधून शिक्षण घेणे हे अत्यंत गरजेचे बनते; कारण अशा संस्थांमध्ये अनेक मानांकनांच्या प्रक्रिया, सुविधांची उपलब्धता, पीअर सपोर्ट, अनुभवी प्राध्यापक, अभ्यासक्रमाव्यतिरिक्त पूरक उपक्रम यांचा परिणाम शिक्षणाच्या दर्जावर होतो.
आजघडीला केवळ उच्च गुणवत्ता गुणतालिकेत असणे उपयोगी नाही, त्याबरोबरच योग्य त्या कौशल्यांनी प्रगल्भ होणेही तितकेच महत्त्वाचे आहे.
प्रवेश घेण्यापूर्वी?
इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये प्रवेश घेण्यापूर्वी काही महत्त्वाच्या गोष्टींवर विचार करणे आवश्यक आहे:
1. कोर्स आणि शाखा निवड : तुम्हाला कोणत्या शाखेत रुची आणि विशेष आवड आहे हे ओळखा. इलेक्ट्रॉनिक्स, मेकॅनिकल, सिव्हिल, कंप्युटर सायन्स यांसारख्या विविध शाखासह काल सुसंगत बाजारातील मागणी प्रमाणे अभ्यासक्रम उपलब्ध असतात. स्वतःच्या आवडी आणि करिअरच्या दृष्टीने योग्य शाखा निवडा.
2. कॉलेजची मान्यता : कॉलेजचे AICTE (All India Council for Technical Education) आणि संबंधित विद्यापीठाची (UGC ) मान्यता तपासा. मान्यता प्राप्त कॉलेजमधून शिक्षण घेतल्यास तुमच्या प्रमाणपत्राला महत्त्व प्राप्त होईल.
3. सुस्थितीत इमारती आणि सुविधा: कॉलेजच्या इन्फ्रास्ट्रक्चरची गुणवत्ता तपासा. प्रयोगशाळा, वर्कशॉप, लायब्ररी, आणि हॉस्टेलच्या सुविधा महत्त्वाच्या आहेत.
4. फॅकल्टीची गुणवत्ता : कॉलेजमधील फॅकल्टी म्हणजे शिक्षकांची गुणवत्ता आणि अनुभव तपासा. चांगले शिक्षक तुमच्या शिक्षणाची गुणवत्ता ठरवू शकतात.
5. प्लेसमेंट रेकॉर्ड : कॉलेजचे प्लेसमेंट रेकॉर्ड तपासा. कंपन्या कोणत्या येतात, प्लेसमेंट दर किती आहे, आणि त्या विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या पॅकेजेस यांचा अभ्यास करा.
6. इंडस्ट्री कनेक्शन : कॉलेजचे इंडस्ट्रीसोबत असलेले संबंध महत्त्वाचे आहेत. इंडस्ट्री-कॉलेज इंटरॅक्शन, इंटर्नशिप आणि कॅम्पस ड्राइव्स यामुळे करिअरच्या संधी वाढतात.
7. शुल्क आणि शिष्यवृत्ती : कॉलेजची फी स्ट्रक्चर जाणून घ्या आणि तुम्हाला योग्य ती आर्थिक मदत मिळू शकते का हे तपासा. शिष्यवृत्ती उपलब्ध आहेत का, याचीही चौकशी करा.
8. अलुम्नी नेटवर्क (Alumni Network ) : कॉलेजच्या माजी विद्यार्थ्यांचे नेटवर्क किती मजबूत आहे हे तपासा. हे नेटवर्क भविष्यातील करिअरच्या संधींसाठी उपयुक्त ठरू शकते.
9. स्थान आणि वातावरण : कॉलेजचे स्थान आणि परिसर तपासा. शहरात किंवा ग्रामीण भागात असलेले कॉलेज आणि त्यातील जीवनमान तुमच्यासाठी किती सोयीचे आहे, याचा विचार करा.
10. विद्यार्थी जीवन आणि अतिरिक्त-शैक्षणिक कार्यक्रम : विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी अतिरिक्त-शैक्षणिक Activities सुविधा तपासा. सांस्कृतिक कार्यक्रम, क्रीडा स्पर्धा, तंत्रज्ञान मेळावे यांचा अनुभव शिक्षणाबरोबरच महत्त्वाचा असतो.
या सर्व गोष्टींचा विचार केल्यास तुम्हाला योग्य इंजिनिअरिंग कॉलेज निवडणे आणि भविष्यात यशस्वी करिअर घडवणे सोपे होईल.
माहिती संकलन आणि संपादन-
#विद्यार्थीमित्र प्रा. रफीक शेख
डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम विद्यार्थी फाउंडेशन, परभणी.
Post a Comment