प्रत्येक व्यक्तीची विचार करण्याची एक विशिष्ट पद्धत असते आणि तो त्याच दृष्टीकोनातून विचार करत असतो. असं असलं तरीही आपण जो विचार करतो तो काळाशी सुसंगत असावा आणि भविष्याचा वेध घेणारा असावा. सारासार विचारांनी प्रगतीशील विचारांची वाट पकडली की बदलत जाणाऱ्या परिस्थितीचे अर्थ समजत जातात. नदीला प्रवाही राहण्यासाठी प्रत्येक वळणाच्या मार्गाने जसे पुढे जात रहावे लागते, अगदी तशीच ही स्थिती असते.
जीवन हे स्थिर नसून सतत बदलणाऱ्या प्रवाहासारखे असते. हे स्वीकारणे महत्वाचे आहे की, परिवर्तन हीच प्रगतीची खरी गुरुकिल्ली आहे. अस्थिर, नकारात्मक विचारांनी कुठलाही पर्याय सापडत नसतो. म्हणूनच संकटांच्या छायेतही सकारात्मक विचारांची मशाल उजळती ठेवावी लागते. आपल्या कामाप्रती असलेलं समर्पण आणि त्यागच आपल्याला जीवनात यशाच्या वाटेवर घेऊन जात असतो. समर्पणातून निर्माण होणारी निष्ठा आणि कष्टांची तयारी हीच यशाचे खरे गमक आहे.
आयुष्यात येणाऱ्या प्रत्येक संकटाचं योग्य आकलन होत नसेल तर आपला विचारांचा मार्ग बदलून पाहावा लागतो. बदललेला मार्ग त्या संकटाकडे पाहण्याचा दृष्टिकोनही बदलवतो. जीवनातील प्रत्येक अनुभव हा आपल्याला काहीतरी नवीन शिकवतो, मग तो गोड असो वा कटू. म्हणूनच, अपयशाने खचून न जाता, त्यातून शिकण्याची आणि पुढे जाण्याची उमेद ठेवावी लागते.
त्यासाठी आपल्या विचारात आणि आचरणात प्रामाणिकपणा आणि नितळपणा असावा. प्रामाणिकपणा ही केवळ बाह्य वागणुकीपुरती मर्यादित नसून, तो आपल्या आत्म्याशी प्रामाणिक राहण्यातही आहे. जीवनात भावना ओल्या असल्या की, उमलण्याचे आणि बहरण्याचे अर्थ समजतात. जसे मृदू पावसाने कोरड्या जमिनीला हिरवळ बहाल होते, तसेच संवेदनशील मन हे दुसऱ्यांच्या वेदना समजून घेत जीवन अधिक सुंदर बनवते.
आपल्या आचरणाचा सुगंध इतरांच्या जीवनात अत्तारासारखा पसरावा आणि आनंद निर्माण करणारा असावा. प्रत्येक कृतीमधून प्रेम, सहकार्य, आणि सकारात्मकता झळकली पाहिजे. एवढंच आपल्यासाठी जास्त महत्वाचं असतं. कारण शेवटी, आपल्यामागे उरलेली आठवण ही आपल्या विचारांची, आचरणाची आणि दिलेल्या आनंदाचीच असते. जीवनाचा खरा अर्थ हाच आहे—स्वतःसाठी नव्हे, तर इतरांसाठीही जगण्यात..!
-एक पुस्तकप्रेमी आणि समीक्षक :
#विद्यार्थीमित्र प्रा.रफीक शेख
🎓 डॉ. ए.पी.जे.अब्दुल कलाम विद्यार्थी फाउंडेशन, परभणी.
https://www.vidhyarthimitra.com
Post a Comment