मनुष्याच्या जीवनात चढ-उतार हे अपरिहार्य असतात. प्रत्येक टप्प्यावर विविध प्रकारच्या परिस्थिती येतात, काही अनुकूल असतात तर काही प्रतिकूल..परंतु, अशा प्रतिकूल परिस्थितींमध्ये टिकून राहण्याची आणि पुढे जाण्याची खरी शक्ती त्याच्या विचारधारेत, तत्त्वांमध्ये आणि आदर्शांमध्ये असते. एकदा का ही मूल बैठक पक्की झाली, तर कोणत्याही वादळातसुद्धा माणूस आपले अस्तित्व टिकवू शकतो.
🔰विचारांची भूमिका...
विचार हे मनुष्याच्या आयुष्याचा पाया असतात. सकारात्मक विचारधारा असणारा माणूस प्रत्येक कठीण प्रसंगाला संधी म्हणून पाहतो. नकारात्मक विचार माणसाला खचवतात, भीती निर्माण करतात, तर सकारात्मक विचार त्याला नवी ऊर्जा देतात, त्याच्या समस्यांकडे नव्या दृष्टिकोनातून पाहायला शिकवतात.
महात्मा गांधी यांचेच उदाहरण घेऊ. ब्रिटिश साम्राज्याच्या विरुद्ध लढताना त्यांच्यासमोर किती अडथळे आले, किती वेळा त्यांना तुरुंगवास भोगावा लागला, पण त्यांच्या विचारांची बैठक इतकी दृढ होती की, ते कधीही आपल्या मार्गावरून विचलित झाले नाहीत. त्यांचे विचार त्यांना संकटांमध्येही टिकून राहण्याची प्रेरणा देत होते.
🔰तत्त्वे आणि त्यांचे महत्त्व..
तत्त्वे म्हणजे जीवनातील स्थिर मूल्ये. कोणत्याही परिस्थितीत योग्य आणि अन्यायाविरुद्ध उभे राहण्याची ताकद माणसाच्या तत्त्वांमध्ये असते. आजकालच्या स्पर्धात्मक युगात अनेक जण आपल्या तत्त्वांना बाजूला ठेवून त्वरित यश मिळवण्याचा प्रयत्न करतात. मात्र, खरे यश मिळवण्यासाठी दृढ तत्त्वांचा आधार महत्त्वाचा असतो.
डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम हे त्याचे उत्तम उदाहरण आहेत. त्यांचे वैज्ञानिक दृष्टिकोन, कष्ट करण्याची तयारी आणि प्रामाणिकपणा या तत्त्वांमुळे ते फक्त भारताचे राष्ट्रपती झाले नाहीत, तर संपूर्ण जगासाठी प्रेरणास्त्रोत ठरले. त्यांनी कधीही आपल्या तत्त्वांना सोडले नाही, त्यामुळेच ते विपरीत परिस्थितीतही आपले अस्तित्व टिकवू शकले.
🔰आदर्श आणि प्रेरणा...
आदर्श म्हणजे जीवनातील दिशा. ज्यांच्याकडून प्रेरणा घ्यावी, असे आदर्श समोर असले की, माणसाला कधीच मार्ग चुकत नाही. जीवनात कठीण प्रसंग आले तरीही तो खचून जात नाही.
स्वामी विवेकानंद यांचे जीवन हे आदर्शाचे मूर्तिमंत उदाहरण आहे. त्यांनी तरुणांना स्वतःच्या विचारशक्तीवर विश्वास ठेवण्याची प्रेरणा दिली. त्यांनी जगभर भारतीय संस्कृतीचे महत्त्व पटवून दिले आणि लोकांना त्यांच्या आत्मशक्तीची जाणीव करून दिली. त्यांच्या आदर्शांमुळे आजही कोट्यवधी लोक प्रेरित होतात.
🔰विपरीत परिस्थितीत टिकून राहण्याची मानसिकता...
कोणतीही संकटे आली तरी माणसाने त्याचा आत्मविश्वास ढळू देता कामा नये. संकटे ही तात्पुरती असतात, पण ज्याच्याकडे दृढ विचार, ठाम तत्त्वे आणि प्रेरणादायी आदर्श असतात, तो कुठल्याही परिस्थितीत टिकून राहतो.
🔰त्यासाठी महत्त्वाच्या काही बाबी मित्रांनो..✍️
1. सकारात्मक दृष्टीकोन: प्रत्येक अडचण ही नवी संधी असते असे मानून पुढे जाणे.
2. स्वतःवरील विश्वास: आपल्यात असलेल्या क्षमतांवर विश्वास ठेवणे.
3. धैर्य आणि संयम: कठीण काळातही शांत राहून योग्य निर्णय घेणे.
4. निरंतर शिकण्याची वृत्ती: अनुभवातून शिकून स्वतःला विकसित करणे.
5. आध्यात्मिकता आणि मनःशांती: मानसिक संतुलन टिकवण्यासाठी ध्यान आणि आत्मचिंतन करणे.
विचार, तत्त्वे आणि आदर्श हीच खऱ्या अर्थाने माणसाच्या अस्तित्वाची खरी ओळख असते. संकटे कितीही मोठी असली तरी त्यांच्याशी सामना करण्याची ताकद या मूल्यांमधूनच मिळते. म्हणूनच, प्रत्येकाने आपल्या विचारधारेला शुद्ध ठेवले पाहिजे, तत्त्वांचे पालन केले पाहिजे आणि उत्तम आदर्शांकडून प्रेरणा घेत राहिले पाहिजे. अशी मूल बैठक पक्की असेल, तर कोणतेही संकट माणसाला नामोहरम करू शकत नाही. उलट, तो त्या संकटांवर मात करून अधिक मजबूत होतो आणि इतरांसाठीही प्रेरणादायी ठरतो.
लेखन आणि संपादन..✍️
#विद्यार्थीमित्र प्रा.रफीक शेख
🎓 डॉ. ए.पी.जे.अब्दुल कलाम विद्यार्थी फाउंडेशन, परभणी.
https://www.vidhyarthimitra.com
Post a Comment