"कट्टरतेच्या डबक्यात अडकलेली मने प्रवाही विचारांना विरोध करतात, पण सत्याच्या प्रवाहाला कोणीही रोखू शकत नाही."
सोशल मिडियावर अनेकदा लोक उद्धट आणि टोकाची वागणूक का दाखवतात? यामागचं मुख्य कारण म्हणजे त्यांना माहीत असतं की समोरच्या व्यक्तीशी प्रत्यक्ष जीवनात कधीही संबंध येणार नाही. त्यांच्या अस्तित्वाचा आपल्या जीवनावर कोणताही परिणाम नाही, त्यामुळे कसेही वागले, बोलले, उपहास केला, अपमानित केलं तरी आपल्याला कोणतीही जबाबदारी उरलेली नसते. परिणामी, अनेक जण सोशल मिडियाचा गैरफायदा घेतात आणि त्यांच्या वैचारिक आणि मानसिक मर्यादांचे प्रदर्शन करतात.
समाज माध्यमांवर असभ्यपणा का वाढतो..?
स्वकेंद्री व्यक्तिमत्त्व असलेले, सदसद्विवेकबुद्धी गहाण ठेवून जगणारे काही अंधभक्त आणि संकुचित विचारसरणीचे लोक यामध्ये आघाडीवर असतात. त्यांना सामाजिकतेचं भान नसतं आणि त्यांची उद्दामता केवळ ऑनलाइन प्लॅटफॉर्मपुरती मर्यादित असते. मात्र, प्रत्यक्ष जीवनात परिस्थिती वेगळी असते. आपल्या नातेवाईक, मित्र, सहकारी आणि समाजातील लोक प्रत्येक वेळी आपल्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही. अनेकदा टोकाच्या भिन्न विचारांचे मित्र आणि सहकारी असतात, पण म्हणून आपण त्यांच्याशी उद्धट वागत नाही.
प्रत्यक्ष जीवन विरुद्ध सोशल मीडिया..
विचार भिन्न असूनही आपण नातेसंबंध टिकवण्याचा प्रयत्न करतो. कारण त्या व्यक्तीशी आपला प्रत्यक्ष संबंध आलेला असतो. त्या नात्याला महत्त्व देत असल्यामुळे आपण समंजसपणे संवाद साधतो. मात्र, सोशल मिडियावर हा समंजसपणा कमी होत जातो, कारण तिथे जबाबदारीची जाणीव कमी असते. आपल्याला वाटते की आपली मते ठाम आणि अंतिम आहेत, पण वास्तवात प्रत्येक व्यक्तीची विचारधारा आणि अनुभव वेगळे असतात. म्हणूनच, कोणत्याही चर्चेत परिपक्वता आणि संयम आवश्यक असतो.
वैचारिक प्रवाह आणि त्याचा परिणाम..
डबक्यात साचलेली कट्टर मानसिकता नेहमीच विवेकी आणि तर्कसंगत विचारांना विरोध करते. मात्र, जो विचार प्रवाह सत्याच्या आणि तार्किकतेच्या बाजूने असतो, तो थांबत नाही. समाज माध्यमे ही आज वैचारिक क्रांती घडवणारी ठरत आहेत आणि मानवी विकासाच्या टप्प्यांना साक्षीदार होत आहेत.
आपलं वागणं विवेकी असावं..
समाज माध्यमांवर आपली भूमिका ही विवेकी आणि कालसुसंगत असावी. आपले विचार दुसऱ्यांवर थोपवण्यापेक्षा, त्यांची चिकित्सा करून योग्य बदल करण्याची तयारी ठेवली पाहिजे. वैचारिक आदान-प्रदान हे समंजस आणि परिपक्व पद्धतीने व्हावे. खुल्या आणि मुक्त विचारसरणीला संधी दिल्यासच समाज माध्यमांचा योग्य उपयोग होईल आणि सकारात्मक परिवर्तन घडेcom
म्हणूनच, संवाद साधताना संयम, समंजसपणा आणि परिपक्वता जपायला हवी. विचारांना चोखंदळपणे पडताळून पाहणं, गरज पडल्यास स्वतःच्या मतांमध्ये सुधारणा करणं आणि दुसऱ्यांच्या मतांचा आदर राखणं—ही खरी सोशल मिडियावरची जबाबदारी आहे.
चला, आपण सर्वजण जबाबदारीने आणि सुजाणपणे संवाद साधूया मित्रांनो..!
धन्यवाद.. 🙏
-विचार संकलन आणि संपादन
-एक पुस्तकप्रेमी आणि समाजमाध्यमकार..
#विद्यार्थीमित्र प्रा.रफीक शेख
The Spirit of Zindagi Foundation
🎓 डॉ. ए.पी.जे.अब्दुल कलाम विद्यार्थी फाउंडेशन, परभणी.
https://www.vidhyarthimitra.com
Post a Comment