अगदी हृदयस्पर्शी..!🌹
सहिष्णुता आणि सर्वधर्म समभाव हा भारताचा खरा आत्मा आहे.
याच मूलतत्त्वांचा सन्मान भारतीय संविधानाने केला असून, त्यावरच आपल्या देशाची सामाजिक आणि राजकीय रचना उभी आहे. मात्र, आजच्या सामाजिक परिस्थितीकडे पाहता, द्वेषाचे आणि असहिष्णुतेचे सावट दाटत चालले आहे.
भारतात हजारो वर्षांपासून विविध जाती-धर्मांतील लोक एकत्र राहिले आहेत. भिन्न परंपरा, भाषा आणि संस्कृती असतानाही इथल्या मातीने एकात्मतेचा धागा जपला.
पण आज द्वेष, तिरस्कार आणि समाजात फूट पाडणाऱ्या प्रवृत्तींच्या विषारी प्रचाराला खतपाणी घातले जात आहे. हे घडत असताना आपण नि:पक्ष पातीपणे विचार केला पाहिजे—आपली सामाजिक जडणघडण इतकी दुर्बल झाली आहे का, की राजकीय फायद्यासाठी चालवलेली ही खेळी समाजात इतकी खोलवर का रुजते आहे?
2014 साली भारताला उजव्या विचारसरणीचे ग्रहण लागले, असे अनेकजण मानतात. काहींच्या मते, हा सामाजिक आणि राजकीय स्थित्यंतराचा अपरिहार्य भाग आहे. पण वास्तवाचे आकलन करताना दिसते की, या परिवर्तनाने सहिष्णुतेच्या भूमीत असहिष्णुतेचा विषारी अंकुर रुजवला.
दिवसेंदिवस आपण अराजकतेच्या दिशेने वाटचाल करत आहोत का, याचा विचार करणे गरजेचे आहे.
भारताच्या भूमीत तथागत गौतम बुद्धांचा अहिंसेचा विचार जन्माला आला, चार्वक आणि लोकायतांसारख्या तत्त्वज्ञानांनी बंडखोरी करुन अध्यात्मिक उपासने पेक्षा आत्म-उन्नती आणि भौतिक वादाचा पुरस्कार केला, संत आणि सुफींनी सर्वसमावेशकतेचा संदेश दिला, आणि फुले-शाहू-आंबेडकर-गांधी-पेरियार यांच्या विचारमंथनातून भारताने पुरोगामी वाटचाल केली.
मग आज त्या पुरोगामीतेचा लोप होतोय का? सहिष्णुतेचा आदर्श असलेल्या या देशात ज्ञानाधारित लोकशाही कमकुवत होतेय का?
वैचारिक अभिव्यक्तीच्या मार्गावर निर्बंध का येत आहेत?
अल्पसंख्याकांची असुरक्षितता : जबाबदारी कुणाची?
आज देशातील अल्पसंख्याक समाज असुरक्षिततेच्या छायेखाली का वावरतोय? त्यांना सतत स्पष्टीकरण द्यावे लागते की ते या देशाचेच आहेत.
बहुसंख्याकांच्या छत्रछायेत अल्पसंख्यकांच्या अस्तित्वावर प्रश्नचिन्ह निर्माण होणे हे लोकशाहीसाठी धोक्याचे संकेत आहेत.
संविधानिक मूल्यांची जपणूक करताना आपल्याला एका गोष्टीची जाणीव ठेवावी लागेल—ही भूमी सर्वांची आहे, इथली संस्कृती सर्वांना सामावून घेणारी आहे.
आता प्रश्न असा आहे की, आपण या परिस्थितीत काय करू शकतो? सहिष्णुता आणि समता या मूल्यांचा पुनरुज्जीवन करायचे असेल, तर समाजातील प्रत्येकाने यासाठी आवाज उठवला पाहिजे.
राजकीय स्वार्थाच्या पुढे जाऊन लोकशाही, सामाजिक सलोखा आणि संविधानिक मूल्यांचे रक्षण करण्याची जबाबदारी ही केवळ नेत्यांची नाही, तर प्रत्येक नागरिकाची आहे.
भारताला पुन्हा सहिष्णुतेच्या मार्गावर नेण्यासाठी वैचारिक प्रगल्भता आणि कृतीशील जबाबदारी गरजेची आहे. अन्यथा, आपण अशा दिशेने पुढे जाऊ, जिथे भारताचे वैश्विक स्वरूप आणि ऐतिहासिक समृद्धी धोक्यात येईल.
त्यामुळेच—विचार करा, कृती करा आणि आपल्या देशाचा आत्मा जपण्यासाठी पुढे येऊयात मित्रांनो..!
धन्यवाद मित्रांनो.. वेळ काढून वाचल्याबद्दल..🙏
एक संविधान प्रेमी आणि समाज माध्यमकार
#विद्यार्थीमित्र प्रा.रफीक शेख
The Spirit of Zindagi Foundation
🎓 डॉ. ए.पी.जे.अब्दुल कलाम विद्यार्थी फाउंडेशन, परभणी.
https://www.vidhyarthimitra.com
#सहिष्णुता #संविधान #लोकशाही #समाजएकता #भारतीयसंस्कृती #सर्वधर्मसमभाव #आंबेडकरविचार #गांधीयुग #मानवतावाद #विद्यार्थीमित्र #SpiritOfZindagi #DrAPJAbdulKalamFoundation
Post a Comment