जीवन हा एक प्रवास आहे, जिथे सुख आणि दुःख, यश आणि अपयश विजय आणि पराभव या सर्व गोष्टींचा अनुभव घ्यावा लागतो. मात्र, ज्या व्यक्ती सामना करतात, त्या खऱ्या अर्थाने सामर्थ्यशाली बनतात. संघर्ष हा एक शिक्षक असतो, जो आपल्याला जीवनाचे कठोर पण मौल्यवान धडे शिकवतो.
जगण्याच्या प्रवासात प्रत्येक व्यक्तीला संघर्षाचा सामना करावा लागतो. संघर्ष टाळता येत नाही, पण त्यावर मात करून पुढे जाणे हेच खरी जिद्द आणि सामर्थ्याचे लक्षण असते. इतिहासाच्या पानांवर नजर टाकली तर असे अनेक उदाहरणे सापडतील, जिथे कठीण परिस्थितीमुळेच माणूस अधिक मजबूत आणि यशस्वी बनला आहे.
🔰संघर्ष म्हणजे संधी..✍️
संघर्ष हा आयुष्याचा एक अविभाज्य भाग आहे. काहीजण त्याला दुर्बलता समजतात, तर काही त्याचा उपयोग स्वतःला घडवण्यासाठी करतात. आपण कोणाही यशस्वी व्यक्तीच्या जीवनाचा अभ्यास केला तर दिसून येते की, त्यांनी अनेक कठीण प्रसंगांना तोंड दिले आहे. स्वामी विवेकानंद, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, डॉ.अब्दुल कलाम, स्टिव्ह जॉब्स यांसारख्या थोर व्यक्तींनी संघर्षाचा स्वीकार करूनचं यशाचे शिखर गाठले आहे.
ज्याच्यावर कोणतेही संकट आले नाही, ज्याला कधीच अपयश आले नाही, त्याच्या मनगटात खरी ताकद निर्माण होऊ शकत नाही. यशाचा मार्ग हा संघर्षातूनच जातो. जो व्यक्ती संघर्षाचा स्वीकार करतो, तो स्वतःला अधिक सक्षम बनवतो.
स्वामी विवेकानंद म्हणतात, "उठा, जागे व्हा आणि ध्येय प्राप्त होईपर्यंत थांबू नका." हीच मानसिकता संघर्ष करणाऱ्यांची असते. आयुष्यातील संकटे ही न संपणारी नसतात, पण ती आपल्याला अधिक कठीण, अधिक शहाणे आणि अधिक सामर्थ्यवान बनवतात.
🔰संघर्षाचे जीवनातील महत्त्व...✍️
1. स्वतःला ओळखण्याची संधी – संघर्षामुळे आपली खरी क्षमता लक्षात येते. संकटे आल्याशिवाय आपल्याला आपल्या ताकदीचा अंदाज येत नाही.
2. सहनशक्ती आणि आत्मविश्वास वाढतो – अपयश पचवणे आणि पुन्हा उभे राहणे ही मोठी कला आहे. संघर्ष हीच ती प्रक्रिया असते जी आपल्याला मानसिकदृष्ट्या अधिक सशक्त बनवते.
3. यशाचे मोल कळते – जेव्हा यश सहज मिळते, तेव्हा त्याची किंमत कळत नाही. पण संघर्षातून मिळालेले यश गोड आणि प्रेरणादायी असते.
4. नवीन कौशल्ये शिकण्याची संधी मिळते – संकटे आणि अडचणी यामुळे आपण नवे मार्ग शोधतो, नव्या संधी निर्माण करतो आणि नवीन कौशल्ये आत्मसात करतो.
🔰संघर्षातून सामर्थ्य निर्माण करणाऱ्या महान व्यक्ती..
नेल्सन मंडेला – 27 वर्षे तुरुंगात घालवूनही त्यांनी अन्यायाविरुद्ध लढा देण्याचे सामर्थ्य टिकवले.
डॉ.अब्दुल कलाम – अत्यंत गरीब कुटुंबात जन्मलेल्या कलाम यांनी आपल्या संघर्षातून भारताचे ‘मिसाईल मॅन’ आणि राष्ट्रपती होण्यापर्यंतचा प्रवास केला.
हेलेन केलर – अंध आणि मुकबधिर असूनही त्यांनी आपल्या जिद्दीच्या जोरावर जगात प्रेरणादायी कार्य केले.
🔰संघर्षाला सामोरे जाण्यासाठी काही महत्त्वाचे मंत्र.. ✍️
1. स्वतःवर विश्वास ठेवा – आत्मविश्वास हीच तुमची खरी ताकद आहे.
2. अवलोकन आणि सुधारणा करा – संकटांमधून शिकून स्वतःमध्ये सुधारणा करा.
3. सकारात्मक दृष्टिकोन ठेवा – कठीण प्रसंगांतही आशावादी राहा.
4. कठोर परिश्रम करा – यशाचा शॉर्टकट नसतो. संघर्ष आणि मेहनत हेच यशाचे खरे मार्ग आहेत.
5. थांबू नका, पुढे चला – संघर्ष तुमच्यासाठी नवीन संधी घेऊन येतो, त्यामुळे कधीही हार मानू नका.
जेव्हा माणूस आयुष्यातील कठीण प्रसंगांना धैर्याने सामोरे जातो, तेव्हा त्याच्या मनात आत्मविश्वास निर्माण होतो. आयुष्यात मिळालेले प्रत्येक यश मागे कोणता ना कोणता संघर्ष असतो. म्हणूनच, संघर्षाला घाबरू नका, त्याचा स्वीकार करा आणि त्यातून स्वतःला अधिक सक्षम बनवा. कारण खरा सामर्थ्यवान तोच, जो संकटांवर मात करून पुढे जातो!
संघर्ष ही जीवनातील अपरिहार्य गोष्ट आहे. जोपर्यंत आपण संघर्ष करतो, तोपर्यंत आपण जिवंत आहोत आणि प्रगती करत आहोत. म्हणूनच, संघर्षाला घाबरण्याऐवजी त्याला स्वीकारा, त्यातून शिकून स्वतःला अधिक सामर्थ्यवान बनवा. कारण, "सामर्थ्य हे संघर्षातूनच निर्माण होत असते!"
🙏 धन्यवाद मित्रांनो..लेख आवडला असेल, तर आपल्या प्रियजनांसोबत नक्की शेअर करा.!
-विचार संकलन आणि संपादन.. ✍️
-एक पुस्तकप्रेमी आणि समाजमाध्यमकार..
#विद्यार्थीमित्र प्रा.रफीक शेख
The Spirit of Zindagi Foundation
🎓 डॉ. ए.पी.जे.अब्दुल कलाम विद्यार्थी फाउंडेशन, परभणी.
https://www.vidhyarthimitra.com
Post a Comment