पुस्तकांनी काय शिकवलं ?
तुमच्याकडे दहा रुपये असतील तर आठ रुपये स्वतःच्या खर्चासाठी ठेवा . उरलेल्या दोन रुपयांपैकी एक रुपयाचं गुलाबाचं फुल घ्या आणि एक रुपयांचं पुस्तक घ्या अशी एक म्हण आहे , का जगायचं ते गुलाबाकडे पाहून कळेल आणि कसं जगायचं ते पुस्तक शिकवेल . पुस्तके अत्यंत मोलाची आहेत . त्यात मराठी साहित्य ही तर न संपणारी दौलत आहे. जितकी जास्त लुटाल तितकी ती वाढत जाते . एक ज्ञानेश्वरी जरी पुन्हा पुन्हा वाचली तर प्रत्येक ओवीचा अर्थ नव्याने कळतो .
आपण मराठी माणसे खरोखर नशीबवान , आपल्याला जसा थोर इतिहास लाभला तशी साहित्याची मोठी परंपराही लाभली.
मी पुस्तके वाचायला सुरुवात केली तेव्हा काय वाचायचं हे ठरवलं नव्हतं . सार्वजनिक वाचनयालात जे समोर येईल ते वाचत गेलो आणि हळहळू मराठी साहित्याचा मोठा खजिना हाती गवसला . सुरुवात झाली होती पॅपिलॉन नावाच्या पुस्तकापासून . हेन्री शॅरीयर नावाच्या एका फ्रेंच गुन्हेगाराने हे पुस्तक लिहिलं , हेन्रीला गुन्हेगारी जगतात पॅपिलॉन नावाने ओळखत असत . तो फार मोठा गुन्हेगार नव्हता पण त्याच्यावर खुनाचा खोटा आळ आला आणि त्याला फ्रेंच गियानामधील कुप्रसिद्ध जेलमध्ये धाडण्यात आलं. तिथे त्याला कठोर कारावास भोगावा लागला , आपल्यावर खोटा आळ टाकणार्यांना धडा शिकवायचा , त्यासाठी जेलमधून पळायचं आणि पुन्हा फ्रान्सला जायचं हे त्याने ठरवलं , त्याचा प्रवास सोपा नव्हता , तरीही अत्यंत जिद्द , धाडसाच्या बळावर तो पळाला , ही सगळी कथा त्याने स्वतः लिहिली आणि रवींद्र गुर्जर ह्यांनी ती मराठीत आणली..
ह्या पुस्तकाने शिकवलं की जीवनात केव्हाही अडचणी येऊ शकतात आणि त्याला तोंड द्यायला साहस , दुर्दम्य आत्मविश्वास ह्याची गरज असते . संघर्ष हा दर पावलाला येत असतो आणि त्याला तोंड देत जिद्दीने लढायचं असतं .
साहस आणि दुर्दम्य आत्मविश्वासाचा विषय निघतो तेव्हा वीर सावरकरांचं ''माझी जन्मठेप'' पुस्तक विसरता येत नाही. सावरकरांना दोन जन्मठेपीच्या शिक्षा सुनावण्यात आल्या , एक जन्मठेप होती २५ वर्षांची. म्हणजे सावरकर ५० वर्षा नंतर जेलमधून बाहेर येणार होते , थोडक्यात जिवंत बाहेर येण्याची शक्यता नव्हती , तरीही शिक्षा ऐकून ते डगमगले नाहीत , त्यांनी ब्रिटिश सरकारला ऐकवले , तुम्ही फार काळ भारतात राहू शकणार नाही , त्यामुळे माझी शिक्षा लवकर संपेल , इतका दुर्दम्य आत्मविश्वास फक्त तेच दाखवू शकतात. अंदमानच्या सेल्युलर कारागृहात गेल्यावर त्यांची कठोर बारीशी गाठ पडली , शारीरिक - मानसिक यातनांना सुरुवात झाली , दिलेल्या भांड्यात संडास करावी लागे , स्वतःच्या कोठडीत लघुशंका केल्यावर त्याचा वास घुमत राही ,
दिवसाचे 16 तास कोलू चालवून शरीर भयंकर थकून जाई , इतकी भयंकर प्रतिकूलता असूनही ते हिंदुस्तानच्या स्वातंत्र्याचं स्वप्न पाहत होते , जगताना आपल्यावर संकटे येऊ शकतात आणि आपण त्यांवर मात करू शकतो हे शिकायचं असेल तर 'माझी जन्मठेप' वाचायलाच हवे. क्रांतिकारकांनी जे भोगले त्या तुलनेत आपल्या वाट्याला जर काही प्रतिकूल परिस्थिती आली तर ती काहीच नाही हे जाणवू लागते.
जगायला शिकवणाऱ्या पुस्तकांची अनेक उदाहरणे आहेत , त्यातील मी वाचलेलं अजून एक आहे डेझर्टर..! गंथर बाहनमन हा जर्मन सैनिक होता , त्याची लिबियामध्ये नेमणूक झाली होती. हिटलरसाठी तो लढत असताना त्याच्या वडिलांना नाझी सैनिकांनी फासावर चढवले , म्हणून त्याने सैन्य सोडण्याचे ठरवले. जर्मनीला जाऊन आईला भेटायचे त्याचे स्वप्न होते पण त्याचा प्रवास सोपा नव्हता , सैन्यातून पळाल्यामुळे त्याला ठार केले जाऊ शकत होते , तरीही तो जर्मन आणि त्यांचे दोस्त असलेल्या इटालियन सैन्याला झुकांड्या देत पळत राहिला आणि अखेर शत्रूच्या म्हणजे ब्रिटिशांच्या तावडीत सापडला , ब्रिटिशांच्या कैदेत असताना तो इंग्लिश शिकला आणि त्याने हे पुस्तक लिहिले.
विजय देवधरांनी अनेक पुस्तकांचा अनुवाद केला. त्यापैकी बरीच पुस्तके साहसावर आधारित आहेत. ही सगळी पुस्तके आपल्याला धाडस करायला उद्युक्त करतात. रवींद्र गुर्जरांनी अनुवादित केलेल्या 'सत्तर दिवस' पुस्तकाचाही आवर्जून उल्लेख करायला हवा. एक विमान दुर्गम पर्वतामध्ये कोसळले आणि त्यात जिवंत राहिलेल्या प्रवाशांनी जगण्यासाठी जी धडपड केली , ती ह्या पुस्तकात दिली आहे. ह्या प्रवाशांनी बर्फाळ प्रदेशात स्वतःला जिवंत ठेवण्यासाठी मेलेल्या सहप्रवाशांचे मांस कापून खाल्ले .
अखेरीस त्यांचा शोध लागला आणि त्यांची सुटका झाली. ज्यांना जीवनात अपयश आल्यामुळे आत्महत्या करावीशी वाटते त्यांनी जगण्याचा टोकाचा प्रयत्न कसा असतो हे जाणून घेण्यासाठी हे पुस्तक जरूर वाचावे . ही सत्यकथा आपल्याला अत्यंत प्रतिकूल परिस्थितीही जगण्याची प्रेरणा देते , जगण्यासाठी अनेकांची कशी धडपड चालते हे जाणून घ्यायचे तर 'मला निसटले पाहिजे' हे पुस्तकही वाचावे .
रशियाने काही ब्रिटिश सैनिकांना बंदी बनवले होते . ह्या सैनिकांनी पळून जाण्यासाठी जे प्रचंड धाडस केले तो ह्या पुस्तकाचा विषय आहे . कैदेतून पळाल्या वर हे सैनिक रशियापासून भारतापर्यंत चालत आले , इथे ब्रिटिशांची सत्ता होती . भारतात आल्यावर ब्रिटिश आपल्याला पुन्हा इंग्लंडला पाठवतील , हे ओळखून त्यांनी अत्यंत थंड प्रदेशातून उपासतापास सहन करून भारतापर्यंत चालत प्रवास केला . भारताच्या सीमेवर ते ब्रिटिश सैन्याकडे आले आणि त्यांना इंग्लंडला पाठवण्यात आले . स्वातंत्र्य मिळवण्यासाठी माणूस प्रसंगी जीवावर उदार होतो , असंख्य अडथळे पार करतो हे या पुस्तकातून शिकता येते . आपल्याला मिळालेले स्वातंत्र्य किती बहुमोल आहे ते कळते , तसेच एक सैनिक देशासाठी किती झटत असतो तेही कळते .
भारता मध्येही अनेक चरित्रकथा लिहिल्या गेल्या. 'लंडनच्या आजीबाई' हे पुस्तक त्यापैकी एक आहे. इंग्रजांच्या काळात विदर्भात राहणारी राधाबाई वनारसे ही विधवा दारिद्र्य भोगत होती . मुलींचं पोषण करणं अशक्य झालं होतं . ती दुसरा विवाह करून इंग्लंडला राहायला गेली . दुर्दैवाने दुसऱ्या पतीचेही निधन झाले. पुन्हा दारिद्र्य आले . इंग्लिश भाषा येत नव्हती .
ती अशिक्षित होती . तरीही इंग्लंडमध्ये राहून तिने खानावळ चालवली आणि लंडनमध्ये चार इमारती विकत घेतल्या . पु. ल. देशपांडे , अत्रे , यशवंतराव चव्हाण लंडनला गेले की तिच्या खानावळीत जात असत . अत्रेंनी तर तिचे कौतुक करताना म्हटले की त्यांच्यामुळे लंडनही महाराष्ट्राचा भाग व्हायला पाहिजे . हे पुस्तक वाचकाला आशावादी बनवते , संघर्ष करण्याची प्रेरणा देते . कितीही संकटे आली तरी श्रम करून संकटे दूर करता येतात , यश मिळवता येते , हे या पुस्तकातून शिकता येते.
काही पुस्तके जगायला शिकवतात तर काही पुस्तके का जगायचं हे शिकवतात. जीवनातील विसंगतीकडे पाहून हसता येते हे पु. ल. देशपांडेंची पुस्तके शिकवतात आणि असे दिलखुलास हसता येते हाच जीवनातील मोठा आनंद आहे हे या पुस्तकातून कळते . "चाराणे खाल्ले तर चौकटीची टोपी घालून डिस्ट्रिक्ट जेलात घालतात आणि लाखो रुपये खाल्ले तर लोकनियुक्त प्रतिनिधी बनवतात'' हा त्यांचा विनोद अनेक वर्षे उलटली तरी अजूनही खरा ठरतो. ''असा मी असामी'' आजही सामान्य माणसाचे प्रतिबिंब आहे . आचार्य अत्र्यांची पुस्तकेही अशीच हसवतात . द. मा. मिरासदार , रमेश मंत्री यांचीही पुस्तके करमणूक करतात . शं. ना. नवरे , व. पु. काळे छोट्या कथेमधून खूप काही सांगून जातात . व्यंकटेश माडगूळकर आणि रवींद्र पिंगे ह्यांचे ललित लेख तर फार वाचनीय असतात.
माडगूळकरांनी त्यांच्या गावाचे खुमासदार वर्णन केले आहे आणि पिंगेंनी स्वतः केलेल्या भटकंतीवर विपुल लेखन केले आहे . हे लेखन आपल्याला आसपास पाहायला प्रवृत्त करते . जीवन चहूबाजूने खूप काही दाखवत असते . आपण आपल्या छोट्या समस्या , रोजचे रडे बाजूला सारून हा आनंद घ्यायला हवा हे त्यांची पुस्तके शिकवतात.
कथा, चरित्रकथा अनेक शब्दातून व्यक्त होतात पण कविता मोजक्या शब्दातून खूप मोठा अर्थ सांगून जाते. आशावाद , सकारात्मकता कशी असावी हे मंगेश पाडगावकरांच्या *'या जन्मावर , या जगण्यावर'* च्या शेवटच्या कडव्यातून शिकता येते . पाडगावकरांनी लिहिले आहे ,
या ओठानी चिंबून घेईन हजारदा ही माती,
अनंत मरणे झेलून घ्यावी इथल्या जगण्यासाठी...
इथल्या पिंपळ पानावरती अवघे विश्व तरावे,
या जन्मावर, या जगण्यावर शतदा प्रेम करावे...
आपण जगताना अनंत यातना सोसतो . प्रसंगी मरणही झेलून घेतो . तरीही पाडगावकर लिहितात की ज्याप्रमाणे श्रीकृष्ण पुरामध्ये पिंपळ पानावरुन तरून गेला तसे हे विश्वही तरणार आहे. आसपास अनेक नकारात्मक प्रसंग घडताना हा आशावाद मनाला खूप उभारी देतो . आपल्या मनाला उभारी देण्यासाठी आणखी एक गोष्ट आवश्यक असते ती म्हणजे एखाद्या व्यक्तीने आपल्या पाठीशी उभं राहणं . एखाद्याने नुसता धीर दिला तरी मोठ्या संकटांवर मात करता येते.
कुसुमाग्रजांची "कणा" कविता हेच शिकवते . कुसुमाग्रजांकडे त्यांचा एक विद्यार्थी आला आहे . त्याच्या घरात पुराचे पाणी शिरल्यामुळे त्याचं घर उध्वस्त झाले आहे. तो येतो आणि म्हणतो,
"ओळखलत का सर मला..?’
पावसात आला कोणी,
कपडे होते कर्दमलेले, केसांवरती पाणी...
क्षणभर बसला नंतर हसला बोलला वरती पाहून,
‘गंगामाई पाहुणी आली, गेली घरट्यात राहुन’.
त्याच्या घरात पुराचं पाणी शिरलं पण त्या पाण्याला नाव न ठेवता तो त्याला गंगामाई म्हणतो आणि पुढे सांगू लागतो ,
" माहेरवाशीण पोरीसारखी चार भिंतीत नाचली,
मोकळ्या हाती जाईल कशी , बायको मात्र वाचली ,
भिंत खचली , चूल विझली , होते नव्हते नेले ,
प्रसाद म्हणून पापण्यांवरती पाणी थोडे ठेवले.
कारभारणीला घेउन संगे सर आता लढतो आहे ,
पडकी भिंत बांधतो आहे ,चिखलगाळ काढतो आहे.."
कुसुमाग्रजांनी त्याला मदत म्हणून काही पैसे देण्याचा विचार केला पण त्याने ते नाकारले ,
कुसुमाग्रज लिहितात,
खिशाकडे हात जाताच हसत हसत उठला,
‘पैसे नकोत सर,
जरा एकटेपणा वाटला.
मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा,
पाठीवरती हात ठेउन, फक्त लढ म्हणा’!
पूरग्रस्त झालेला हा विद्यार्थी खूप मानी आहे , त्याला पैसे नकोत , फक्त सरांकडून धीर हवा आहे , सरांनी पाठीवर हात ठेवून फक्त लढा म्हणावे इतकीच त्याची इच्छा आहे !! कुसुमाग्रजांची ही कविता अनेकांच्या स्मरणात राहिली ती फक्त हव्या असलेल्या धीरासाठी!
मराठी पुस्तकांची ही खासियत आहे . ही पुस्तके जगायला बळ देतात . जणू पाठीवरती हात ठेवून लढ म्हणत असतात ,म्हणून आपल्या संग्रही पुस्तके असावीत , आपल्या पुढच्या पिढीला संपत्ती देण्यापेक्षा पुस्तके द्यावीत , कारण संपत्ती मिळालेली पिढी पंगू होते तर पुस्तके मिळालेली पिढी सक्षम बनते.
पुस्तकांचे महत्त्व अधोरेखित करणारी पाब्लो नेरुडाची कविता आहे,
If you do not travel,
If you do not read,
If you do not listen
to the sounds of life,
You start dying slowly...
जर तुम्ही प्रवास करत नसाल , पुस्तक वाचत नसाल ,
जीवनाचे रंग अनुभवत नसाल तर तुम्ही हळूहळू मरत आहात....
.......
वाचाल तरच वाचाल ,
आणि दुनिया फिराल तरच जगाल !!
Post a Comment