'आला मेसेज, केला फॉर्वर्ड'सॉक्रेटिसची एक साधी पण सुंदर गोष्ट आहे. Triple filter test या नावाने प्रचलित असलेली. सॉक्रेटिसला त्याचा एक मित्र भेटला आणि तिथे हजर नसलेल्या तिसऱ्याच मित्राबद्दल तो बोलायला सुरुवात करणार, इतक्यात सॉक्रेटिसने त्याला अडवले आणि विचारले, ''तू हे जे सांगतोयस त्याबद्दल तुला संपूर्ण खात्री आहे का?'' मित्र गडबडून म्हणाला, ''नाही, मी नुसतंच ऐकलं की.. '' यावर सॉक्रेटिसने विचारलं,
''तू जे सांगणार आहेस ते चांगलं आहे का?'' यावरही मित्र उत्तरला, ''छे छे ..उलट..'' पुन्हा सॉक्रेटिसने त्याला थांबवलं आणि विचारलं, ''निदान माझ्या उपयोगाचं तरी आहे का?''
मित्राचे उत्तर नकारार्थी आलं. त्याला पुढे न बोलू देता सॉक्रेटिसने म्हटलं, ''मग, ज्या गोष्टीची सत्यता तुला माहिती नाही, जी गोष्ट चांगलीही नाही आणि उपयुक्तही नाही अशा गोष्टीत मी माझा वेळ का घालवू?''हीच तिहेरी चाचणी सोशल मीडियाला लावली तर आपल्याला आलेले किती तरी फॉर्वर्ड्स आणि पोस्ट्स आपोआप बाद होतील. पण दुर्दैवाने आपल्यातले किती तरी जण कोणतीच चाचणी न लावता 'आला मेसेज केला फॉर्वर्ड' एवढेच करतात. आणि त्यातून होणारं नुकसान तसंच फॉर्वर्ड होत राहातं. म्हणूनच फॉर्वर्ड करताना थोडं थांबा, विचार करा आणि मगच पुढे पाठवा. झालाच तर याने फायदाच होईल.
-लेख संकलन आणि संपादन:विद्यार्थी मित्र प्रा. रफीक शेख
Post a Comment