अनुवाद : प्रख्यात हिंदी-मराठी अनुवादक - लोकनाथ यशवंत
सआदत हसन मंटो : मूळ लेखकाचा परिचय...
(जन्म: 11 में 1912 - समराला लुधियाना, पंजाब राज्य, भारत. मृत्यू : 18 जानेवारी 1955, लाहोर, पाकिस्तान )
स्वातंत्र्यपूर्व काळ ते स्वातंत्र्याच्या पहिल्या दशकातील उर्दू -हिंदी प्रख्यात वादातीत आणि तत्कालीन प्रभावशाली साहित्यकार..
सआदत हसन मंटो जन्माने मुस्लिम पण आपल्या विवेकशील आणि संवेदनशील वृतीने त्यांनी अडीचशे पेक्षा जास्त कथा, शेकडो श्रुतिका, स्मृतिचित्रे, कादंबरी, अनुवाद, अनेक लेख व निबंध लिहिले. त्यांच्या लेखनात जीवनातील संघर्ष, जाणिवा यांचे उघडपणे दर्शन होते. त्यांच्या आयुष्यातील भळाळती जखम म्हणजे भारत-पाकिस्तान फाळणी. दोन्ही देशांतील दंगली, जाळपोळ, हिंसा, धर्मांधतेने व्यथित केले. या काळातील वेदनामय घटना त्यांनी कथांमधून व्यक्त केल्या आहेत. समाजातील घटनांचे सत्य आणि विद्रूपता त्यांनी निर्भीडपणे मांडले. त्यांची कथा भारताची फाळणी, समाजातील दारिद्र्य, अज्ञानता,कट्टर धर्मांधता,विषमता,वेश्यावृत्ती, इत्यादी विषयांच्या आसपास फिरते.
भारत-पाकिस्तान फाळणीच्या वेळी अखा उत्तर भारत हिंदू-मुस्लिम 'जातीय दंगलीनं ' पेटलेला होता, त्यावेळी धर्मांध मानसिकता 'मानवी मूल्यांना ' तिलांजली देणाऱ्या मनोवृत्तीला सआदत हसन मंटोनीं आपल्या संवेदनशील लेखणीनं त्याला प्रसंगानुरूप ' सियाह-हाशीये ' या लघुत्तम कथा संग्रहातून लेखणी बद्ध करीत धर्मांध आणि स्वार्थी वृत्ती मानवतेचा गळा कसा घोटते, ह्याचं वर्णन काळजाला चर्रर् करणारं आहे..
"माणूस सहिष्णुतेच्या, माणुसकीच्या, धर्माच्या कितीही मोठमोठ्या बाता करीत असला, तरी त्याच्यातली मूळ प्रवृत्ती काही जात नाही. माणसातला हिंस्र पशू डोके वर काढतोंचं."
सआदत हसन मंटो हे उर्दू साहित्य विश्वातील 'विद्रोही' साहित्यकार होते...त्यांच्या लेखन शैलीतील लघुत्तम कथा आजही आपल्या अवती-भवती घडणाऱ्या निरंतर जीवनाशी संबंधित आहेत.
चिरंतन मानवी मुल्याचीं जोपासना करणारं त्यांचं साहित्य आजही उपेक्षितचं आहे, मित्रांनो.
अनुवादक लेखक 'लोकनाथ यशवंत' यांचा परिचय :
आंबेडकरी चळवळीतील सक्रीय कार्यकर्ते,'विद्रोही कवी ' हिंदीतील अनेक लेख आणि विद्रोही व प्रख्यात साहित्याकांच्या साहित्यकृती मराठी भाषेत अनुवाद करून मराठी वाचकांपर्यंत नेण्याचं कार्य करणारे अनुवादक.
प्रस्तुत अनुवादीत पुस्तक अनुवादकांनी...
'वर्णद्वेषाने गुदमरलेल्या जॉर्ज फ्लॉईडच्या श्वासांना ' समर्पित केलंय...
' सियाह-हाशीये ' - लघुत्तम कथा : सआदत हसन मंटो
ह्या लघुत्तम कथात मंटोनीं फाळणीच्या वेळच्या सांप्रदायिक दंगे आणि दंगलीसारख्या समाजातील विकृत अश्लाघ्य विषयावर लिहिलेल्या आपल्या या छोट्या-छोट्या कथांमध्ये दंगलीच्या आतली अन् बाहेरची अशी काही चित्रं रेखाटली आहेत की, आज साठ-सत्तर वर्षांनंतरही वेळेची धूळ या कथांना, त्यांच्या वास्तवाच्या धारेला बोथट करू शकली नाही. काळाच्या पडद्याआड करू शकली नाही.
प्रत्येक कथेत मानवी स्वार्थ, निचता, अहंकार, कट्टर जातीय मानसिकता, क्रूर हिंसा,अज्ञानता, अविवेंकी दृष्टीकोन,भिती,कट्टर धर्मांधता ही मानवी मूल्य आणि संवेदनाचीं कशी हानी करते ह्याचं विवेचन आपल्या वेगळ्या शैलीनं करत... वाचकांना स्वतःच्या आत डोकावण्यासाठी बाध्य करते..
त्यांच्या लघुत्तम कथातील बोध आजही मानवी पाशवी वृत्तीला अधोरेखित करते..
त्यांच्या अनेक लघुत्तम कथातील निवडक काही कथा पुढे देत आहे..
लघुकथा -1
" दंगलीत लुटलेला माल जप्त करण्यासाठी पोलिसांनी घरोघरी धाडी टाकण्यास सुरुवात केली, लोक भिऊन, आपापल्या घरातील लुटीचा माल बाहेर फेकू लागले. याबाबतीत एका माणसाला फारच त्रास झाला. त्याच्याजवळ साखरेची दोन पोती होती. ती त्याने जवळच्या किराणा दुकानातून लुटली होती. एक पोते तर सहज त्याने जवळच्या विहिरीत फेकले, पण दुसरे पोते विहिरीत फेकण्याच्या गडबडीत घाबरून तो एकाएकी विहिरीत पडला, आवाज ऐकून लोक जमा झालेत. विहिरीत दोर टाकण्यात आलेत. दोन माणसं विहिरीत उतरलीत. त्याला बाहेर काढण्यात आलं. काही वेळाने तो मरण पावला. दुसऱ्या दिवशी लोकांनी विहिरीतून पाणी काढले, तर ते गोड होते. त्या रात्रीपासून त्या माणसाच्या कबरीवर दिवे जळत होते. "
लघुकथा -2
" दंगेखोरांनी घरमालकाला मोठ्या श्रमाने घरातून ओढत बाहेर आणलं. कपडे झाडत तो कसातरी उभा झाला आणि दंगेखोरांना म्हणाला- "तुम्ही मला मारून टाका, पण याद राखा. खबरदार..! माझ्या रुपया-पैशांना हात लावला तर...??? "
लघुकथा -3
"अरे, बघ हा मेला नाही... याच्यात आताही जीव आहे."
"जाऊ दे यार...! मी खूप थकलो आहे."
यां आणि अश्या अनेक लघुत्तम कथा ' मानवी स्वभावाच 'मूळ ' सांगून त्याच्या पाशवी वृत्तीला अधोरेखित करणाऱ्या आहेत.. ह्या लघुत्तम कथाच्या बोधमुळे आजच्या माणसाला स्वतः मध्ये डोकावण्याची संधी मिळू शकेल असं मला वाटतं.. जेणेकरून त्यांत तों बदल नक्कीच करू शकेल असा आशावाद ह्या निमित्ताने करूयात मित्रांनो..
तत्कालीन माध्यमात त्यांच्या ह्या कथा 'वादग्रस्त' ठरल्या पण.. आजच्या काळात त्याचं महत्व आजही तितकंच आहे.
पुस्तकाचे नाव : सआदत हसन मंटो यांच्या 'लघुत्तम कथा'
मूळ लेखक : सआदत हसन मंटो
मराठी अनुवादक : लोकनाथ यशवंत
प्रकाशक : मनोविकास प्रकाशन, पुणे.
पुस्तक खरेदी करण्यासाठी :
Post a Comment