केंद्रीय शिक्षण मंत्रालयानें नुकतीच देशातील विविध उच्चशिक्षण संस्थांची क्रमवारी जाहीर केली. देशातील अनेक विद्यापीठे आणि महाविद्यालयांनी सदर क्रमवारीमध्ये उत्तम कामगिरी बजावली; परंतु महाराष्ट्रासारख्या पुरोगामी, तसेच औद्योगिक, आर्थिक, सामाजिक, शैक्षणिकदृष्ट्या पुढारलेल्या राज्याला सदर क्रमवारीमध्ये म्हणावी, तशी दर्जेदार कामगिरी बजावता आली नाही.
केंद्र सरकारच्या नवीन शैक्षणिक धोरणामध्ये व्यावसायिक शिक्षणासह उच्चशिक्षणात विद्यार्थ्यांचे सकल नोंदणी गुणोत्तर 50 टक्क्यांपर्यंत वाढवण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आलेले असताना महाराष्ट्रासारखे पुढारलेले राज्य उच्चशिक्षणात मागे राहिल्यास हे समाजाच्या आणि देशाच्या हिताचे होणार नाही. देशामधील पहिल्या शंभरात महाराष्ट्रातील फक्त चार महाविद्यालये असून, संशोधन संस्थात पहिल्या पन्नासमध्ये राज्यातील तीन संस्था आहेत.
अभियांत्रिकी, वैद्यकीय, विधि यांसारख्या विद्याशाखांमधील स्थिती समाधानकारक दिसून येत नाही. रोजगाराभिमुख उच्चशिक्षण तरुणांना उपलब्ध करून दिल्यास कार्यक्षम मनुष्यबळ देशाच्या सर्वांगीण विकासात मोठे योगदान देऊ शकेल. देशामध्ये बेरोजगारीचे प्रमाण वाढण्याचे कारण म्हणजे शासकीय धोरणे आणि उच्चशिक्षण संस्थांमधील समन्वयाचा अभाव असल्याचे देखीलअधोरेखित होते.
सरकारने देशाच्या उज्ज्वल भवितव्यासाठी शिक्षणामध्ये एकूण जीडीपीच्या ५ टक्के गुंतवणूक करणे हिताचे ठरेल. शिक्षणामधील वाढता राजकीय हस्तक्षेप, शिक्षणाबद्दलची राज्य सरकारची अनास्था, विद्यापीठे महाविद्यालयांमध्ये प्राध्यापकांच्या रिक्त जागांची वाढती संख्या, पुरेशा पायाभूत सेवासुविधांचा अभाव यासारख्या अनेक कारणांमुळे उच्चशिक्षणाची गुणवत्ता आणि दर्जा टिकवणे हे आव्हानात्मक ठरत आहे.
अशा परिस्थितीमध्ये गुणवत्तापूर्ण आणि रोजगाराभिमुख शिक्षण हा मूलभूत अधिकार असताना सरकार आपली जबाबदारी नाकारू शकत नाही. आंतरराष्ट्रीय स्तरावरील शैक्षणिक संस्थांशी भारतीय शैक्षणिक संस्थांना गुणवत्तापूर्ण स्पर्धा करता यावी, असे वातावरण निर्माण करून प्रोत्साहन देण्याची गरज निर्माण झालेली आहे. यासंदर्भात तातडीने पावले उचलण्यांची गरज आहे.
'नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ रैंकिंग फ्रेमवर्क'च्या (एनआयआरएफ) आकडेवारीतून समोर आलेले हे वास्तव आहे. नवनिर्मितीत आयआयटी, मुंबईने पहिला क्रमांक पटकावला असला तरी 'आयआयटी' मुंबईवगळता सरासरी क्रमवारीत राज्यातील इतर महाविद्यालये-विद्यापीठे पहिल्या दहामध्येही नाहीत. प्रगतिशील राज्य अशी शेखी मिरवणाऱ्या राज्यासाठी ही शरमेची बाब आहे.
देशातील आकडेवारी पाहतानाच जागतिक पातळीवरील विद्यापीठांच्या क्रमवारीत क्यूएसनुसार आयआयटी, मुंबई यंदा ११८व्या स्थानावर आहे. जागतिक पातळीवर सर्वोत्कृष्ट 1300 विद्यापीठांत भारतातील केवळ 22 विद्यापीठांचा समावेश आहे, तर जगातील सर्वोत्कृष्ट पहिल्या पाच विद्यापीठांत भारतातील एकही विद्यापीठ 'गुणवत्ता, शैक्षणिक दर्जा आणि संशोधन' या निकषांत बसत नाही. ही अवस्था विश्वगुरू बनण्याचे स्वप्न उराशी बाळगणाऱ्या देशाची शोकांतिकाच म्हणावी लागेल.
आपल्या शिक्षण क्षेत्राचे बाजारीकरण झाले आहे आणि त्यातून शिक्षण सम्राट शिक्षणमहर्षी तेवढे निर्माण झाले आहेत.
उच्च शिक्षणाची दयनीय अवस्था अनेक मुद्द्यांवरून प्रकट होते. या समस्यांचा विचार करताना खालील मुद्द्यांवर प्रकाश टाकता येईल:
1. सुविधांची कमतरता : अनेक विद्यापीठांमध्ये आणि महाविद्यालयांमध्ये मूलभूत सुविधांची कमतरता आहे. अपुरे ग्रंथालय, प्रयोगशाळा, आणि तांत्रिक साधने विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेवर विपरीत परिणाम करतात.
2. शिक्षकांची गुणवत्ता : शिक्षकांच्या गुणवत्ता आणि शिक्षण पद्धतींची कमी हीसुद्धा एक मोठी समस्या आहे. पुरेसं प्रशिक्षण न मिळाल्यामुळे आणि अपुरे अनुभव असलेल्या शिक्षकांमुळे विद्यार्थ्यांच्या शिक्षणाच्या गुणवत्तेवर विपरीत परिणाम होतो.
3. संशोधनाची कमतरता : संशोधनाची आवड कमी होणे आणि त्यासाठी आवश्यक साधनांची कमतरता, यामुळे उच्च शिक्षणसंस्था संशोधनाच्या क्षेत्रात मागे पडत आहेत. याचा परिणाम म्हणून, ज्ञानाच्या सृजनशक्तीवर मर्यादा येत आहे.
4. राजकीय हस्तक्षेप: अनेक उच्च शिक्षणसंस्थांमध्ये राजकीय हस्तक्षेप आणि व्यवस्थापनाचे राजकारण विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक वातावरणावर विपरीत परिणाम करतात. हे अभ्यास आणि संशोधनाचे वातावरण दूषित करते.
5. विद्यार्थी-शिक्षक संबंध: विद्यार्थी आणि शिक्षकांमधील संवादाची कमतरता हीदेखील एक महत्वाची समस्या आहे. विद्यार्थ्यांना मार्गदर्शन आणि सल्ला देण्याची गरज असताना त्यांना योग्य दिशा मिळत नाही.
6. आर्थिक अडचणी: अनेक विद्यार्थी आर्थिकदृष्ट्या दुर्बल असल्यामुळे त्यांना उच्च शिक्षण घेणे कठीण होते. शिष्यवृत्ती आणि आर्थिक सहाय्याच्या योजना असूनही, त्यांची प्रभावी अंमलबजावणी होत नाही.
या समस्यांवर उपाय शोधणे आवश्यक आहे जेणेकरून उच्च शिक्षणाची गुणवत्ता सुधारता येईल आणि विद्यार्थी देशाच्या प्रगतीसाठी योगदान देऊ शकतील.
-एक शिक्षण प्रेमी
#विद्यार्थीमित्र प्रा. रफीक शेख,
🎓 डॉ. ए.पी.जे.अब्दुल कलाम विद्यार्थी फाउंडेशन, परभणी.
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
Post a Comment