"पालकांनी मुलांच्या पावलांसमोर प्रकाश ठेवावा, सावल्या नाही."
— विद्यार्थीमित्र प्रा. रफीक शेख
निफाड एज्युकेशन अँड सोशल फाउंडेशन संचलित श्रीराम क्लासेस, निफाड तर्फे विविध स्तरावरील शालेय स्पर्धा परीक्षांमध्ये घवघवीत यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव, बक्षीस वितरण कार्यक्रम आणि शिक्षक सत्कार सोहळा संपन्न झाला. या विशेष सोहळ्याच्या निमित्ताने पालक संवाद सत्रात परभणी येथील डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम विद्यार्थी फाउंडेशनचे विद्यार्थीमित्र प्रा. रफीक शेख (करिअर मार्गदर्शक) यांचे प्रेरणादायी मार्गदर्शन लाभले.
त्यांनी पालकांना आधुनिक शिक्षणपद्धती, करिअर निवड आणि पालकत्वाची जबाबदारी या विषयांवर मोलाचे मार्गदर्शन केले.
📕पुस्तक प्रकाशन – "आई-बाबा, मला शिकायचंय.!"
या कार्यक्रमात "आई-बाबा, मला शिकायचंय" या प्रेरणादायी पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असलेल्या गुरुवर्य मा. श्री. वि. दा. व्यवहारे सर (विश्वस्त, न्या. रानडे विद्याप्रसारक मंडळ, निफाड ) यांच्या हस्ते प्रकाशन सोहळा पार पडला. या पुस्तकाचे संपादन श्रीराम क्लासेसचे संचालक श्री. उल्हास पाटील व सौ. सविता पाटील यांनी केले आहे.
विद्यार्थ्यांचा शैक्षणिक पाया भक्कम करण्यासाठी हे पुस्तक मार्गदर्शक ठरणार असून, त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी दिशादर्शक ठरेल.
🔰शिक्षणाच्या बदलत्या वाटा – पालकांची भूमिका अधिक महत्त्वाची.. ✍️
शिक्षण ही कोणत्याही समाजाच्या प्रगतीसाठी अत्यंत महत्त्वाची बाब आहे. बदलत्या तंत्रज्ञानाच्या युगात शिक्षणाचे स्वरूप झपाट्याने बदलत आहे. पारंपरिक शिक्षणाच्या चौकटी मोडून नवनवीन शिक्षणपद्धती उदयास येत आहेत. अशा परिस्थितीत पालकांची भूमिका केवळ मार्गदर्शकाची न राहता अधिक आव्हानात्मक आणि सक्रिय बनली आहे.
आजच्या वेगवान आणि तंत्रज्ञानप्रधान युगात शिक्षण केवळ पुस्तकी ज्ञानापुरते मर्यादित राहिलेले नाही. तांत्रिक कौशल्ये, संवाद कौशल्ये, निर्णयक्षमता आणि जीवन कौशल्ये शिकवणे तितकेच महत्त्वाचे बनले आहे. त्यामुळे पालकत्व अधिक जबाबदारीचे ठरत आहे.
पूर्वी शिक्षण म्हणजे शाळा-महाविद्यालयीन अभ्यासक्रम, परीक्षा आणि पदवी मिळवणे असे गणले जात असे. मात्र, आता शिक्षण बहुपर्यायी झाले आहे. डिजिटल शिक्षण, ऑनलाइन कोर्सेस, कृत्रिम बुद्धिमत्ता (AI), आणि व्यवसायिक कौशल्यांचे महत्त्व वाढले आहे. भविष्यातील नोकऱ्या आणि संधींसाठी पारंपरिक शिक्षण पुरेसे ठरणार नाही.
बदलत्या शिक्षण व्यवस्थेत आजच्या पालकांनी मुलांच्या क्षमतांचा, आवडी-निवडींचा आणि आर्थिक परिस्थितीचा विचार करून योग्य करिअर निवडीसाठी मार्गदर्शन करणे आवश्यक आहे.
🔰 पालकत्वाची जबाबदारी – शिक्षण आणि जीवनमूल्ये दोन्ही महत्त्वाचे.. ✍️
आजच्या शिक्षणातून मिळणारे ज्ञान आणि कौशल्ये उद्याच्या भविष्याची हमी देऊ शकतात. म्हणूनच, पालकांनी केवळ शैक्षणिक यशावर भर न देता मुलांच्या सर्वांगीण विकासाला प्राधान्य दिल्यासच त्यांचे भविष्य उज्ज्वल होईल. शिक्षण हा केवळ ज्ञान मिळवण्याचा मार्ग नाही, तर जीवनाचा पाया मजबूत करण्याचा मार्ग आहे.
यशस्वी पालकत्व हे केवळ मुलांना चांगल्या शाळेत घालण्यापुरते मर्यादित नसून, त्यांना विचारशील, संवेदनशील आणि सक्षम व्यक्ती बनवण्याची जबाबदारी पालकांची आहे. मुलांचे भविष्य उज्ज्वल करायचे असेल, तर आजच्या शिक्षणाकडे गांभीर्याने पाहणे गरजेचे आहे. सुशिक्षित पिढी म्हणजे प्रगत समाजाची खरी ताकद आहे, असे प्रा. रफीक शेख यांनी स्पष्ट केले.
🔰कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन आणि मान्यवरांची उपस्थिती..
या विशेष कार्यक्रमाला अनेक मान्यवर उपस्थित होते:
कविता धारराव (नगराध्यक्षा, निफाड)
अनिल कुंदे (उपनगराध्यक्ष, निफाड नगरपंचायत)
वरिष्ठ पोलीस निरीक्षक निकम साहेब
वि. दा. व्यवहारे सर (कार्यकारी विश्वस्त)
तात्यासाहेब वडघुले (सचिव)
जेउघाले सर ( शिक्षक प्रतिनिधी )
ज्योती बागडे मॅडम (मुख्याध्यापक)
प्रसन्ना कुलकर्णी (मुख्याध्यापक)
दिगंबर पाटील (अध्यक्ष, निफाड एज्युकेशन)
राजेंद्र थोरात (पत्रकार)
मंगेश देवडे (जलसंधारण अधिकारी, नाशिक)
फैजल पटेल (दीप एज्युकेशन)
या कार्यक्रमाचे नियोजन आणि आयोजन श्रीराम क्लासेस, निफाड यांच्या वतीने अतिशय सुंदररीत्या करण्यात आले.
शिक्षण आणि पालकत्व यांचा सुवर्णसंतुलन..!
या कार्यक्रमाच्या माध्यमातून शिक्षणाच्या बदलत्या स्वरूपाबाबत पालकांची जबाबदारी कशी वाढली आहे, त्यांना कोणत्या गोष्टींवर भर द्यावा लागेल आणि भविष्यातील शिक्षणाच्या संधी याविषयी सखोल मार्गदर्शन करण्यात आले. पालकांनी पारंपरिक शिक्षणाच्या चौकटीत अडकून न राहता मुलांच्या एकूण विकासावर भर द्यावा, त्यांना आधुनिक कौशल्यांमध्ये सक्षम बनवावे आणि त्यांचे करिअर योग्य पद्धतीने घडवावे, असा महत्त्वपूर्ण संदेश या कार्यक्रमातून देण्यात आला.
Post a Comment